Homeमुंबई स्पेशल१२ राशी व...

१२ राशी व २७ नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व पाहा भक्ती पार्क उद्यानात!

पूर्व उपनगरातील सर्वात मोठे उद्यान अशी ख्याती असलेल्या भक्ती पार्कमध्ये १२ राशी आणि २७ नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे उद्यानही विकसित झाले आहे. भक्ती पार्कमधील या नागरी वनात लागवड केलेल्या ५७ हजार झाडांनी चांगलाच जोम धरला असून ती वेगाने बहरत आहेत.

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा नागरी वने (मियावाकी) संकल्पनेची मुहूर्तमेढ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वडाळा (पूर्व) येथील भक्ती पार्क उद्यानातून करण्यात आली होती. पालिका क्षेत्राच्या पर्यावरणाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कमीतकमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी संकल्पनेवर आधारित ‘मियावाकी’ वने विकसित करण्याचा अभिनव प्रकल्प गेल्या दीड वर्षापासून राबविण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ भक्ती पार्कमधून २६ जानेवारी २०२० रोजी झाला होता.

या उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ ९८ हजार ३६९ चौरस मीटर इतके आहे. या भूभागाचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. पैकी, ५८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उद्यान विकसित करण्यात आले आहे. तर उर्वरित ४० हजार चौरस मीटर क्षेत्रावर खेळाचे मैदान विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. परदेशी यांच्या नेतृत्त्वाखाली तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या विभागाचे कर्मचारी व अधिकारी या उद्यानाच्या उभारणीसह देखभालीचे काम करत आहेत.

भक्ती पार्क उद्यानात जपानी शैलीनुसार विविध सेवासुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे ३ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा जॉगिंग ट्रॅक पदपथ, गजीबो, हिरवळ (लॉन), रंगबेरंगी फुलझाडे, टॉपिअरी व अद्ययावत सुविधांचा समावेश आहे.

या उद्यानात देशी, परदेशी औषधी प्रजातींची सुमारे २ हजारपेक्षा मोठी फुलझाडे व फळझाडे आहेत. यामध्ये प्रामुख्याने खैर, सुरंगी, आवळा, अर्जुन, पिंपळ, उंबर, बकुळ, आंबा, जांभूळ, कांचन, बदाम, निलगिरी, फणस, भोकर, बेल, सुरू, रॉयल पाम, कडीपत्ता, नारळ इत्यादींचा समावेश आहे.

भक्ती पार्क उद्यानात १२ राशींचे व २७ नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे नक्षत्र उद्यान फुलले आहे. विशेष म्हणजे यातील बरीच झाडे दुर्मिळ आहेत. नक्षत्र उद्यानाला भेट देणार्‍याला आपल्या राशीचे कोणते झाड आहे, याची माहिती मिळते. राशी व नक्षत्रानुसार एकूण २७ प्रजातींचे मोठे वृक्ष असून यामध्ये वड, पिंपळ, आवळी, उंबर, जांभळी, खैर, वेलु, नागचाफा, पळस, बेल, अर्जुन, सांबर, फणस, शमी, रुई, कडूलिंब, मोह, इत्यादींचा समावेश आहे.

या उद्यानातील मियावाकी संकल्पनेवर आधारित नागरी वन प्रकल्पात जवळपास ५७ हजार इतक्या संख्येने व प्रामुख्याने देशी व औषधी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यात पळस, बेहडा, सीताफळ, बेल, पेरू, सीता, अशोक, हरडा, खैर, बदाम, काजू, रिठा, बकुळ, आवळा, अर्जुन अशा प्रजातींचा समावेश आहे. सद्यस्थितीमध्ये सदर वृक्षांचे घनदाट जंगलात रूपांतर होण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू आहे. त्यासोबत विविध प्रजातीची फुलपाखरे, पक्षी, कीटक यांचा नैसर्गिक अधिवास म्हणूनदेखील हे उद्यान विकसित होत आहे. निरनिराळ्या प्रजातींची झाडे विपुल प्रमाणात एकाच उद्यानात उपलब्ध असल्याने अनेक किशोरवयीन विद्यार्थी तसेच वनस्पती शास्त्राचे विद्यार्थी, वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी नागरिक या उद्यानास भेट देतात. पक्षीनिरीक्षण करणार्‍यांसाठी हे उद्यान म्हणजे पर्वणीच ठरत आहे.

विस्तीर्ण व विविध वैशिष्ट्यांमुळे या उद्यानाचे सौंदर्य सिनेसृष्टीलादेखील खुणावत आहे. या उद्यानात चित्रपट तसेच जाहिरातींचे चित्रिकरण करण्यासाठी वाढती मागणी असून पालिकेच्या प्रचलित धोरणानुसार विहित शुल्क आकारून चित्रिकरणाकरिता परवानगी देण्यात येते. मुंबई महानगरातील अनेक कॉर्पोरेट / व्यावसायिक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांसाठी विविध खेळाचे सामने या उद्यानाचा भाग असलेल्या मैदानी भागाच्या हिरवळीवर पालिकेची पूर्वपरवानगी घेऊन व आवश्यक शुल्क भरुन आयोजित करतात. एकूणच भक्ती पार्क उद्यान हे विरंगुळ्यासोबत पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील आगामी काळात अधिकाधिक आकर्षणाचा भाग ठरेल, यात शंका नाही.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content