Homeब्लॅक अँड व्हाईटकबड्डीची पंढरी.. तबेला...

कबड्डीची पंढरी.. तबेला मैदान.. नव्हे, श्रमिक जिमखाना!

ज्याप्रमाणे मुंबईतील दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क मैदान क्रिकेट खेळाची पंढरी म्हणून ओळखली जाते, तसाच काहीसा प्रकार परळ येथील गिरणगावातील ना. म. जोशी मार्गावर असलेल्या श्रमिक जिमखाना मैदानाबाबत, कबड्डी या अस्सल मराठमोळ्या खेळाबाबत म्हणता येईल. सुरूवातीच्या काळात “तबेला मैदान” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैदानातील तबेले मुंबई महानगरपालिकेने १९६०-६१च्या दरम्यान हटवले. मग त्या जागेवर महापालिका शाळेची भव्य आधुनिक इमारत बांधली गेली. शाळेची इमारत आणि मध्य रेल्वेच्या भिंतीलगत मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार केले गेले. त्यामुळे विभागातील मुलांना खेळण्यासाठी एक हक्काचे मैदान उपलब्ध झाले. या तबेला मैदानापूर्वी विभागातील विविध स्पर्धांचे आयोजन महापालिकेच्या मोगल हाऊस मैदानात, कामगार कल्याण केंद्राच्या मैदानात आणि इराणी चाळीच्या मैदानात होत असत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कामगार विभागात प्रथम संघ हुतूतू खेळायचे आणि तेच संघ मग कबड्डी खेळू लागले. अनेक मातब्बर संघ आणि कबड्डी खेळाडू याच गिरणगावाने महाराष्ट्राला, भारताला दिले. त्या काळात ‌त्या विभागात कबड्डीचे एकापेक्षा एक किमान ७०, ८० सरस संघ होते. अनेक नामवंत खेळाडू त्यातून खेळले.

हे तबेला मैदान झाल्यानंतर इतरत्र होणाऱ्या स्पर्धा या महापालिकेच्या मैदानात होऊ लागल्या. त्यासोबतच या मैदानात व्यवसायिक नाटके, बाल नाटके, ऑर्केस्ट्रा, तमाशेदेखील होऊ लागले. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या विविध क्रीडा स्पर्धा, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या विविध कबड्डी स्पर्धा, भोईर, पाटकर चषक स्पर्धा, ग्रामस्थांच्या विविध स्पर्धा, आंतरशालेय स्पर्धा, आंतरकॉलेज स्पर्धा, स्थानिक मंडळाच्या, संघाच्या कबड्डी स्पर्धा येथे नियमितपणे होऊ लागल्या. त्यामुळे कबड्डी खेळाला पोषक‌‌ असे वातावरण निर्माण झाले. येथील क्रीडाप्रेमींचे हे मैदान हक्काचे होऊन गेले. येथील विजय बजरंग व्यायाम शाळेने १९६३, ६४, ६५ असे सलग ३ वर्षे अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. त्यानंतर नुकतेच बंड्या मारूती सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय स्तरावर व्यवसायिक पुरुष कबड्डी स्पर्धेचे देखणे आयोजन केले. विजय बजरंग, बंड्या मारूती, शिवशक्ती, वीर बजरंग, एकता, नवोदित, दुर्गामाता, वंदे मातरम, बजरंग, सुनील, श्री हनुमान, श्री साई, ओम पिंपळेश्वर, अशोक मंडळ, देवी कोनजाय, आंबेडकर स्पोर्टस् क्लब, श्रीराम आदी कबड्डी संघाची मागणी होती की, कबड्डीसाठी एखादे चांगले स्टेडियम या परिसरात असावे. तेव्हाचे नगरसेवक पुरुषोत्तम भागवत, बबन दारवटकर, विवेक खाड्ये यांनी याकरीता विशेष प्रयत्न केले.

खाड्ये यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या तबेला मैदानाचे रुप पालटले. सर्व सोयींनी सुसज्ज असे स्टेडियम उभे राहिले. साधारण १ हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या या स्टेडियममुळे कबड्डी स्पर्धांचे आयोजन करणे सुलभ झाले. या स्टेडियमची देखभाल आणि नोंदणी महापालिकेच्या जी दक्षिण विभागामार्फत केली जाते. या स्टेडियमचे नामकरण करताना कुठले नाव द्यावे याबाबत बराच विचारविनिमय झाला. हा सारा परिसर कामगार विभाग म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे खाड्ये यांनी श्रमिक जिमखाना हे नाव सुचवले आणि त्यास लगेचच सर्वांनी होकार दिला. १९८३ साली झालेल्या या स्टेडियमच्या नामकरण आणि उद्घाटन समारंभाला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान, लिटील मास्टर सुनील गावस्कर, तेव्हाचे महापालिका आयुक्त सदाशिवराव

तिनईकर ‌प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आज या स्टेडियमचा लाभ डिलाईल रोड, ना. म. जोशी मार्ग, लालबाग, भायखळा, चिंचपोकळी, लोअर परळ या विभागातील अनेक क्रीडा‌ संस्था, मंडळ, विविध खेळाच्या संघटना घेत आहेत. राज्यातील प्रत्येक कबड्डी पटूचे स्वप्न या मैदानात खेळण्याचे असते. या स्टेडियमला विविध क्षेत्रातील अनेक बड्या मंडळीनी भेट दिली आहे. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, आर. आर. पाटील, कबड्डीमहर्षी शंकरराव साळवी, वामनराव महाडिक, दत्ताजी नलावडे, शाहिर साबळे, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त रमाकांत आचरेकर, शरद आचार्य, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कुस्तीपटू दारासिंग, अभिनेते मिथुन चक्रवर्ती, सलमान खान आदींचा समावेश आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी तर कबड्डी अंतिम फेरीच्या सामन्याचा आस्वाद चक्क प्रेक्षक गॅलरीतून कबड्डी रसिकांमध्ये बसून घेतला होता. सामना सुरु झाला आणि बाळासाहेबांनी स्टेज सोडून प्रेक्षक गॅलरीकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे स्पर्धा आयोजक आणि सुरक्षारक्षक यांची मात्र‌ एकच तारांबळ उडाली. तेव्हा या मैदानात सलग पाच पाच दिवस सामने चालायचे. रविवारी सकाळचे सामने असायचे. अवघे दोन, तीन रुपये तिकिट असायचे. स्टेडियममध्ये शिरताना प्रत्येक प्रेक्षकाच्या हातावर रबरी स्टॅपचा शिका मारला जात असे. आज सुनील स्पोर्ट्स क्लब, नवोदित, गुड मॉर्निंग या पुरुष संघाचा आणि श्री स्वामी समर्थ महिला कबड्डी संघाचा येथे नियमित सराव सुरु असतो. कराटेचे वर्ग नियमित चालतात. कबड्डी सामने नसतील तेव्हा क्रिकेटचे सामने जोरात सुरु असतात. विवेक खाड्ये यांच्या पुढाकाराने मैदानाजवळ एसी लायब्ररी, दवाखाना, छोटी बाग सुरु करण्यात आली आहे. २००६-२००७मध्ये स्थानिक नगरसेवक सुनील शिंदे यांच्या नगरसेवक फंडातून स्टेडियमची डागडुजी करण्यात आली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या नगरसेवक निधीतून पुन्हा या स्टेडियमची डागडूजी केली. एप्रिल महिन्यात श्रमिक जिमखाना मैदानाला ६० वर्ष पूर्ण झाली. तसेच वरळी येथील अमर प्रेम क्रीडा मंडळालादेखील ५० वर्ष पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून‌ आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून श्रमिक जिमखाना मैदानात एका भव्य सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी राणाप्रताप तिवारी, राजेंद्र अधटराव, विकास पाटील यांचेदेखील मोलाचे सहकार्य मिळाले.

या सोहळ्यात हरिष परब, किसन भुईंबर, अशोक गुरव, तसेच कबड्डी स्पर्धांचे नियमित आयोजन करण्याऱ्या मंडळाचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये आर्य‌ सेवा मंडळ, शिवनेरी सेवा मंडळ, अमर मंडळाचा समावेश होता. वडाळा येथे भारतीय क्रीडा मंदिरात विश्व चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्याऱ्या साऊथ कॅनरा स्पोर्टस् क्लब, हिंदमाता सेवा मंडळाचादेखील विशेष गौरव करण्यात आला. सदानंद शेट्ये, शांताराम जाधव, अशोक शिंदे, राजt भावसार, शंकुतला खटावकर, माया आक्रे मेहेर, मोनिका नाथ बाक्रे या खेळाडूंना गौरविण्यात आले. महिला कबड्डीपटूंनी कधी नव्हे ते नऊवारी साडीत खास रॅम्पवर चढाई केली. नृत्य‌दिग्दर्शक‌ गुरु कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ललिता सुर्वे, लता कंटक, प्रतिमा मांजरेकर, जयश्री सुवर्णा, मनिषा गावंड, तृप्ती सुवर्णा, हिमाली नार्वेकर, हर्षदा नलावडे, दीपा पेडणेकर, सोनम पोळे या कबड्डी खेळाडूंनी “ए राजे जी रंजी” या गीतावर सादर केलेल्या देखण्या सादरीकरणाने कबड्डीरसिकांची मनं जिंकली. या शानदार सोहळ्यामुळे पुन्हा एकदा भूतकाळातील सुवर्ण क्षणांना उजाळा मिळाला. या सोहळ्याला उद्धव ठाकरे, धनराज पिल्ले, क्लेरेन्स‌ लोबो, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अजय चौधरी, महेश सावंत, महादेव देवळे, किशोरी पेडणेकर आदि उपस्थित होते. भावी काळात येथे अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असे “इनडोअर” स्टेडियम उभे राहवे अशी स्थानिक क्रीडाप्रेमींची मागणी आहे. त्याकडे हे लोकप्रतिनिधी लक्ष देतील अशी आशा करुया.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

वर्ल्डकप तिरंदाजीत दीपिका कुमारीचा डबल रोल!

शांघाय, चीन येथे झालेल्या तिरंदाजीतल्या वर्ल्डकप मालिकेतील दुसऱ्या टप्प्यात भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना "रिर्कव्ह" विभागात सुवर्णपदकावर अचूक निशाणा साधला. या स्पर्धेत भारतीय संघाने आशिया खंडातील बलाढ्य देश दक्षिण कोरियाला उपांत्य फेरीत आणि यजमान चीनला अंतिम फेरीत नमवून...

तब्बल ५० वर्षांनंतर श्रमिक जिमखान्यात रंगली अ. भा. कबड्डी!

मुंबईतल्या ना. म. जोशी मार्गावरील बंड्या मारूती सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिवसेना‌प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून‌ कबड्डीच्या पंढरीत, श्रमिक जिमखाना मैदानात अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे देखणे, दिमाखादार असे नुकतेच आयोजन केले. रंगतदार, चुरशीच्या, अटीतटीच्या...

नर्तकीप्रमाणे कोर्टवर वावरणारा बॅडमिंटनपटू अखेर निवृत्त!

डेन्मार्कचा दिग्गज बॅडमिंटनपटू ३२ वर्षीय व्हिक्टर अॅक्सेलसेनने अखेर पाठदुखापतीच्या गंभीर आजारामुळे आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला विराम देऊन बॅडमिंटनची रॅकेट कायमस्वरुपी खाली ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल. शरीराची साथ त्याला मिळाली...
Skip to content