Homeमुंबई स्पेशलचिकूवाडीतले पाम व...

चिकूवाडीतले पाम व सुगंधी उद्यान ठरतेय नवे आकर्षण!

मुंबईत, बोरिवली (पश्चिम)मधील चिकूवाडीत ओसाड जागेचे रुपांतर पाम उद्यान आणि सुगंधी उद्यानात करुन नंदनवन फुलवण्याची किमया मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने करुन दाखवल्याने या परिसराचे रुपच पालटले आहे.

कधीकाळी निर्मनुष्य भासणारा हा परिसर आता उद्यानांमध्ये येणाऱ्या आबालवृद्धांमुळे फुलून जातो. विशेष म्हणजे, या दोन्ही उद्यानांमध्ये असणाऱ्या शोषखड्डयांमुळे रिंगवेलद्वारे उपलब्ध होणारे पाणी उद्यानातील सिंचनासाठीच पुनर्वापरात येते. परिणामी दररोज सुमारे ३० ते ४० हजार लीटर पाण्याची बचत करण्याची किमयादेखील या उद्यानांनी साध्य केली आहे.

बोरिवली (पश्चिम) मधील चिकूवाडी येथे वसंत संकूलमागील परिसरात, मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेला सुमारे ५ एकर क्षेत्रफळाचा भूखंड सन २०१३मध्ये महापालिकेच्या ताब्यात आला. त्यावेळी ही जागा ओसाड स्वरुपाची व काहीशी दुर्लक्षितच होती. या भूखंडांच्या बाजूने एक मोठा नालादेखील वाहतो. स्वाभाविकच सदर परिसराच्या भौगोलिक विकासाला चालना मिळत नव्हती. त्यामुळेच हा परिसर काहीसा निर्मनुष्य होता. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने मनोरंजन मैदानासाठी आरक्षित या जागेवर उद्यान विभागाच्या माध्यमातून संकल्पीय उद्यानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

या जागेच्या मधोमध रस्ता जात असल्याने एका बाजूस पाम उद्यान (Palm Garden) तर दुसऱ्या बाजूस सुगंधी उद्यान (Scented Garden) ही संकल्पना निश्चित करुन उद्यानाची निर्मिती सुरू करण्यात आली. उद्यान विभागाने टप्प्या-टप्प्याने रोप लागवड करीत ३ ते ४ वर्षांच्या कालावधीत दोन्ही उद्याने तर फुलवलीच, पण त्यातून संपूर्ण परिसराचा कायापालटदेखील घडवून आणला. या उद्यानांमध्ये कोणतेही मोठे स्थापत्य बांधकाम करण्यात आले नसल्याने, अत्यंत वाजवी खर्चात उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे, हे विशेष!

जवळपास ७ हजार ७९५ चौरस मीटर जागेवर फुललेल्या पाम उद्यानाचे ‘गोपीनाथजी मुंडे मनोरंजन मैदान’ तसेच ६ हजार ८६२ चौरस मीटर जागेवरील सुगंधी उद्यानाचे ‘प्रमोदजी महाजन मनोरंजन मैदान’ असे नामकरण करण्यात आले आहे. या मैदानांवर फेरफटका मारणे म्हणजे निवांतपणाची सुखद अनुभूती ठरते. नेत्रसुखद हिरवळ आणि आसमंतात दरवळणारा सुगंध यामुळे नागरिकांची पावले आपसूकच या उद्यानांकडे वळतात. परिसरातील इमारतींमधूनही या उद्यानांचे सुंदर विहंगम रूप दिसते. बोरिवलीतील आकर्षक स्थळ म्हणून ही उद्याने आज प्रसिद्ध आहेत.

ह्या उद्यानांच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर मुंबई महानगरातील हे असे एकमेव ठिकाण आहे जिथे एकाच ठिकाणी पाम वृक्षाच्या एकूण १७ प्रजाती आहे. या सर्व प्रजाती मिळून सुमारे ७०० ते ८०० पाम वृक्ष येथे दिमाखात उभे आहेत. यामध्ये फॅन पाम, बॉटल पाम, त्रिकोणी पाम, खजूर, नारळ, सुपारी, शॅम्पेन पाम, रेड लॅटिन पाम, फॉक्सटेल पाम, फिशटेल पाम, बिस्मार्किया पाम, सिल्व्हर पाम, स्वाम्प फॅन पाम, लिव्हेस्टोनिया, मॅजेस्टिक पाम अशा विविध प्रजातीच्या पामची लागवड करण्यात आलेली आहे.

सुगंधी उद्यानात निरनिराळ्या प्रकारची सुगंधी फुलझाडे एकाच ठिकाणी आहेत. या उद्यानाच्या एका बाजूने मोठा नाला वाहतो. ही बाब लक्षात घेऊन प्रामुख्याने देशी सुवासिक फुलझाडांच्या प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. गुलाब, मोगरा, चाफा, कुंद, अनंत, प्राजक्त, कणेर, कामिनी, सायली, लिली, मधुमालती, केवडा अशा सुवासिक फुलझाडांबरोबरच गवती चहा, बासमती, अडुळसा, तुळशी अशा औषधी वनस्पतींचीसुद्धा लागवड या उद्यानात केलेली आहे.

या दोन्ही उद्यानांना मिळून दररोज सुमारे ६५ हजार लीटर पाण्याची सिंचनासाठी आवश्यकता असते. मात्र, उद्यानांमध्ये शोष खड्डे तयार करुन, त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा वापर हा उद्यानांतील सिंचनासाठी करण्यात येतो. परिणामी दररोज सुमारे ३० ते ४० हजार लीटर पाण्याची बचतही याठिकाणी होते, हे आणखी एक वैशिष्ट्य होय, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

दाट हिरवळ, उंच वाढलेले पाम वृक्ष तसेच विविध सुवासिक फुलझाडे यांचा परिणाम म्हणून या उद्यानांमध्ये रंगीबेरंगी फुलपाखरे बागडत असतात. विविध पक्ष्यांचा परिसरातील ये-जा वाढली आहे. अशा या उद्यानांना भेट देणे म्हणजे पुष्पप्रेमी, पक्षीप्रेमींसाठी पर्वणीच ठरते. जॉगिंग ट्रॅक, विविध प्रकारचे व्यायामाचे साहित्य, निवांत बसून संवाद साधण्यासाठी ठिकठिकाणी असलेले गजेबो, बाकं यामुळे बोरिवलीकरांना सातत्याने ही उद्याने खुणावत राहतात. विस्तीर्ण हिरवागार परिसर आणि निरनिराळ्या नागरी सुविधा असल्याने या दोन्ही उद्यानांमध्ये दररोज किमान १ हजारांहून अधिक आबालवृद्ध येतात.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content