“धुरंधर2“मुळे अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम कासकर हा नेमका कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्लीच प्रदर्शित झालेल्या धुरंधर 2, या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
अनेक दशकांपासून लपून बसलेल्या भारताच्या या सर्वात मोठ्या गुन्हेगाराचा छडा अद्याप लागलेला नाही. मात्र ताज्या घडामोडींनी या प्रकरणातील उत्सुकता शिगेला नेली आहे.
आपल्या भारतातून दाऊद इब्राहिमचे पलायन हे काही गुपित राहिलेले नाही. ‘बडे साहेब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाऊदने अत्यंत नियोजनबद्ध आपला भारत देश सोडला होता. 1980च्या दशकात तो दुबईत उघडपणे राहत असल्याचे अनेक अहवाल सांगतात. तिथे तो आलिशान आयुष्य जगत होता. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमध्ये दिसत होता आणि शारजाहमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांचा आनंदही घेत होता. त्यावेळी दुबई प्रशासनाने त्याच्या उपस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नेहमीच केला जातो.

मुंबईतील 1993च्या भीषण बॉम्बस्फोटानंतर, ज्यामध्ये शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेला, दाऊद इब्राहिमने आपला तळ दुबईहून पाकिस्तानातील कराचीमध्ये हलवला. भारतीय तपासयंत्रणांनी वारंवार दावे केले आहेत की, पाकिस्तानने दहशतवाद्यांना नेहमीच सुरक्षित आश्रय दिला आहे. तेव्हापासून दाऊद इब्राहिम कराचीमध्येच स्थायिक असल्याचे मानले जाते. जरी इस्लामाबादने नेहमीच दाऊद आपल्या देशात असल्याचा इन्कार केला असला, तरी आंतरराष्ट्रीय नोंदी मात्र वेगळीच कथा सांगतात. ऑगस्ट 2020मध्ये ‘फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स’च्या (FATF) दबावाखाली आल्यानंतर पाकिस्तानने स्वतः संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या यादीत त्याचे नाव कायम ठेवले आहे.
तसे पाहता तीन दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी, दाऊद इब्राहिम जिवंत असल्याचे मानले जाते. ‘धुरंधर 2’ चित्रपटामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आल्याने, मुंबईच्या गुन्हेगारी जगाचा हा काळा अध्याय आणि न्यायाची प्रदीर्घ प्रतीक्षा कधी संपणार, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनाला यानिमित्तानं पुन्हा एकदा पडला आहे. ‘धुरंधर 2‘, या हिंदी चित्रपटात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे चित्रण ‘बडे साहब’ या पात्राच्या रूपाने करण्यात आले असून, ही भूमिका अभिनेता दानिश इक्बाल याने साकारली आहे.

चित्रपटातील दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रमुख मुद्दे:
1) चित्रपटातील चित्रण आणि स्वरूप- ‘बडे साहब’चे पात्र: चित्रपटाच्या पहिल्या भागात ज्या ‘बडे साहब’चा उल्लेख आहे, तो दुसरातिसरा कोणी नसून दाऊद इब्राहिम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
2) शारीरिक अस्वास्थ्यता: चित्रपटात दाऊदला कराचीमध्ये अंथरुणावर पडलेला, आजारी आणि शारीरिकदृष्ट्या हतबल अवस्थेत दाखवला आहे. असे असूनही दाऊद इब्राहिम कराचीमधून भारताविरूद्ध गुन्हेगारी कट रचत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
3) रहमान डकैतसोबतचे संबंध: चित्रपटात दाऊद इब्राहिम आणि रहमान डकैत यांच्यातील संघर्ष व संबंधांवर प्रकाश टाकला आहे.
4) दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांची प्रतिक्रियाः प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘धुरंधर २’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र, दाऊदच्या चित्रणाशी त्यांनी असहमती दर्शवली.
त्यांच्या मते, दाऊद इब्राहिमने जवळपास २० वर्षांपूर्वीच सक्रिय गुन्हेगारी जगतातून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे चित्रपटात त्याला अशाप्रकारे सक्रिय दाखवणे चुकीचे आहे.
5) डी-कंपनीची अस्वस्थता (वास्तविक पडसाद): माध्यमांमधील वृत्तांनुसार, चित्रपटात दाऊदला एका आजारी, कमकुवत आणि जुनाट प्रतिमेत दाखवल्यामुळे ‘डी-कंपनी’ (D-Company) अस्वस्थ झाली आहे. चित्रपटाच्या वास्तववादी आणि संकुचित माईंडच्या चित्रणामुळे त्याची दहशत कमी होत असल्याची चर्चा रंगली आहे. धुरंधर २, या चित्रपटामधील दाऊदच्या भूमिकेबद्दल किंवा इतर पात्रांच्या संदर्भात आता अंडरवर्ल्डमध्येही चर्चेला उधाण आले असून प्रश्न निर्माण झाला आहे की दाऊद इब्राहिम कासकर जिवंत आहे काय?

(लेखक के. रवि (दादा) ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

