नितीन नबीन यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल दोनशेनऊ दिवसांनी पक्षसंघटनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. नव्या टीममधे पियुष गोयल, स्मृती इराणी यांचा समावेश झाला आहे. पक्षाच्या आयटी सेलच्या प्रमुखपदावरून अमित मालवीय यांची उचलबांगडी झाली असून त्या जागेवर छत्तीसगडचे दीपक म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमोच्या अध्यक्षपदी वडोदरा येथील ३५ वर्षं वयाचे लोकसभा खासदार डॉ. हेमांग जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या कार्यकारणीत विनोद तावडे कायम आहेत व त्यांना महाराष्ट्राचे प्रभारी नेमले आहे. महाराष्ट्रात पक्षाच्या होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात आता तावडे सन्मानाने बसलेले दिसतील तसेच प्रदेश भाजपावर त्यांचे बारीक लक्ष राहील. तावडे यांच्या नियुक्तीने समझनेवालों को इशारा काफी है, असे उघड बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे एकेकाळी लाडके असणाऱ्या अमित मालवीय यांना नव्या टीममधून हटवले गेले, याचीच पक्षात सर्वाधिक चर्चा आहे. केंद्र सरकारमध्ये वाणिज्य मंत्री म्हणून काम केलेल्या पियुष गोयल यांच्यावर राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांचे वडिल वेदप्रकाश गोयल हेसुद्धा पूर्वी पक्षाचे खजिनदार होते. महाराष्ट्रातून डॉ. भारती पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष, विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव, पियुष गोयल कोषाध्यक्ष, प्रीती गांधी आयटी सेल कोऑर्डिनेटर आणि शिवप्रकाश राष्ट्रीय संयुक्त महासचिव (संघटन) हे नबीन यांच्या नव्या टीममध्ये आहेत.
आयटी सेलचे इनचार्ज अमित मालवीय यांना का हटवले, यावर पक्षात अनेक तर्कवितर्क चालू आहेत. सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन, विरोधी पक्षांवर आक्रमक हल्ले चढविण्यासाठी व विरोधी नेत्यांना नामोहरम करणयासाठी भाजपाने सन २००७मध्ये आयटी सेल सुरू केला. प्रोद्युत्त बोरा यांनी सुरूवातीला पुढाकार घेतला होता. सन २०१०मध्ये अरविंद गुप्ता यांनी आयटीचे सेलचे प्रमुख म्हणून काम केले. २०१४च्या निवडणुकीत भाजपाच्या विजयात आयटी सेलचा मोठा वाटा होता. सन २०१५मध्ये अमित शाह यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर आयटी सेलच्या प्रमुखपदाची जबाबदारी अमित मालवीय यांच्यावर सोपविली. गेल्या अकरा वर्षांत अमित मालवीय यांनी आयटी सेलच्या माध्यमातून मोठा दबदबा निर्माण केला होता. परंतु जेन झी आंदोलनात भाजपाचा आयटी सेल फिका पडला. पक्षावर व सरकारवर होणारी टीका व हल्ले भाजपाच्या आयटी सेलला रोखता आले नाहीत. सर्व देशातून जेन झीकडून प्रकट होणाऱ्या असंतोषापुढे भाजपाचा आयटी सेल अपयशी ठरला, म्हणूनच अमित मालवीय यांना हटविण्यात आले असावे.

जेन झीच्या सोशल मीडियावरून केल्या जाणाऱ्या वेगवान व कल्पक प्रचाराला भाजपाचा आयटी सेल प्रत्युत्तर देऊ शकला नाही. जेन झीकडून अहोरात्र सरकारची बदनामी चालू असताना भाजपाचा आयटी सेल पराभूत झाल्याच्या मानसिकतेत काम करीत होता. म्हणूनच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर इंस्टाग्रामवरून जेन झीला आवाहन करण्याची पाळी आली. धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रीपदाचा द्यावा लागलेला राजीनामा ही सरकारवर मोठी नामुष्की होती. नवे आयटीसेल प्रमुख ५८ वर्षांचे दीपक म्हस्के छ्त्तीसगडचे आहेत. ते राज्यात पक्षाचे प्रवक्ते होते. बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुकीत सोशल मीडिया रणनीती व सांख्यिकी विश्लेषण त्यांनी केले आहे. २०२३मध्ये छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीन नबीन यांनी राज्याचे प्रभारी म्हणून काम करीत असताना दीपक म्हस्के यांच्या कार्यक्षमतेची नोंद घेतली. नव्या टीममध्ये दीपक म्हस्के यांच्याबरोबर प्रीती गांधी (महाराष्ट्र), शिवानंद व्दिवेदी (दिल्ली), उत्तराखंडचे आलोक भट्ट व हरियाणाचे अरूण यादव, या चौघांची सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या ६५ जणांच्या कार्यकारणीत राम माधव व स्मृती इराणी हे ताकदवान सदस्य समजले जातात. राम माधव २०२०पूर्वी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव होते. ईशान्य भारतात व जम्मू-काश्मीरमध्ये पक्षसंघटन विस्ताराचे ते काम करीत होते. काही वर्षे संघाच्या अ. भा. कार्यकारिणीवर त्यांनी काम केल्यावर त्यांच्यावर २०२४मध्ये भाजपाने जम्मू-काश्मीर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली. भाजपा व संघ यांच्यात समन्वयक म्हणून ते अनेक वर्षे काम करीत आहेत. सन २०२४मध्ये लोकसभा निवडणुकीत अमेठीतून पराभव झाल्यानंतर स्मृती इराणी दोन वर्षे पक्षसंघटन व सरकारपासून दूर होत्या. टीव्ही मालिकांमध्ये काम करायला त्यांनी पुन्हा सुरूवात केली होती. आता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवपदावर त्यांची नेमणूक केली आहे. त्या उत्तम वक्ता, पक्षाचा प्रभावी चेहरा आहेत, तसेच पक्षाच्या केडरशी त्यांचा थेट संपर्क आहे. पियुष गोयल यांच्या संघटन प्रवेशाने मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत मिळाले आहेत. एक व्यक्ती एक पद, या निकषानुसार त्यांना मंत्रीपद सोडावे लागेल. सन २०१४पूर्वी मोदी सरकार स्थापन होण्यापूर्वी ते पक्षाचे कोषाध्यक्ष होते. बारा वर्षांनंतर त्यांच्याकडे हीच जबाबदारी पुन्हा देण्यात आली आहे.

मोदी-शाह यांचे निकटर्तीय व संघस्वयंसेवक असलेल्या धर्मेद्र प्रधान यांना पक्षसंघटनेत कोणतेही स्थान मिळालेले नाही. जेन झीच्या आंदोलनाच्या दबावापुढे त्यांना शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. मंत्रीपदाचा राजीनामा देऊन एक महिनाही झालेला नाही. अनुराग ठाकूर यांना नव्या कार्यकारिणीत कोणतेही पद नाही. पक्षाचा हा आक्रमक युवा चेहरा आहे. तेजस्वी सूर्या पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे आता कोणतेच पद नाही. २०१९पासून ते बेंगळुरू दक्षिणमधून लोकसभेवर खासदार आहेत. उत्तम वक्ता व युवा चेहरा आहे. आम आदमी पक्षातून भाजपामध्ये आलेले राघव चड्डा यांना संघटनेत स्थान मिळालेले नाही. आपमधून आलेल्या डॉ. संदीप पाठक यांना सचिव नेमण्यात आले. नितीन नबीन यांच्या टीममध्ये बारा महिला आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री वसंधुरा राजे (राजस्थान), डी. पुरंदेश्वरी (आंध्र प्रदेश), रेखा वर्मा (उत्तर प्रदेश) , वर्षाबेन दोशी (गुजरात), डॉ. भारती पवार (महाराष्ट्र), डॉ. मधुचंद्र कर (प. बंगाल) या सहा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. याशिवाय स्मृती इराणी (युपी) , कविता पाटीदार (मध्य प्रदेश), फांगनोन कोन्याक (नागालँड), संगीता यादव (युपी), रूपकुमारी चौधरी (छत्तीसगड) व प्रीती गांधी (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. नव्या टीममध्ये ७३ वर्षांच्या वसुंधराराजे सर्वात ज्येष्ठ तर ३५ वर्षांचे डॉ. हेमांग जोशी सर्वात तरूण आहेत. अशी ही मिलीजुली ड्रीम टीम घेऊन भाजपाध्यक्ष नितीन नबीन पक्षाला किती पुढे नेतात ते पाहायचे!
(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

