Homeमाय व्हॉईसपोटनिवडणुका ठरवतील भवितव्य...

पोटनिवडणुका ठरवतील भवितव्य सहानुभूतीच्या लाटेचे

राज्यात एप्रिलअखेर बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक होत आहे तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीची निवडणूक होत आहे. पोटनिवडणूक, या सहानुभूतीवर जिंकल्या जातात. त्यामुळे विरोधी पक्षही या निवडणुका लढवण्यास इच्छुक नसतो.

बारामतीची निवडणूक अजितदादांच्या लोकप्रियतेमुळे बिनविरोध करावी असा प्रयत्न त्या पक्षाच्या नेत्यांचा होता. मात्र काँग्रेसने सुरुवातीला यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून याव्यात यासाठी पाठिंबा दिला. काँग्रेसला या निवडणुकीत पराभव होणार हे माहीत असतानासुद्धा त्यांनी तिथे उमेदवार दिला. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला असताना काँग्रेसने आपला उमेदवार दिला. काँग्रेस ही भाजपची परंपरागत विरोधक आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना न जुमानता आपला उमेदवार दिला. अजितदादांचा पक्ष भाजपचा साथीदार असताना काँग्रेसची भूमिका योग्यच होती. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आता जेमतेम शिल्लक आहे. शरद पवार यांची शेवटची इच्छा अशी होती की, सुप्रिया सुळे राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात. परंतु सध्या शरद पवार यांची तब्येत पाहता आणि सुप्रिया सुळे यांचे राजकारण पाहता शरद पवार यांचा पक्ष पुढच्या निवडणुकीत पंचवीसही जागा मिळवू शकणार नाही अशी अवस्था आहे. अजितदादा हयात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय मागे पडला आहे. शरद पवार महाराष्ट्रभर फिरले तरच काहीतरी वेगळा निकाल लागू शकतो. परंतु अजून तीन वर्षांनी शरद पवार महाराष्ट्रभर फिरू शकतील, अशी त्यांची तब्येत राहिलेली नाही. पुढेही शरद पवारांची स्पेस काँग्रेस पक्ष भरून काढू शकतो, अशी काँग्रेस नेत्यांना आशा असल्याने त्यांनी आतापासूनच भाजप आणि महायुतीतील पक्षांच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

पोटनिवडणुका

बरेच आढेवेढे घेतल्यानंतर आणि शरद पवार तसेच रोहित पवार यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वापुढे नाकदुऱ्या काढल्यानंतर काँग्रेसने आपला उमेदवार अखेर शेवटच्या दिवशी मागे घेतला. तरीही काही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेतच. परिणामी ही पोटनिवडणूक होणारच आहे. फक्त सुनेत्रा पवार यांची बाजू भक्कम आहे आणि बारामतीतल्या जनतेचा कौल पाहता त्यांच्या विजयात फारशी अडचण येणार नाही. उद्धव ठाकरे यांचे धरसोड वृत्तीचे राजकारण पाहता पुढच्या विधानसभा निवडणुकीत ते कितपत टिकतील, हे काळच ठरवेल. जिल्हा परिषद आणि नगरपरिषदा निवडणुका उद्धव ठाकरे यांनी फारशा गंभीर घेतल्या नाहीत. त्याचे परिणाम त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भोगावे लागणार आहेत. लाटेचे राजकारण संपले आहे. यापुढे कोणतीही लाट त्यांना सावरू शकणार नाही.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला असला तरी या पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा भाचा प्राजक्त तनपुरे यांनी अचानक यु टर्न घेतल्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. प्राजक्त तनपुरे अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरणार होते. विशेष म्हणजे प्राजक्त तनपुरे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास राज्यमंत्री होते. परंतु निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनवरून घेतला. त्यानंतर कर्डिले यांचा अर्ज भरण्यास नगरमध्ये दाखल झालेले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही बंद दाराआड त्यांच्याशी चर्चा केली. शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपने संधी दिली आहे. कर्डिले यांच्या सहानुभूतीचा त्यांना कितपत फायदा होईल ते आता अजिबात सांगू शकत नाही. नगर जिल्ह्याचे राजकारण याबाबत कोणीही भाकीत व्यक्त करू शकत नाही. निवडून आलेला आमदार पुढच्या निवडणुकीत त्याच पक्षात राहील की नाही याची खात्री नसते. नगर जिल्ह्यातील आताचे सर्व आमदार एकेकाळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या नेत्याला घरी बसवणारा हाच नगर जिल्हा आहे. त्यामुळे या निवडणुकीत अक्षय कर्डिले की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार हे शेवटच्या क्षणापर्यंत कोणताही राजकीय निरीक्षक सांगू शकत नाही.

पोटनिवडणुका

या दोन पोटनिवडणुकांवरून राज्याचे राजकारण घुसळून निघाले असले तरी महाविकास आघाडीतील फुटीची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने बारामतीत सुरुवातीला उमेदवार देऊन या चर्चेला तोंड फोडले. या निवडणुकीत त्यांनी माघार घेतली असली तरी ते पुन्हा निवडून येऊ शकतात याची त्यांना खात्री आहे. 1980मध्ये मोठमोठे नेते काँग्रेसला सोडून गेले होते. सत्ता आल्यानंतर ते पुन्हा परतले. त्यामुळे काँग्रेसने या निवडणुकीत घेतलेली ही भूमिका त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कधीही अजितदादांच्या पक्षात विलीन होईल. फक्त एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्रास देतात याच एका मुद्द्यावर खुश होणारे उद्धव ठाकरे भविष्यात फारशी प्रगती करू शकणार नाहीत. त्यांच्याच पक्षाचे खासदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यासोबत राहतील का, हाच मोठा यक्ष प्रश्न आहे.

(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्क- 9892514124)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

ठेवी शाबूत राखण्याचे आव्हान मुंबईच्या आयुक्त पेलतील का?

महाराष्ट्रात आयएएस पोस्टिंग झाली की प्रत्येक अधिकाऱ्याची मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव हे स्वप्न असते. त्याचबरोबर आयपीएस अधिकाऱ्याची पोस्टिंग महाराष्ट्रात झाली की त्यांचे स्वप्न मुंबई शहराचे पोलीस आयुक्तपद हे असते. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपद नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी...

चमत्कार को नमस्कार! भय्यू महाराज ते कॅप्टन खरात!!

2010नंतर इंदूरचे अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांचे प्रस्थ राजकारणात बरेच वाढले होते. मूळचे महाराष्ट्रातील भय्यू महाराज यांची सोलापूर भागात मोठ्या प्रमाणात जमीनही होती. मराठा संस्थानिकांपैकी एक संस्थानिक त्यांचे पूर्वज होते असे त्यांचे निकटवर्तीय सांगत. या भय्यू...

राज्यसभेची सातवी जागा आणि महाविकास आघाडीतली बेकी!

राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 16 मार्चला या निवडणुका होत असून राज्यातून सात खासदार नव्याने राज्यसभेवर जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, रायगडमधील पेणचे धैर्यशील पाटील, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील आणि...
Skip to content