Tuesday, September 17, 2024
Homeडेली पल्स३८ लाख ग्राहकांसाठी...

३८ लाख ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना उद्यापासून

बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना २०२४ अंमलात येणार असून याद्वारे ग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १७८८ कोटी रुपये माफ करण्यात येतील. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी १ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली असून या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ आहे. या ३८ लाख ग्राहकांकडून महावितरणला मूळ बिलाची ५०४८ कोटी रुपयांची रक्कम तसेच १७१९ कोटी रुपये व्याज आणि ६९ कोटी ९० लाख रुपये विलंब आकार येणे आहे. तथापि, या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येईल.

मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एकरकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रंचायजी क्षेत्रातील वीज ग्राहकांनाही ही योजना लागू होणार आहे.

असा घ्या लाभ

संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.

Continue reading

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध...

यापुढे ‘बाबू’ ठरवणार, सणवार कधी साजरे करायचे ते?

यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल असे एकूण चित्र दिसते. आज होणारी ईद असो किंवा गणेशोत्सव, सरकारी बाबू म्हणतील त्याप्रमाणे हे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
error: Content is protected !!
Skip to content