विजयाच्या जोशाने, मताधिक्याच्या त्वेषाने, प्रचंड संख्येने उसळलेल्या या जनसागराच्या उपस्थितीत आज माझ्या निवडणूक प्रचाराची सांगता सभा पार पडली. या सांगता सभेवर उपस्थित जनसमुदायाने अफाट जल्लोषात प्रेमाचा, पाठिंब्याचा जो वर्षाव केला, तो पाहता आज प्रचाराची सांगता जरूर झाली. मात्र खऱ्या अर्थाने प्रारंभ झालाय तो नव्या पर्वाचा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीतल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल व्यक्त केल्या.

बारामतीत या सभेसाठीची आजची गर्दी आणि या गर्दीचा जोश “न भूतो न भविष्यती” असाच होता. त्या जोशातून घुमणाऱ्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. माझ्या भाषणाला मिळालेला प्रतिसाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी टिपेला पोहोचला. आजची सभा अजितदादांनी अक्षरशः एकहाती जिंकली. या सभेचा उत्स्फूर्तपणे निर्माण झालेला उत्साही माहोल चेतना निर्माण करणारा, केवळ विजयाची नव्हे तर प्रचंड मताधिक्याची खात्री देणारा होता. ही खात्री देणाऱ्या तमाम मायबाप जनतेचे खूप खूप आभार, असेही त्या म्हणाल्या.

या सभेस राष्ट्रवादीसह महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. शिवाय अनेक संघटना, संस्थांनी यावेळी जाहीर पाठींबा दिला. त्याबद्दल त्यांचेही आभार आणि मंगळवारी, ७ मे रोजी “घड्याळ” या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, अशी विनंतीही सुनेत्रा पवार यांनी केली.