संपूर्ण देशात बॉक्स ऑफिसवर तुफान चाललेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटावर सहा आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट पाकिस्तानविरोधी असल्याचा आरोप करत आखातातल्या सौदी अरेबिया, बाहरीन, आबुधाबी, संयुक्त अरब अमिरात, कतार आणि कुवेतमध्ये धुरंधर, चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याऊलट पाकिस्तानात मात्र हा चित्रपट पाहण्यास तरूण-तरुणींची झुंबड उडत असून हा चित्रपट पाकविरोधी नाही, असा सूर त्यांच्या प्रतिक्रियेतून उमटत असल्याचे चित्र वृत्तवाहिन्यांवर दिसत आहे.
हिंदी सुधारलं, अभिनय सुधारला, अक्षय खन्ना धुरंधर, या चित्रपटात मात्र भाव खाऊन जातो.. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या यशातील एक महत्त्वाचा फंडा, त्यांचे अतिशय शुद्ध हिंदी हेदेखील आहे. दिलीप कुमारचा उर्दूवरचा प्रभाव के. असिफ दिग्दर्शित “मुगल ए आझम” (१९६०) दिसतो, अमिताभचे हिंदीवरचे प्रभुत्व “कौन बनेगा करोडपती”मध्ये पंचवीसाव्या वर्षीदेखील दिसतेय आणि शाहरुखचे “पठाण” वगैरे चित्रपट विदेशात घडताहेत आणि त्यात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा भरपूर वापर असला तरी शाहरुखचे हिंदी एकदम चोख. अक्षय खन्ना विनोद खन्नाचा पुत्र असला तरी तो चित्रपटसृष्टीत आला तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व इंग्रजाळलेले होते. विनोद खन्नाने आपल्या या पुत्रासाठी पंकज पराशरकडे दिग्दर्शन सोपवत “हिमालयपुत्र” या चित्रपटाची निर्मिती केली. मला आठवतंय, एका इंग्रजी सायंदैनिकात याची ब्रेकिंग न्यूज येताना विनोद खन्ना चार नवतारकांसोबत असल्याचे छायाचित्र लक्ष वेधून घेत होते. त्यात हॅन्डसम विनोद खन्नाच जास्त लक्ष वेधून घेत होता हे वेगळे सांगायला नकोच. त्याने आपल्या पुत्रासाठी नवतारका आणल्या असल्या तरी विनोद खन्नामुळे ही बातमी महत्त्वाची होती.
पहिलेच मोठे चित्रिकरण सत्र हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे आयोजित करण्यात आले. ही १९९४ सालची गोष्ट. त्याच वर्षीचा बहुचर्चित चित्रपट विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित “१९४२ अ लव्ह स्टोरी”च्या चित्रिकरणामुळे डलहौसी गाजत होते आणि अशातच मुंबईतील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांचा (मराठीतील मी एकमेव होतो) शूटींग रिपोर्गिंसाठी डलहौसीचा दौरा ठरला. नवी दिल्लीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक रात्र मुक्काम केल्यावर दुसऱ्या दिवशी विमानाने जम्मू आणि मग रस्तामार्गे सहा तासाने डलहौसीला पोहोचताच कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी विनोद खन्नाने लगोलग भारी कोट आणि टोपी दिली. आता अक्षय खन्नाशी आमची त्याने हिंदीत ओळख करून दिली आणि लगोलग इंग्रजी बोलण्यापूर्वी पटकन म्हणाला, आज के जनरेशन को हिंदी नहीं आती… बहोत अंग्रेजी झाडते है (आजही हे बोल कानात घुमत आहेत.) अक्षय खन्नाचे हायफाय इंग्रजी आणि चेहऱ्यावर कसलेले हावभाव नसणं हे सगळे पाहून “हा वन फिल्म वंडर हिरो” ठरणार हे स्पष्ट होते. असे अनेक कोरडे चेहरे, खोटे सिक्के चित्रपटसृष्टीत येतात आणि जातातही. त्यात “हिमालयपुत्र” पडद्यावर आला तोच फ्लाॅप झाला.

विनोद खन्नाचा पुत्र म्हणून आणखी काही चित्रपट मिळाले. पण अक्षय खन्नाच्या हिंदी बोलण्यात फार प्रगती दिसत नव्हती. एका मोठ्या अभिनेत्याचा मुलगा म्हणून मिळायची तेव्हढी संधी मिळाली. पण प्रेक्षक तिकीट आणि वेळ काढून चित्रपट एन्जॉय करायला येतो, त्या चित्रपटरसिकांना असा “कच्चा माल” अथवा न शिजलेले अन्न कसं पचनी पडेल? कलेच्या क्षेत्रात गुणवत्ता, निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि वागणूक महत्त्वाची असते. जे. पी. दत्ता दिग्दर्शित “बाॅर्डर”मध्ये अक्षय खन्नाच्या अभिनयात सुधारणा दिसली. जे. पी. दत्ता हा दिग्दर्शक कलाकारांचे कधीच लाड करीत नाही. कसून मेहनत करून घेतो. भाषा घोटवून घेतो. भरपूर रिहर्सल आणि रिटेक घेतो. अक्षय खन्नाला अशाच दिग्दर्शकाची गरज होती. दिग्दर्शकच जर, हा विनोद खन्नाचा पुत्र याचे दडपण घेऊन सेटवर वावरला तर मुलगा तरी कामात सुधारणा कशी नि का करणार? तो लाडावलेलाच राहणार.
“बाॅर्डर”च्या खणखणीत यशानंतर अक्षय खन्नाने घाईघाईत बरेच चित्रपट साईन केले नाहीत (हे विनोद खन्नाच्या नेमके उलटे). अक्षय खन्नाने एका बाजूला चित्रपटसृष्टीतील नेमका वावर (उठसूठ फिल्मी पार्टीला न जाणं, सतत मीडियाच्या जवळ न राहणे) आणि दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे स्वतःचे फार्महाऊस (कधी आपला मित्र नीतिन मनमोहन यांच्यासोबत धमालमस्ती करणे, आपली प्रायव्हसी जपणे) असा छान समतोल साधला. नवीन चित्रपट स्वीकारण्याचा वेग आणि वेळ स्वतःच्या हाती ठेवला. त्यातून त्याला फायदा झाला. तो तद्दन फिल्मीपणा दाखवणारा सेलिब्रिटी म्हणून ओळखला जाण्यापासून दूर राहिला. आपण सतत पडद्यावर आणि मीडिया/सोशल मीडियात दिसलो नाही, लाईक्स वाढले नाहीत तर चित्रपटरसिक आपल्याला विसरतील अशी कोणतीही भीती त्याला वाटली नाही.
त्याने एकिकडे आपल्या फार्महाऊसवरचे आयुष्य भरभरुन एन्जॉय करणे सुरू ठेवले आणि दुसरीकडे लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित “छावा”मधील त्याचा औरंगझेब (अतिशय क्रूर, विकृत, धोकादायक) आदित्य धर दिग्दर्शित “धुरंधर”मधील रहमान डकैती (प्रचंड खुनशी, डेंजरस) अशा मोजक्याच चित्रपटातून भूमिका साकारताना गेटअपपासून व्यक्तीरेखा साकारण्यापर्यत आणि हिंदी बोलण्यापासून भावमुद्रापर्यंत आपले सगळे लक्ष केंद्रित केले. आज त्याचीच गोड फळे त्याला मिळताहेत. “धुरंधर” पाहणारा प्रत्येकजण त्याचे कौतुक करतोय. रसिक त्याच्यावर सोशल मीडियात भरभरून लिहून पोस्ट करताहेत. आणि आता तर “धुरंधर”चा पुढचा भागही येतोय. तेव्हा त्याच्या पूर्वप्रसिद्धीत अक्षय खन्नाला जरा जास्तच फूटेज नक्कीच.
चलनी नाणे असं वाजवायचे असतं हा चित्रपटसृष्टीतील अलिखित नियम. तात्पर्य, ज्या भाषेतील चित्रपटातून आपण काम करतोय, ती भाषा शिका आणि सुधारा, मग अभिनयही सुधारत जाईल आणि मग अशी गोड फळे मिळतील. नव्वदच्या दशकात आपल्या देशात जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था यांचे आगमन झाले आणि इंग्रजीला फार फार महत्त्व आले. अक्षय खन्ना त्याच पिढीचा प्रतिनिधी. पण जेव्हा आपण इंग्रजी नव्हे तर हिंदी चित्रपटात काम करतोय हे लक्षात घेऊन काम करु लागला, तेव्हा तो समीक्षक आणि चित्रपटरसिकांच्या मनावर राज्य करु लागला. तो सर्व “खान” हिरोंपेक्षा वेगळा आहे. वेगळा विचार करतोय, वेगळा दिसतोय.. आजच्या ग्लोबल युगातील स्पर्धेच्या युगात वेगळेपण हाच हुकमाचा एक्का!

