तुम्ही आम्ही जनसामान्य असो.. वा खेळाडू, कलाकार असो.. साधा ताप, सततचा खोकला, सर्दी, पोटदुखी, लहानमोठा अपघात, कधी काही दिवस रुग्णालयात राहवे लागणे असो, एकूणच वाईट. चित्रपटाचा सेट लागलाय. सायलेन्स, कॅमेरा, ॲक्शन असे दिग्दर्शक सूचना देतोय. काही टेक-रिटेक होताहेत. अखेरीस एक टेक ओ. के. होतो. एकेक दिवस करत करत चित्रिकरण सत्र पुढे चाललंय आणि अचानक लावणी नृत्य सादर करीत असतानाच एका टेकच्या वेळी ॳगठ्याला चांगलाच मार बसतो. कळवळायला होते. दिग्दर्शक जोराने म्हणतो, कट… लाईटस ऑफ.. त्या दिवसाचे चित्रिकरण थांबवण्यात येते आणि मग समजते, ॳगठ्याला झालेली जखम साधीसुधी गोष्ट नाही. काही दिवस पायाला फ्रॅक्चर आणि साहजिकच सक्तीची विश्रांती… लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित “ईठा” या चित्रपटाच्या लावणी नृत्याच्या चित्रिकरणाच्या वेळेस श्रद्धा कपूरच्या ॳगठ्यास मोठीच जखम झाली आणि तिला साहजिकच काही दिवस घरी आराम करावा लागला.
पर्यायच नव्हता. नोव्हेंबर महिन्यात ही घटना घडली. हा चित्रपट लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चरित्रपटासाठी अभिनेत्री कोण बरे असेल याची बरेच दिवस असलेल्या उत्सुकतेला श्रद्धा कपूर हे उत्तर मिळाले. श्रद्धा कपूरला मराठी अतिशय उत्तम येते हे विशाल भारद्वाज दिग्दर्शित “हैदर” या चित्रपटाच्या निमित्ताने भेटलो असता लक्षात आले. तिची आई शिवानी कोल्हापुरे ही महाराष्ट्रीय असल्याने श्रद्धा कपूरला मराठी बोलता येते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण या चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी एखाद्या मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीची निवड व्हावी, अशी कुजबुज सुरु होती म्हणून हे सगळे सांगावे लागले.

श्रद्धा कपूर आता पूर्णपणे बरी झाली असून “ईठा”च्या सेटवर सहभागी झाली आहे. मढ येथे या चित्रपटासाठी ग्रामीण वस्ती, भलीमोठी जत्रा यांचा सेट लागला. असं सेटवर शूटींग करताना कलाकार जखमी होणे अधूनमधून घडत असते. मनमोहन देसाई दिग्दर्शित “कुली”च्या बेंगळुरू येथील सेटवर मारहाणीच्या दृश्यात पुनीत इस्सारचा ठोसा चुकवण्याच्या प्रयत्नात अमिताभ बच्चनच्या पोटात एका टेबलाचा कोपरा लागल्याने तो विव्हळला. सुरुवातीला साधी वाटलेली जखम मग गंभीर ठरली. अमिताभला मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि काही दिवसांनी बरा झाल्यावर रुग्णालयातून घरी निघालेला अमिताभ अतिशय अशक्त आणि उदास दिसत होता.
एकदा अनिल कपूर असाच जखमी झाला आणि दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या “हमला” या चित्रपटाचे चित्रिकरण फारच विस्कळीत झाले. मला आठवतंय परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत मदन मोहला निर्मित या चित्रपटाचा अतिशय भारी मुहूर्त झाल्यावर एकेक चित्रिकरण सत्र सुरू झाले. वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये किमी काटकरवर एक ग्लॅमरस गीत नृत्याचे चित्रिकरण असताना एन. चंद्रा यांच्या आमंत्रणावरुन तेथे शूटींग रिपोर्टीगसाठी सेटवर गेलोही. अनिल कपूर बरा होऊन पुन्हा एकदा कामाला लागला. तरीही चित्रपट फार रखडून पडद्यावर आला. कारण या चित्रपटात अशोककुमार, धर्मेंद्र, अनिल कपूर, मीनाक्षी शेषाद्री, किमी काटकर, अनुपम खेर, शफी इनामदार असे सगळेच बिझी कलाकार असल्याने सगळ्यांच्या तारखा मिळणं आणि जुळणे अवघड झाले.

सिनेपत्रकारिता करताना कधी असेही काही वेगळे अनुभव येतात. सिनेमाचे जग हे केवळ आर्थिक डोलारा (तरीही अनेक लहानमोठ्या कलाकारांचे पैसे बुडतात), ग्लॅमर (आपण आपल्या घरीदेखील सेलिब्रिटी असतो असे नसते), गाॅसिप्स (आता ते बेचव झाले आहे, आजची जेन झी पिढी स्वतःच आपली लफडी आणि झटपट, पटपट घटस्फोट सांगते) आणि फिल्मी गप्पा (त्यात चित्रपटाचे प्रमोशनच) यापुरते नाही तर सिनेमाच्या या जगात आजारपण, जखमाही असतात. एक कलाकार आजारी पडतो वा जखमी होतो तेव्हा बरेच काही घडत-बिघडत असते. लहानमोठ्या आजाराने आपण जनसामान्यच हैराण होतो असे नाही तर सेलिब्रिटीजच्याही वाटेला या गोष्टी येतात. त्याची बातमी होते एवढाच काय तो मोठा फरक. आपल्या कामावर आपली “श्रद्धा” असावी आणि आहेही… पण साधं चालतानाही पाय मुरगळू शकतो अथवा ॳगठ्याला जखम होऊ शकते…
(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

