कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या तीन दिवसांपासून कर्नाटकात तळ ठोकून असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भाजपाच्या प्रचाराकरीता तसेच देवदर्शनासाठी कर्नाटकाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवार, 4 मे 2023पासून कर्नाटकात आहेत. गुरूवारी त्यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघ, बेळगाव दक्षिण मतदारसंघ, बेळगाव ग्रामीण मतदारसंघ, येमाकन्नामार्डी मतदारसंघ येथे सभा घेतल्या. याच प्रचारात त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात रोड शोही केला.
काल, शुक्रवारी त्यांनी क्षत्रिय समाज संमेलन, हुबळी-धारवाड पूर्व मतदारसंघ, युवा संमेलन, हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघ, अधिवक्ता संमेलन, हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघ, पाटीदार समाज संमेलन, हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघ येथे सभा घेतल्या. आज ते विजयांगारा जिल्ह्यात हगरीबोम्मनहळ्ळी मतदारसंघात युवा संवाद आणि मतदार मेळावा घेणार आहेत. संध्याकाळी कोप्पल जिल्ह्यातील गंगावती मतदारसंघात मतदार मेळावा घेतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री 8.00 वाजता मुंबई विमानतळावरून कर्नाटक दौऱ्यासाठी प्रस्थान करतील. रात्री 9.30 वाजता बेंगळुरू येथे त्यांचे आगमन होईल. उद्या, रविवारी सकाळी 6.30 ते 8.00 वाजता ते बेंगळुरू येथील कब्बन पार्क येथील मतदारांसोबत चालून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत ते बसवनागुडी येथील दोड्डा गणपती मंदिराला भेट देऊन पूजा व दर्शन घेतील. संध्याकाळी 4.00 ते 7.00 या काळात मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत रोड शोमध्ये सहभागी होतील. चांदपुरा सर्कल ते इग्गालुरू हासुर मेन रोड अनेकल, असा हा रोड शो होणार आहे. रात्री 8.00 वाजता ते बेंगळुरू विमानतळावरून मंगळुरूकडे प्रस्थान करतील.

सोमवारी सकाळी 9.00 वाजता हेलिकॉप्टरने धर्मस्थळ येथे रवाना होणार आहेत. सकाळी 9.40 ते 10.40 वाजेपर्यंत मुख्यमंत्री श्री मंजुनाथ स्वामी मंदिराला भेट देऊन पूजा आणि दर्शन करतील. तसेच धर्मस्थळ संस्थानचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांचीही ते भेट घेणार आहेत. 11.00 वाजता ते हेलिकॉप्टरने उडुपीकडे प्रस्थान करतील. दुपारी 12 ते 12.30 या काळात ते श्रीकृष्ण मंदिर उडुपी येथे पूजा आणि दर्शन घेतील. दुपारी 3.00 ते 4.00 एकनाथ शिंदे उडुपी जिल्ह्यातील कापू विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी 4.00 ते 5.00 ते उडुपी विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. संध्याकाळी 5.00 वाजता ते उडुपीहून हेलिकॉप्टरने मंगळुरूला परतणार आहेत. रात्री 9.00 वाजता मुख्यमंत्री शिंदे मंगळुरू विमानतळावरून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

