साहित्याची आवड असणाऱ्या सर्व लेखक, वाचक यांना आवडेल, भावेल असा साहित्यिक कार्यक्रम, येत्या १३ डिसेंबरला कोकण मराठी साहित्य परिषद, दादर शाखा आणि कोमसाप, मुंबई जिल्हा, कोमसाप युवा शक्ती यांनी रोटरी क्लब ऑफ मुंबई शिवाजी पार्क, दादर यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सानेगुरुजी विद्यालय, भिकोबा वामन पाठारे मार्ग, दादर येथे सायंकाळी ४.३० वाजता होईल, अशी माहिती कोमसाप दादर शाखेच्या अध्यक्षा अंजना कर्णिक यांनी दिली आहे.
‘शून्य बघितलेला माणूस’चे लेखक आणि सुप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ डॉ. तुषार प्रीति देशमुख यांचे मनोगत, लेखन आणि जीवन प्रवास, हे या कार्यक्रमाचे मोठे आकर्षण आहे. यंदा पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या काव्याचे सादरीकरण, रसग्रहण आणि शंकर पाटील भाऊ पाध्ये यांच्या कथांचं सादरीकरण युवा शक्तीची तरुण मुले प्रा. दीपा ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर भूषवतील. केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, केंद्रीय कार्यवाह दीपा ठाणेकर, युवाशक्ती प्रमुख स्नेहा वाघ, मुंबई जिल्हाध्यक्ष विद्या प्रभू, शिवाजी पार्क रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. रमेश शेटे आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील, असे कर्णिक यांनी सांगितले.

