Details
वसंतऋतूचे देणे..
01-Jul-2019
”
प्रा. नयना रेगे
[email protected]
चैत्र महिन्यापासून वेध लागतात ते वसंत ऋतूचे. कारण निसर्ग नवनिर्मितीचा आनंद साजरा करत असतो. त्याची वर्दी कोकीळ आपल्या कुजनाने साऱ्या जगाला करून देत असते. झाडाला फुटणाऱ्या नव्या पालवीकडे पाहा, असं जणू सांगत असते आणि म्हणूनच विद्वज्जनांना वसंत व्याख्यानमालेची संकल्पना सुचली असावी. १८७५ च्या मे महिन्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुणे येथे सर्वात प्रथम वसंत व्याख्यानमालेची मुहूर्तमेढ रोवली. ही व्याख्यानमाला वक्तृत्व स्पर्धेतून उदयास आली. व्याख्यानमाला ही विचार जागृतीसाठी आहे असा त्यांचा स्पष्ट उद्द्येश होता. ज्ञानप्रसार आणि विचारजागृती मुक्तपणे आणि मोठ्या प्रमाणावर झाल्याशिवाय देशोन्नती होणे शक्य नाही, हे त्यांनी जाणले. दुसऱ्या वर्षी ही व्याख्याने इंग्रजी भाषेतून झाली. तब्बल १४४ वर्षे या व्याख्यानमालेस झाली. नाशिक येथे गंगाघाट याठिकाणी आजही वसंत व्याख्यानमाला गेली ४० वर्षे सातत्याने सुरू आहे. मुंबईमध्ये दादर याठिकाणी अमरहिंद मंडळाची व्याख्यानमाला ७२ वर्षे चालत आलेली वसंत व्याख्यानमाला आजही लोकप्रिय आहे. चुनाभट्टी, घाटकोपर, चेंबूर येथे व्याख्यानमाला चालतात. बोरिवलीत दौलतनगरला नित्सुरे कुटुंबियांनी संस्कार व्याख्यानमाला सुरू केली आहे. मुलुंड येथील व्याख्यानमाला अर्थविषयक विषय घेऊन गेली ५० वर्षे ही परंपरा टिकविली आहे.
काही ठिकाणी गणेशोत्सव काळात व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. व्याख्यानमाला समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी, वैचारिक क्रांती निर्माण करण्यासाठीचे उत्तम साधन आहे. केवळ वैचारिकच नव्हे तर बौद्धिक, शैक्षणिक, आणि करमणूक अशा विविध अंगांनी व्याख्यानमाला रसिक श्रोत्यांना तृप्त करीत असते. अशी व्याख्यानमाला आयोजित करणारे दिग्गज एक प्रकारे सुसंस्कृत समाज घडविण्यात योगदान देत आहेत. बोरिवली पूर्वेकडील जय महाराष्ट्र नगर येथे गेली ३६ वर्षे वसंत व्याख्यानमाला सातत्याने सुरू आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या नेतृत्त्वाखाली १९८३ साली ही व्याख्यानमाला सुरू झाली. जगप्रसिद्ध कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांनी विविध विषयांवर सुश्राव्य कीर्तने सादर केली आहेत. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून अनेक प्रसिद्ध व्यक्तींना पाहण्याचे, ऐकण्याचे भाग्य श्रोत्यांना लाभले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्रीनिवास खळे, यशवंत देव, अरूण दाते, प्रा. शौनक वैद्य, मंगला खाडिलकर, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. मालती कारवारकर, रामचंद्र देखणे असे साहित्यिक, राजकीय, कला, क्रीडा, नाट्य, सिनेसृष्टीतील कितीतरी कलावंत रसिकांच्या भेटीस आले.
सुरूवातीच्या काळात अत्यल्प प्रतिसाद मिळत असतानासुद्धा वैद्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जिद्द मात्र प्रचंड होती. निःसंशय उपनगरातील ही व्याख्यानमाला चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरली. निःस्वार्थीपणे झटणारे कार्यकर्ते, शिस्तबद्ध नियोजन व दर्जेदार वक्ते हे या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य आहे. यंदाचे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे हे ३७ वे वर्ष आहे. येत्या १० मे २०१९ ते १४ मे २०१९ या कालावधीत सलग पाच दिवस टाटा पॉवर, जय महाराष्ट्र नगर येथे ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, ब्रिगेडियर हेमंत महाजन, खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण; सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे आणि स्नेहल भाटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गीतांचा कार्यक्रम; निवेदिका मंगला खाडिलकर, नाट्य व सिने कलावंत हृषिकेश जोशी रसिक श्रोत्यांच्या भेटीस येणार आहेत. आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे, सदर व्याख्यानमालेस प्रवेश विनामूल्य आहे.
जागतिकीकरणामुळे आजूबाजूला होणारे बदल काही गोष्टी काळाच्या पडद्याआड घेऊन जातात तर काही चांगले परिवर्तन घडवून आणतात. परंतु काळाच्या ओघात टीव्ही, मोबाईल, इंटरनेटसारख्या माध्यमात अडकून पडलेला श्रोतृवर्ग घराबाहेर पडून व्याख्यानमालेस उपस्थिती लावण्यास काहीसा अनुत्सुक दिसतो. करमणुकीचे एखादे साधन जे घरबसल्या उपलब्ध आहे त्यात ते अधिक गुंततात. परंतु एक समृद्ध देश, सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत. काळाच्या बरोबर चालून, आजूबाजूच्या परिस्थितीतून आपल्यासारख्या सामान्य लोकांनी कितीतरी असामान्य गोष्टी केलेल्या असतात. थोडक्यात काय तर इतरांच्या अनुभवातून शिकण्याचा व्याख्यानमाला हा राजमार्ग आहे. लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचे तर वसंत व्याख्यानमाला म्हणजे एक ज्ञानव्यापी आहे. पुढच्या पिढीत चौकस बुद्धी उत्पन्न करून ज्ञानवृद्धी करणाऱ्या संस्था अशाच भरभराटीने चालोत, अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे.”
“प्रा. नयना रेगे