भारतीय रेल्वेने मौनी अमावस्येनिमित्त 244 विशेष रेल्वेगाड्या चालवल्या, ज्यातून फक्त दोन आठवड्यांत साडेचार लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. 18 जानेवारीला प्रयागराजमध्ये 40 विशेष गाड्यांनी नियमित सेवांमध्ये कोणताही व्यत्यय न आणता 1 लाख प्रवाशांसाठी सेवा उपलब्ध केली.
भारतीय रेल्वेने मौनी अमावस्येच्या काळात रेल्वे वाहतुकीचे यशस्वी व्यवस्थापन केले. 3 जानेवारीपासून देशभरात 244 विशेष रेल्वेगाड्या चालवून भाविकांसाठी सुरळीत प्रवासाची खात्री केली. उत्तर रेल्वेवर 31, उत्तरमध्य रेल्वेवर 158 आणि पूर्वोत्तर रेल्वेवर 55 अशा विशेष रेल्वेगाड्यांमधून सुमारे 4.5 लाख प्रवाशांनी प्रवास केला. सणासुदीच्या काळात त्रासमुक्त आणि सुरक्षित प्रवासाची सोय व्हावी यासाठी या विशेष सेवांचे नियोजन करण्यात आले होते.
18 जानेवारीला प्रयागराजमध्ये सणासुदीच्या प्रवासाचा उच्चांक दिसून आला. उत्तर रेल्वेवर 11, उत्तरमध्य रेल्वेवर 22 तर पूर्वोत्तर रेल्वेवर 7 गाड्यांसह एकूण 40 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. त्यातून अंदाजे 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे यावेळी सर्व नियमित गाड्या नियोजित वेळेनुसार धावल्या. या विशेष गाड्यांचे यशस्वी परिचालन सणासुदीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि अखंड सेवा प्रदान करण्याच्या रेल्वेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. मोठ्या प्रमाणावरील प्रवासी वाहतूक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी भारतीय रेल्वे तंत्रज्ञान, संसाधन नियोजन आणि विविध विभागांमधील समन्वयाचा वापर करत आहे.

