मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड करण्याच्या प्रयत्नात पालिका प्रशासनाकडून ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. नोव्हेंबर महिन्याच्या नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अदा करण्याचे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले.
त्याआधी या विषयावर महापौरांनी आपल्या दालनात एक बैठक घेतली. उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, सभागृह नेते गणेश खणकर, काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी, एआयएमआयएमचे गटनेते विजय उबाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते यशवंत किल्लेदार, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या अमरीन अब्रहानी, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर

शिंदे, शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, सहआयुक्त (वित्त) देविदास क्षिरसागर, उपायुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांच्यासह पालिका कामगार / कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निकषांनुसार राज्यातील ३०० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्यातल्या या परिस्थितीचा सारासार विचार करून पालिकेतील गटनेते, पदाधिकारी, पालिका प्रशासन आणि कामगार-कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान एकत्रितपणे अदा करण्यात येणार आहे, असे नंतर महापौर तावडे यांनी सांगितले..

