गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) काल एक आंतरसांस्कृतिक संवाद रंगला. ‘शिकार’, ‘निलगिरीज: अ शेअर्ड वाईल्डरनेस’ आणि ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, या तीन चित्रपटांतल्या कलाकारांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. आपल्या चित्रपटातील समृद्ध आणि वैविधतेने गुंफलेल्या कथानकातील भावना, अंतर्दृष्टी आणि मार्मिकता त्यांनी यावेळी मांडली.
‘शिकार’: एक आदरांजली आणि एक प्रवास
एका भावनिक वातावरणात या संवादसत्राचा प्रारंभ झाला. सत्राच्या प्रारंभी ‘शिकार’ चित्रपटाचे दिग्दर्शक देबांगकर बोरगोहेन यांनी, अलिकडेच मरण पावलेले चित्रपटाचे मुख्य अभिनेते आणि संगीतकार जुबीन गर्ग यांचे स्मरण केले. आपण दोघांनी जवळजवळ दोन दशके एकत्र काम केल्याचे त्यांनी सांगितले. आपण सुरुवातीला जुबीन यांच्याशी केवळ संगीतासाठी संपर्क साधला होता. त्यांनी कथा ऐकली आणि चित्रपटात अभिनय करायची इच्छा व्यक्त केल्याची आठवण त्यांनी सांगितली. ते आपल्यात असताना प्रदर्शित झालेला हा त्यांचा अखेरचा चित्रपट आहे. त्यांना जाऊन आता 64 दिवस झाले आहेत. आज ते येथे उपस्थित असते तर… अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

देबांग यांनी ‘शिकार’च्या रंजक निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगितले. हा मोठ्या प्रमाणावर परदेशात चित्रित झालेला पहिला आसामी चित्रपट असून, याचे जवळजवळ 70 टक्के चित्रिकरण लंडनमध्ये झाले. चित्रपटाच्या चमूमधील बहुतेकजण प्रवास करू शकले नसल्याने, दिग्दर्शकांनी गुवाहाटीतून दूरस्थपणे काम केले. अनेकदा शूटिंगसाठी लाइव्हस्ट्रीमिंगद्वारे मार्गदर्शन करताना ते मच्छरदाणीत असत, असे त्यांनी सांगितले आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून दर्शकांना आसामचे सामर्थ्य आणि प्रतिष्ठा दिसून येईल, असे ते म्हणाले.
आसामचे खरे चित्रण आपल्याला मांडायचे आहे, अशी इच्छा व्यक्त करतानाच ओटीटी व्यासपीठांममुळे चित्रपट जगभर पोहोचले असले, तरी अनेकदा प्रादेशिक चित्रपटांना फारसे महत्त्व मिळत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

‘निलगिरीस: अ शेअर्ड वाईल्डरनेस’ मध्ये दैवविविधतेचे चित्रण
‘निलगिरीसः अ शेअर्ड वाईल्डरनेस’च्या चमूने उपस्थितांना विस्मयचकीत व्हायला लावले. चित्रपटाचे सहाय्यक निर्माते आदर्श एन सी यांनी अनेक अब्ज वर्षांपासून अस्तित्त्वात असलेल्या दुर्मिळ प्रजातींचे 8K आणि 12K गुणवत्तेत छायाचित्रीकरण करण्यासाठी दाखवलेल्या संयमाबद्दलची माहिती दिली. वन्यजीव हेच या चित्रपटाचे खरे नायक आहेत. ते वेळेवर येत नाहीत. येथे रिटेक नसतात. कधीकधी एकाच दृश्यासाठी तीनेक महिने लागू शकतात, या वास्तवाची जाणिव त्यांनी करून दिली. हा माहितीपट सहअस्तित्त्वाच्या संकल्पनेचाही शोध घेतो. आपल्या घरांच्या अंगणात असलेल्या वन्यजीवांबरोबर आपण कसे जगतो, याची ही गोष्ट आहे. विविध प्रजाती अगदी शेजारी राहतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही लोकांच्या घरांपर्यंत पोहोचलो, असे ते म्हणाले.
पथकातील सदस्य हर्ष यांनी अशाप्रकारच्या चित्रपटनिर्मितीच्या अनिश्चिततेचे वर्णन करताना सांगितले की, आमच्या समोर काय चित्रित होणार आहे, याची आम्हाला पूर्वकल्पना नव्हती. प्राणी नेमके कुठे आहेत, हेही माहीत नव्हते. कॅमेऱ्यामागे वन्यजीवांच्या हालचालींबाबत सातत्याने माहिती देणारी मोठी संशोधन टीम आमच्यासोबत होती. हळूहळू आम्ही तयार करत असलेल्या कथानकाची दिशा स्पष्ट होत गेली. या चित्रपटाबद्दल OTT प्लॅटफॉर्मकडून मोठ्या प्रमाणावर मागणी येत असली तरी ‘नीलगिरिज’ मोठ्या पडद्यावरच अनुभवावा, अशी पथकाची इच्छा आहे.

‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’: विनोद आणि वसाहतीकालीन गोंधळाचा संगम
‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’च्या टीमने विनोद आणि इतिहासाचे अप्रतिम मिश्रण सादर करून संपूर्ण सभागृह आनंदाने भरून टाकले. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माते भारत शितोळे यांनी आपल्या मूळ नाटकाला 1942च्या पार्श्वभूमीवरील चित्रपटात रूपांतरित करताना भेडसावलेल्या आव्हानांचे आणि त्याचबरोबर मिळालेल्या आनंदाचे वर्णन केले. महाराष्ट्रातील एक शांत खेडेगाव स्वातंत्र्यलढ्याच्या उंबरठ्यावर आणि दुसऱ्या महायुद्धाच्या गोंधळात अडकते, हा या चित्रपटाचा विषय आहे.
गंभीर विषयांमध्ये विनोद साधण्याविषयी बोलताना परेश म्हणाले की, गरिबीसारख्या विषयांवर आधारित अनेक उत्तम विनोदी कलाकृती निर्माण झाल्या आहेत. विनोद सत्याला कधीच लपवून ठेवू शकत नाही. अनेकदा तोच सत्य अधिक प्रभावीपणे प्रकट करतो. प्रवास घरापासूनच सुरू होतो. प्रादेशिक सिनेमाने जागतिक स्तर गाठावा असे वाटत असेल तर स्थानिक प्रेक्षकांकडूनच त्याला आधी पाठिंबा मिळायला हवा.

