Homeमुंबई स्पेशललसीकरण न झालेल्या...

लसीकरण न झालेल्या ८० % मुंबईकरांचा कोविडबाधितांशी संपर्क?

कोविड-१९ विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेद्वारे पालिका क्षेत्रात पाचवे सेरो सर्वेक्षण अर्थात रक्‍त नमुन्‍यांची चाचणी करुन प्रतिपिंड (अॅण्‍टीबॉडीज्) शोधण्‍याबाबतचे सर्वेक्षण करण्‍यात आले. सर्वेक्षणानुसार, एकूण ८६.६४ टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रतिपिंडांचे अस्‍त‍ित्‍व दिसून आले आहे. कोविडचे लसीकरण झालेल्‍या नागरिकांपैकी प्रतिपिंडे विकसित झालेल्‍यांची संख्‍या ९०.२६ टक्के तर लसीकरण न झालेल्‍यांपैकी ७९.८६ टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रतिपिंडे आढळली आहेत. याचाच अर्थ लसीकरण न झालेल्या मुंबईकरांमधल्या तब्बल ८० टक्के लोकांचा कोरोनाबाधितांशी वेगवेगळ्या कारणांमुळे संपर्क आला असल्याचे जाणकार सांगतात.

विशेष म्‍हणजे, मागील सर्वेक्षणांच्‍या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍येदेखील प्रतिपिंड विकसित होण्‍याचे प्रमाण वाढल्‍याचा निष्‍कर्षही यातून समोर आला आहे. दरम्‍यान, प्रतिपिंड आढळले तरी ते किती प्रमाणात सुरक्षितता प्रदान करतील, याची वैद्यकीय हमी देता येत नाही. त्‍यामुळे नागरिकांनी ढिलाई न करता, कोविड विषाणू संसर्ग होऊ नये म्‍हणून मास्‍कचा योग्‍य उपयोग, हातांची नियमित स्‍वच्‍छता, सुरक्षित अंतर इत्‍यादी कोविड प्रतिबंधासाठी अनुरुप वर्तणुकीचे पालन करणे आवश्‍यक आहे, असे पालिकेकडून स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

कोविड-१९ विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेद्वारे विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना कोविडच्या प्रसाराबाबत निश्चित अशी शास्त्रीय माहिती उपलब्ध करून घेणे गरजेचे असते. याचाच एक भाग असलेल्‍या सेरो सर्वेक्षणामध्‍ये रक्‍त नमुने घेऊन त्‍यातून प्रतिपिंड (अॅण्‍टीबॉडीज्) अस्‍त‍ित्त्‍वात आहेत किंवा कसे, याचा अभ्‍यास केला जातो. मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांमध्‍ये आतापर्यंत तीनवेळा तर एकदा लहान मुलांचे विशेष सेरो सर्वेक्षण करण्‍यात आले आहे.

या चार सर्वेक्षणानंतर, कोविडच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर, पुन्‍हा एकदा रक्तनमुनेविषयक सर्वेक्षण करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी दिले होते. त्‍यानुसार, १२ ऑगस्‍ट ते ८ सप्‍टेंबर २०२१ या कालावधीमध्‍ये पालिकेने पाचवे सेरो सर्वेक्षण राबवले. त्‍यातील निष्‍कर्ष आता जाहीर करण्‍यात आले आहेत.

पालिकेचा सार्वजनिक आरोग्‍य विभाग, शीव येथील लोकमान्‍य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्‍णालय यांच्‍या वतीने आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन व आयडीएफसी इन्‍स्‍ट‍िट्यूट यांच्‍या संयुक्‍त सहकार्याने हे पाचवे सेरो सर्वेक्षण राबविण्‍यात आले. शास्‍त्रोक्‍तरित्‍या यादृच्‍छ‍िक नमुना निवड पद्धतीचा (random sampling) वापर करून, वय वर्ष १८पेक्षा अधिक असलेल्‍या नागरिकांमध्‍ये हे सेरो सर्वेक्षण केले आहे. पालिकेचे दवाखाने तसेच खासगी वैद्यकीय व्‍यावसायिक यांच्‍याकडे येणाऱ्या विविध समाजघटकातील रुग्‍णांचा यामध्‍ये समावेश होता. अशा रितीने मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व २४ प्रशासकीय विभागात मिळून एकूण ८ हजार ६७४ नागरिकांचे रक्‍तनमुने संकलित करुन त्‍याची चाचणी करण्यात आली. सर्वेक्षण केलेल्‍या नागरिकांची माहिती नोंदविण्‍यासाठी मोबाईल अॅप्‍लिकेशनचा उपयोग करण्‍यात आला तसेच सर्वेक्षणामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी त्‍यांची संमतीदेखील घेण्‍यात आली.

या पाचव्‍या सेरो सर्वेक्षणातील ठळक निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे-

१. मुंबई महापालिका क्षेत्रातील या सर्वेक्षणात केलेल्‍या चाचण्‍यांपैकी एकूण ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये सेरो सकारात्मकता अर्थात संबंधित प्रतिपिंडे (Sero positivity / IgG Antibodies) आहेत. यामध्‍ये झोपडपट्टी परिसरांमध्‍ये सुमारे ८७.०२ टक्‍के तर बिगर झोपडपट्टी भागांमध्‍ये सुमारे ८६.२२ टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रतिपिंड आहेत.

२. सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार पुरुषांमध्ये ८५.०७ टक्के इतकी तर महिलांमध्ये ८८.२९ टक्के इतकी सेरो सकारात्मकता आढळून आली.

३. सर्वेक्षण केलेल्‍या नागरिकांपैकी सुमारे ६५ टक्‍के नागरिकांनी कोविड लस घेतली असून उर्वरित ३५ टक्‍के नागरिकांनी कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

४. लस घेतलेल्‍या नागरिकांचा विचार करता, सुमारे ९०.२६ टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रतिपिंड विकसि‍त झालेली आहेत.

५. ज्‍यांनी कोविड लस घेतलेली नाही अशा नागरिकांपैकी सुमारे ७९.८६ टक्‍के नागरिकांमध्‍येही प्रतिपिंड विकसित झाल्‍याचे दिसून आले.

६. सर्वेक्षणात घेतलेल्‍या नमुन्‍यांपैकी सुमारे २० टक्‍के आरोग्‍य कर्मचाऱ्यांचे होते. त्‍याचा विचार करता, या गटामध्‍ये प्रतिपिंड असण्‍याचे प्रमाण ८७.१४ टक्के इतके आहे.

७. विविध वयोगटांचा विचार करता, ८० ते ९१ टक्‍के दरम्‍यान सेरो-सकारात्‍मकता / प्रतिपिंड अस्‍त‍ित्त्‍व आढळून आले आहे.

या पाचव्‍या सेरो सर्वेक्षणातील ठळक अन्‍वयार्थ-

१. मागील सेरो सर्वेक्षणांच्‍या तुलनेत विचार करता, मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभाग मिळून, झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये प्रतिपिंड अस्‍त‍ित्त्‍व असणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्‍या वाढले आहे.

२. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे यांची तुलना करता, दोन्‍ही भागांमध्‍ये प्रतिपिंड विकसि‍त झाल्‍याचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. त्‍यामध्‍ये लक्षणीय असा फरक आढळलेला नाही.

३. पाचव्‍या सेरो सर्वेक्षणानुसार, झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांमध्‍ये जवळपास सारख्‍याच संख्‍येने प्रतिपिंड आढळून आली आहेत. दोन्‍ही परिसरांतील आकड्यांमध्‍ये दिसणारा फरक हा नगण्‍य आहे.

४. त्‍याचप्रमाणे, पुरुष व महिलांमध्येदेखील दिसलेली सेरो सकारात्मकता पाहता, या दोन्‍ही गटातील सेरो अस्‍त‍ित्त्‍वाच्‍या आकड्यांमध्‍येही किंचितसा फरक आहे.

५. कोविड लसीचा एकही डोस न घेतलेल्‍या नागरिकांच्‍या तुलनेत, लसीचा एक किंवा दोन्‍ही डोस घेतलेल्‍या नागरिकांमध्‍ये प्रतिपिंड हे लक्षणीयरित्‍या अधिक आढळले आहेत.

सर्वेक्षणातील सर्व निष्‍कर्ष आणि अन्‍वयार्थ पाहता, एक बाब प्रामुख्‍याने लक्षात घेतली पाहिजे की, ८६.६४ टक्‍के मुंबईकर नागरिकांमध्‍ये आढळलेली सेरो-सकारात्‍मकता / प्रतिपिंड अस्‍त‍ित्त्‍व गुणधर्मदर्शक (qualitative) चाचण्‍यांमुळे आढळून आले आहे. रक्‍त नमुन्‍यांमध्‍ये प्रतिपिंड आढळले असले तरी ते किती प्रमाणात सुरक्षितता देतील, याची वैद्यकीयदृष्‍ट्या हमी देता येत नाही. त्‍यामुळे नागरिकांनी गाफील न राहता, कोविडअनुरुप वर्तन निर्देशांचे (covid appropriate behaviour guidelines) पालन यापुढेही करणे महत्‍त्‍वाचे आहे, ही बाब पुन्‍हा एकदा अधोरेखित झाली आहे.

योग्‍यरित्‍या मास्‍क लावणे, साबण, पाणी / निर्जंतुकीकरण द्राव्‍य (सॅनिटायझर) यांचा नियमितपणे उपयोग करुन हातांची स्‍वच्‍छता राखणे, सार्वजनिक स्‍थळी सुरक्षित अंतर राखणे या सर्व बाबींचे सातत्‍याने पालन करणे आवश्‍यक आहे. कोविड लस घेतलेल्‍या नागरिकांमध्‍ये प्रतिपिंड आढळण्‍याचे प्रमाण अत्‍याधिक असल्‍याने कोविड लसीकरण मोहीम अधिक बळकट करण्‍याची शिफारसही सर्वेक्षणाच्‍या अभ्‍यासगटाने केली आहे.

महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उप कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. दक्षा शाह, लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्‍णालयाच्‍या सामुदायिक औषधी विभागप्रमुख डॉ. सीमा बनसोडे-गोखे, सूक्ष्‍मजीवशास्‍त्र विभागप्रमुख डॉ. सुजाता बावेजा यांनी प्रमुख अन्‍वेषक म्‍हणून या सर्वेक्षणामध्‍ये योगदान दिले. तर सह-अन्‍वेषक म्‍हणून नायर रुग्‍णालयाच्‍या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. जयंथी शास्त्री तसेच डॉ. पल्‍लवी शेळ‍के, डॉ. श्रीपाद टाकळीकर, डॉ. डेस्‍मा डिसूझा, डॉ. किरण जगताप, डॉ. कल्‍याणी इंगोले यांनी योगदान दिले. एटीई चंद्रा फाऊंडेशन व आयडीएफसी इन्‍स्‍ट‍िट्यूट यांचेदेखील या सर्वेक्षणास सहकार्य लाभले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content