Homeमुंबई स्पेशलसांताक्रूजच्या व्ही.एन. देसाई...

सांताक्रूजच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात लवकरच ‘डि.एन.बी.’ अभ्यासक्रम!

मुंबईच्या सांताक्रूज पूर्व परिसरातील मुंबई महापालिकेच्या व्ही. एन. तथा वि. ‌न. देसाई रुग्णालयात लवकरच ‘डी.एन.बी.’ अभ्यासक्रम सुरू होणार असून यामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या वैद्यकीय सेवासुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये सांताक्रुज पूर्व परिसरातील वि.न. देसाई हे २७६ खाटांचे एक महत्त्वाचे रुग्णालय आहे. ‘कोविड-१९’, या साथ रोगाच्या काळात या रुग्णालयाने पश्चिम उपनगरवासियांना प्रभावी सेवा दिली आहे. कोविडबाधित रुग्णांवर उपचार, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण याबरोबरच विविध वैद्यकीय उपचार आणि सेवासुविधा या रुग्णालयाद्वारे देण्यात येत आहेत.

“आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास” यानुसार अव्याहतपणे सेवासुविधा देणाऱ्या या रूग्णालयात २७ वरिष्ठ डॉक्टर, ४० निवासी वैद्यकीय अधिकारी, १४३ परिचारिका, ६५ वॉर्डबॉय आणि २४३ इतर कर्मचारी कार्यरत आहेत. या रुग्णालयात लवकरच ‘डी.एन.बी. अभ्यासक्रम’ सुरू होत असून यामुळे मुंबईकर नागरिकांना अधिक प्रभावी वैद्यकीय सेवा सुविधा मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या वि. न. देसाई रुग्णालयात आकस्मिक वैद्यकीय उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांवर आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास उपचार केले जातात. या अनुषंगाने अनेक रुग्णांना त्यांच्यावरील वैद्यकीय उपचारांची गरज लक्षात घेऊन रुग्णालयात वेळोवेळी दाखलही करण्यात येते. त्यामुळे आकस्मिक वैद्यकीय सेवेसाठी नोंदणी करण्याची अर्थात केसपेपर काढण्याची प्रक्रियाही आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास सुरू असते. या अंतर्गत दररोज साधारणपणे ५० रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येते. ज्या रुग्णांना अत्यंतिक प्रभावी वैद्यकीय उपचारांची गरज असते, अशा रुग्णांना महापालिकेच्या सर्वोपचार रुग्णालयांमध्ये महापालिकेच्याच रुग्णवाहिकेद्वारे आवश्यक ती काळजी घेत पाठविले जाते.

याव्यतिरिक्त किरकोळ वा प्राथमिक स्तरीय वैद्यकीय उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी बाह्य रुग्णसेवेची (ओपीडी) नोंदणीही सुट्टीचे दिवस वगळता रोज सकाळी ८ वाजता सुरू होते. या रुग्णालयांमध्ये दररोज सरासरी १ हज़ार ३०० रुग्णांची ‘ओपीडी’ नोंदणी करण्यात येऊन त्यांच्यावर बाह्यसेवा पद्धतीने उपचार केले जातात.

या रुग्णालयात ऑगस्ट २०२१मध्ये (१४ ऑगस्ट २०२१ पर्यंत) ३२ प्रसूती करण्यात आल्या. तर जुलै २०२१मध्ये १०३, जून २०२१मध्ये १११; मे २०२१मध्ये १४३ प्रसूति करण्यात आल्या. गेल्या काही वर्षांची आकडेवारी लक्षात घेतल्यास, रुग्णालयामध्ये दर महिन्याला सरासरी ११८ प्रसूती केल्या जातात.

या रुग्णालयात महिलांची प्रसूतिपूर्व तपासणीदेखील नियमितपणे करण्यात येत असते. या अंतर्गत ऑगस्ट २०२१मध्ये १४ तारखेपर्यंत ६११ रुग्णांची प्रसूतिपूर्व तपासणी करण्यात आली. त्यापूर्वी म्हणजे जुलै २०२१मध्ये १ हजार १६३, जून २०२१मध्ये १ हजार ३५७,  मे २०२१मध्ये ९४५ महिलांची प्रसूतिपूर्व तपासणी करण्यात आली. या रुग्णालयामध्ये दर महिन्याला सरासरी १ हजार १५५ महिलांची प्रसूतिपूर्व तपासणी करण्यात येते.

या उपनगरीय रुग्णालयामध्ये स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. या विभागात गरजू महिलांवर वैद्यकीय उपचारक्रमानुसार आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्यासह शस्त्रक्रियादेखील करण्यात येतात. यानुसार ऑगस्ट २०२१मध्ये १४ तारखेपर्यंत ४५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर त्यापूर्वी म्हणजे जुलै २०२१मध्ये ९५ शस्त्रक्रिया, जून २०२१मध्ये ९० व मे २०२१मध्ये ८० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सदर रुग्णालयामध्ये दर महिन्याला सरासरी ९० इतक्या स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रिया केल्या जातात.

मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणून या रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा भाग असणारा ‘डीएनबी’ अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजित आहे. त्याअनुषंगाने येथील रुग्णशय्येच्या प्रमाणात वर्ग १ व २चे प्रत्येकी २, यानुसार एकूण ४ अनुभवी ‘डीएनबी’ शिक्षक यापूर्वीच नियुक्त करण्यात आले आहेत. या अनुभवी शिक्षकांद्वारे देसाई रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात अहोरात्र सेवा दिली जात आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content