पूर्वीच्या काँग्रेस राजवटीत गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत होते. त्यामुळेच मुंबई व आसपासच्या परिसरात गुन्हेगारी वाढली होती, असा आरोप जवळजवळ सर्वच भाजप नेते करत असतात. परंतु गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांनी शेजारच्या मध्य प्रदेश राज्यात तगडा छापा घालून पिस्तूले व कोयता-विळे बनवणाऱ्या सुमारे ५० भट्ट्या उद्ध्वस्त केल्या असल्याने भाजप नेत्यांची मोठीच पंचाईत झाली आहे. पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँग व टोळीयुद्धाने डोके वर काढलेले होते. सहपोलीस आयुक्त रंजन शर्मा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुमारे १५० पोलिसांचे पथक उपायुक्त सोमथ मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्याच्या उमरटी गावात काही दिवस टेहाळणी केल्यावर मोठ्या प्रमाणावर कट्टे (गावठी पिस्तूले), कोयते व विळे यांचेउत्पादन बेकायदेशीररित्या केले जात असल्याचे निदर्शनास आले.
५० भट्ट्या उद्ध्वस्त, ३६ अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा शस्त्रे बनवणाऱ्या अशा सुमारे ५० भट्ट्यांची माहिती मिळाली होती. येथे तयार होणाऱ्या पिस्तूलांवर मेड इन यु एस ए (अमेरिका) असे शिक्केही मारून त्यांची विक्री महाराष्ट्र, गुजरात आदी शेजारच्या राज्यातील गुंड टोळ्यांना केली जात होती, अशी कबुली अटक करण्यात आलेल्या गुंडानी दिल्याचे सांगण्यात येते. पुणे शहरात गुंडगिरीने डोके वर काढताच पोलिसांच्या खबरीमार्फत काही बेकायदा शस्त्रे पुरवठादारांची कसून चौकशी केल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशात ‘फिल्डिंग’ लावून हे ऑपरेशन यशस्वी केले. उमरटी गावातील अनेक घरांमध्ये हे बेकायदा कारखाने असल्याचे उघडकीस आले. मध्यस्थ ओळखीचा तसेच विश्वासू असल्याशिवाय ही शस्त्र खरेदी-विक्री होतच नसे. शिवाय या खरेदी-विक्रीसाठी इंटरनेट माध्यमातून संपर्क केला जात असे. म्हणूनच तपासात अडथळे निर्माण होत होते. परंतु आंदेकर व घायवळ टोळीतील काही संशयितांची कसून चौकशी केली असता एक संशयित ही माहिती ‘ओकला’ आणि पोलिसांचे काम सोपे झाले.

जेलमधील मैत्री कामास आली
आंदेकर, घायावळ तसेच कोयता गँग्सचे अनेक गुंड जेलमध्ये असतात व काही आहेतही. त्यांच्या बोलाचालीतून व जेलमध्ये भेटावयास येणाऱ्या नातेवाईकांच्या चर्चेला ‘कौवे’ लावून पोलिसांनी ही माहिती हस्तगत केली. इतकेच नव्हे तर उमरटी गावातून पिस्तूले व कोयते पूर्वी घेतलेल्या गुंडाच्या हस्तकांनाच या गावात प्रवेश दिला जात असे (एकदम मिर्झापूर वेब सिरीजची आठवण). सर्व व्यवहार राखाडी गांधीतच होत असे व तोही नगद बंडलात! जंगलातून मार्ग काढत कारखान्यापर्यंत जाणे, ठरविक ठिकाणी गाडी सोडून पायी जाणे आणि काही अंतर चालून गेल्यानंतर पुन्हा नवीन गाडी म्हणजे पोलिसांना एकदम वेब सिरीजमध्येच काम करत असंल्याचा फील आला असेल, असे एका अधिकाऱ्याने सूचित केले. आता मोहोळ, आंदेकर, घायवळ तसेच कोयता गँग्सच्या कारनाम्यावर अधिक प्रकाश पडेल. इतकेच नव्हे तर गुंड टोळ्यांना आशीर्वाद असणाऱ्या राजकीय नेत्यांचीही आता चौकशी होईल, असे सूतोवाच एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
बरवानीसारखे चार-पाच जिल्हे
बरवानी, खांडवा, बुऱ्हाणपूर आदी चार-पाच जिल्ह्यांत शस्त्रे बनवणाऱ्या अनेक बेकायदा भट्ट्या असल्याचे माहितीगारांनी सांगितले. ही सर्व मंडळी बहुतांश शीखधर्मीय असून हे सर्व लोहारकामाचा व्यवसाय करतात. या शीखधार्मियांचा थेट संबंध गुरु गोविंद सिंह यांच्याशी असून गुरुच्या लढाईच्या वेळी ही सर्व मंडळी शस्त्रे तयार करत असत, असेही समजते. स्वातंत्र्यानंतर ही मंडळी गुंड टोळ्यांसाठी शत्रे तयार करू लागली, अर्थात हें सर्व बेकायदा होते. या बेकायदा शस्त्रे बनवणाऱ्या कारखान्यात कामाला असतात शीख लीगर जमातीचे युवक. अपराधी जमातीत जन्माला आल्याने या युवकांना कुठलीही कामं मिळत नाही तसेच कुठल्याच मागास वर्गात नसल्याने त्यांना शैक्षणिक सोयीसुविधाही मिळत नसल्याने हा युवक वर्ग नाईलाजाने या बेकायदा उद्योगात कामाला असल्याचे समजते. काही भागात तर अल्पवयीन मुले-मुली यात असून पापी पेट कें लिये करना पडता है, असे स्पष्ट सांगतात. त्यापैकी काही धीट मुलांना गँग्समध्ये सामील करून घेऊन त्यांना शार्पशूटर्सचे शिक्षण देण्यात येते, असे काहींनी सांगितले.

