Homeब्लॅक अँड व्हाईटयुरोपमध्ये व्यवसायिक स्पर्धा...

युरोपमध्ये व्यवसायिक स्पर्धा खेळणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू अदिती

भारतीय महिला फुटबॉल संघाची गोलरक्षक ३२ वर्षीय अदिती चौहानने आपल्या तब्बल १७ वर्षांच्या कारकिर्दीला काही दिवसांपूर्वी पूर्णविराम‌ देण्याचा निर्णय घेतला. अदिती भारतीय महिला फुटबॉलची खरी शान होती. उत्तम गोलरक्षक असलेल्या अदितीने आपल्या शानदार खेळाच्या जोरावर भारतीय महिला फुटबॉलला‌‌ एका वेगळ्या उंचीवर‌ नेऊन ठेवले. भारतीय महिला फुटबॉलची ओळख फुटबॉलविश्वाला करुन दिली. आपली यशस्वी आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवत असताना तिने २०१५मध्ये इंग्लंडमधील वेस्ट हॅम युनाटेड वुमन्स टिमशी‌ करारबद्ध होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. युरोपमध्ये व्यवसायिक फुटबॉल स्पर्धेत खेळणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉल खेळाडू ठरली. तीन वर्षे ती या क्लबतर्फे खेळली.

लंडनमध्ये स्पोर्टस् मॅनेजमेंटमध्ये अदिती मास्टर्स डिग्री मिळवण्यासाठी लॅफोबोरो विद्यापीठात गेली होती. याअगोदर दिल्ली‌ विद्यापीठातून‌ अदितीने वाणिज्य शाखेची पदवी मिळवली होती. तेथील विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत अदितीने आपल्या भक्कम, मजबूत गोलरक्षणाची छाप पाडली. त्यामुळेच वेस्ट हॅम युनाटेड संघाने तिला करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट हॅमतर्फे खेळताना ती नोकरीदेखील करत होती. पुढे भारतात आल्यानंतर अदिती भारतीय महिला फुटबॉल लिगमध्ये गोकुलम क्लब, इंडिया रफ एससी, श्री भूमी एफसी क्लबतर्फे खेळली. इंडिया रफ एससी संघाला तिने दोनवेळा जेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. २०२१मध्ये तिने आईसलॅन्ड हमार हेरागिरी क्लबचेदेखील प्रतिनिधीत्व केले. २००८ ते २०१२दरम्यान तिने ४ वर्षं विविध ज्युनियर स्पर्धात भारताचे प्रतिनिधीत्व केले. २०१२मध्ये अदितीने सिनीयर भारतीय फुटबॉल संघात स्थान मिळवले. त्यानंतर‌ तिने मागे वळून बघितलं नाही. निवृत्तीपर्यंत अदितीने आपले भारतीय संघातील स्थान कायम राखले.

अदितीचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. पण ‌काही‌ वर्षांनी‌ तिच्या कुटुंबियांनी‌ दिल्ली‌ गाठली. एमिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अदितीचे‌ शालेय शिक्षण झाले. लहानपणापासून‌ तिला विविध खेळांची आवड होती. सुरुवातीला अदिती‌ चांगली कराटे, बास्केटबॉल खेळायची. दिल्ली युवा बास्केटबॉल संघात तिची निवडदेखील‌ झाली होती. पण नंतर ती फुटबॉलच्या प्रेमात पडली आणि भारताला एक चांगली‌ फुटबॉलपटू मिळाली. २०१२, १६, १९च्या सॅफ फुटबॉल स्पर्धा‌ विजेत्या भारतीय संघात ती होती. २०१६ आणि‌ १९‌च्या दक्षिण आशियाई‌ क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या भारतीय संघातदेखील अदितीचा समावेश होता. अदितीने चमकदार कामगिरीचा ठसा उमटवून भारतीय महिलादेखील फुटबॉल, या खेळात करियर करु शकतात हे‌ दाखवून‌ दिले. तुम्हाला विदेशात खेळण्याची संधी मिळू शकते हा विश्वास युवा भारतीय महिला खेळाडूंमध्ये निर्माण‌ केला. त्यामुळे अदितीनंतर काही विदेशी क्लबनी भारतीय खेळाडूंना करारबद्ध केले. त्याचा मोठा फायदा भारतीय खेळाडूंना झाला.

भारतीय महिला फुटबॉल संघ प्रथमच आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. अदितीने जरी निवृत्ती घेतली असली तरीदेखील या खेळाची सेवा ती ‌करत राहणार आहे. काही वर्षांपूर्वी तिने “किक्स” या फुटबॉल अकादमीची स्थापना केली आहे. या अकादमीतून चांगले युवा ‌फुटबॉलपटू तयार करण्याचे तिचे स्वप्न आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने अदितीच्या अनुभवाचा लाभ घ्यायला हवा. भारतीय महिला फुटबॉलमधील अदितीचे योगदान फुटबॉलप्रेमी विसरणार नाहीत, हे मात्र नक्की!

Continue reading

तिसऱ्या प्रयत्नात भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास!

हरमनप्रीत कौरच्या यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आपल्या तिसऱ्या प्रयत्नात वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचला. या ऐतिहासिक जेतेपदामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या लाखो चाहत्यांना दिवाळीनंतर लगेचच पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची आगळी...

बॅडमिंटनमधले तपस्वीः मनोहर गोडसे!

बॅडमिंटन आणि मनोहर गोडसे यांचे एक अतूट नातं आहे, जे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुटूच शकत नाही. बॅडमिंटन हा जणू काही गोडसे यांचा श्वास आहे, असेच म्हणावे लागेल. नुकतेच वयाच्या ८६व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या गोडसे यांनी तब्बल सहा दशकांपेक्षा जास्त...

कविसंमेलनाप्रमाणे ऐटीत संपन्न झाले कुस्तीसंमेलन!

आपल्याकडे‌ साहित्यसंमेलन, विज्ञानसंमेलन, नाट्यसंमेलन, कवीसंमेलन वैगेरे नियमित आयोजित केली जातात, पण कुस्तीसंमेलनाचेदेखील राज्यात गेली तीन वर्षं शानदार आयोजन केले जात आहे, याची माहिती फार कमी क्रीडा‌प्रेमींना असेल. फलटण‌‌ येथील कुस्तीमित्र, कुस्तीवर प्रचंड प्रेम करणारे‌, कुस्तीवेडे‌ वस्ताद संपतराव जाधव, आपल्या सुजन...
Skip to content