Details
“अडाणी हटवा, लोकशाही वाचवा!”
19-Apr-2019
| 0
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
वरील शीर्षकात अडाणी म्हटलंय, पण झरकन नजर फिरली तर तो भाजपामधील अडवाणी हटवा.. कार्यक्रम असावा असा भास होऊ शकतो. पण तसे नाही. अडाणी म्हणजे खासदारकीतील काही न कळणारा, केवळ पत्रकबाजी करणारा, जेमतेम शिक्षण असलेला उमेदवार जनतेने नाकारावा आणि सुशिक्षित, जाणकार उमेदवार निवडून पाठवावा, असा विचार आता बळावू लागला आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा हळूहळू सर्वच मतदारसंघात ऐरणीवर येऊ लागला आहे. ठाणे, कल्याणमध्ये जसे आघाडी आणि युतीच्या उमेदवारांमध्ये तुही यत्ता कंची सुरू आहे तसेच तिकडे खाली रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातही स्वाभिमान पक्षातर्फे रिंगणात उतरलेले निलेश राणे यांनी मतदारा, सावधान.. अशी हाक दिली आहे. लग्न जुळवताना, जन्माचा जोडीदार निवडताना शिक्षण बघता, मग खासदार निवडताना का नाही, असा प्रश्न त्यांनी तरूण मतदारांना विचारला आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासमोर निलेश राणे यांनी, अडाणी हटवा, कोकण वाचवा! अशी हाक देत आव्हान उभे केले आहे. याबद्दलच्या जाहिरातीही सोशल मीडियावर झळकल्या आहेत. लोकसभेत कोकणची बाजू उत्तमप्रकारे मांडणारे उच्चशिक्षित निलेश राणे आणि राऊत यांच्यातील शैक्षणिक तफावतीवर या जाहिरातीमधून भाष्य करण्यात आले आहे.
वास्तविक आपले लोकप्रतिनिधी म्हणून आपण कोणाला निवडून देत असतो, हे मतदारांनीही काळजीपूर्वक पाहावयास हवे. यादृष्टीने शैक्षणिक पात्रता महत्त्वाची ठरते. निलेश राणे यांची जाहिरात यामुळेच गाजू लागली आहे. शिक्षणाचा हा मुद्दा सर्वच मतदारसंघांमध्ये कळीचा ठरायला हवा. लोकशाही जगवण्यासाठी, समृद्ध आणि विचारी समाज निर्माण व्हावा, लोकशाहीतील घटनादत्त हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी किमान वैचारिक क्षमता असलेले लोकप्रतिनिधीच संसदेत निवडून जायला हवेत. प्रत्यक्षात तसे होताना आजही दिसत नाही. कोणत्यातरी भावनात्मक वा आणखी कुठल्या दबावाला, आवाहनाला, पक्षनिष्ठा, नेतृत्त्वनिष्ठा, अरे, आवाज कुणाचा.. टाईप भ्रामक घोषणाबाजीला भुलून बहुसंख्यांची मते टाकली जातात. त्यामागे विचार असा नसतो, धोरणही नसते, असते ती पक्षनिष्ठा, प्रतिस्पर्धी पक्षाबद्दल ईर्षा, चेव, पक्षाच्या विचारसरणीशी पक्की बांधिलकी. पण, आपला खासदार हा आपले प्रश्न मांडण्यासाठी आपण संसदेत पाठवणार आहोत, त्याने तिथे किमान तोंड तरी उघडले पाहिजे, दोन वाक्ये धडपणे बोलली पाहिजेत, त्याला संसदेत काय सुरू आहे, नवीन तंत्रज्ञान, विज्ञान यातील घडामोडी, प्रगती, अर्थकारण अशा गोष्टी तरी कळायला हव्यात, असा तुलनात्मक विचार फारसे कुणी करताना दिसत नाहीत. याने होते एकच की बुजगावण्यासाऱखे वाटावेत असे होयबा लोकप्रतिनिधी लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात पाऊल ठेवतात आणि पक्ष, पक्षाचे नेतृत्त्व म्हणेल त्याला मान डोलावत आपली खुर्ची उबवत राहतात.
जनतेची वा मतदारसंघातील कामे म्हणजे त्यांना सत्यनारायण पूजा, क्रिकेटचे सामने, रक्तदान शिबीरे, उद्यान सुशोभीकरण, रस्ते, पायवाटा असलीच कामे वाटत राहतात. खासदार निधी अशा फुटकळ गोष्टींवर खर्च होतो. मतदारसंघातील समस्यांचा पाठपुरावा होत नाही, संबंधित मंत्रालयांकडे खलित्यांचा मारा होत नाही, मंत्र्यांशी चर्चा होत नाही, सचिवांना झापले जात नाही, कामे व्हावीत म्हणून पार वरपर्यंत दरवाजे खटखटवले जात नाहीत. मग मतदारसंघाचा विकास हे एक स्वप्नच राहाते. अशा वेळी आठवते- ज्याची जशी लायकी तसेच मिळते. जनतेची जशी लायकी तसेच लोकप्रतिनिधी मिळतात, ही उक्ती. याला आणखीही एक बाजू आहे. जसे मुठभर धनिक शोषितांना कायम टांचेखाली ठेवू पाहातात तसेच या होयबा खासदारांना, फारसे कळत नसलेल्या लोकप्रतिनिधींना सरकार चालवणारी नोकरशाही, त्यांचे नेते, मंत्री दबावाखाली ठेवतात, त्यांना वेळोवेळी गुंडाळतात. त्यांची कामे पुढे सरकत नाहीत.
गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी एका वेगळ्याच प्रकारे येथे दिसून येते. मध्यंतरी वाचनात आले होते, १६ व्या म्हणजेच मावळत्या लोकसभेत आपल्या राज्यातील ४८ खासदारांपैकी सात खासदारांचे शिक्षण दहावी आणि दहावीपेक्षाही कमी होते. चार खासदार बारावीपर्यंत पोहोचले होते. २५ खासदार पदवीधर आणि तिघे अभियंते होते. कल्याणचे खासदार आणि ऑर्थोपेडिक डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्रीतम मुंडे, हिना गावित, सुभाष भामरे ही गेल्या लोकसभेतील डॉक्टर मंडळी. पण श्रीकांत शिंदे यांनी पहिल्याच खासदारकीत कामाची जी तडफ आणि चमक दाखवली ती इतर सुशिक्षितांनाही जमलेली नाही. दहावी पास भाजपचे हंसराज अहिर मंत्री झाले. स्मृती इराणी यांनी तर कमालच केली. पदवी ते बारावी असा त्यांचा प्रवास गेल्या दोन लोकसभांच्या काळात झाला आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात खासदार गोपाळ शेट्टी, परभणीचे संजय जाधव आणि रायगडचे अनंत गीते यांचेही शिक्षण दहावीपर्यंतच झालेले आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे, सांगलीचे संजयकाका पाटील, शिर्डीचे सदाशिव लोखंडे, शिरूरचे शिवाजीराव अढळराव पाटील यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. सध्या हे विश्वची माझे घर असे झाले आहे. ग्लोबल व्हिलेजच्या या काळात देशाचा कारभार करताना जागतिक घडामोडींचेही भान लागतेच. त्यासाठी वाचन लागते, संदर्भ गोळा करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, विषय समजून घ्यावा लागतो, तो तितक्याच सहजपणे, ठामपणे लोकसभेसारख्या सभागृहात ज्येष्ठ नेत्यांच्या साक्षीने मांडावा लागतो, मुद्देसूद बोलावे लागते. या सगळ्यासाठी शैक्षणिक पात्रताही आवश्यक असते. अनेक नेत्यांच्या दुसऱ्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व ओळखले आहे. ही सुशिक्षित, जागरूक पिढी नवे लोकप्रतिनिधी म्हणून यंदाच्या लोकसभेत दाखल होणार आहे. लोकशाहीच्या संवर्धनासाठी तो शुभक्षणच असेल.”

