आशिष देवल, संचिता पाटील-देवल या राष्ट्रीय मल्लखांब खेळाडूंनी अस्सल मराठमोळ्या सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असलेल्या मल्लखांब खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आठ वर्षांपूर्वी मुंबईत बोरिवलीत “मल्लखांब लव्ह”ची सुरूवात केली. या दोघांचे गुरु असलेले मल्लखांबसम्राट दत्ताराम दुदम यांचे स्वप्न होते, ज्याप्रमाणे क्रिकेट हा खेळ भारतात सर्वत्र गल्लीबोळात खेळला जातो, तशाच पद्धतीने मल्लखांब खेळदेखील सगळीकडे खेळला जावा. या दुदम सरांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी देवल दांपत्याने “मल्लखांब लव्ह” हे व्यासपीठ उभारले. विशेष म्हणजे सरांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी या खेळात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले आहे. २०१७मध्ये त्यांनी बोरिवली पश्चिम येथे बीमा नगर एज्युकेशन सोसायटी शाळेत “मल्लखांब लव्ह”तर्फे पहिले सेंटर सुरु केले. आता याच सेंटरची संख्या पाच आहे. सुविद्या प्रसारक संघांचे सुविद्यालय शाळा, मुंबादेवी विद्यानिकेतन, म. ह. चोगले शाळा अशा प्रसिद्ध शाळांच्या माध्यमातून मल्लखांब प्रशिक्षण केंद्राचे जाळे त्यांनी निर्माण केले.

सुरूवातीला अवघे पाचजण पहिल्या सेंटरमध्ये दाखल झाले होते. आज या सेंटरमधून ४००पेक्षा जास्त खेळाडू मल्लखांब खेळाचे नियमित धडे गिरवत आहेत. यामध्ये लहांनापासून मोठ्यांचादेखील समावेश आहे. याच सेंटरमधून राष्ट्रीय, राज्य, जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत चमक दाखवणारे खेळाडू घडत आहेत. हीच या सेंटरची मोठी जमेची बाजू आहे. खेळाडूंना अत्याधुनिक आणि पारंपरिक पद्धतीची सांगड घालून मल्लखांब प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या कामगिरीवर नियमित लक्ष ठेवले जाते. त्यांची कामगिरी अधिक कशी उंचावता येईल याकडे प्रशिक्षकांचा भर असतो. सुरूवातीला मल्लखांबावर बसायला घाबरणारी मुले नंतर काही महिन्यांच्या सरावानंतर मल्लखांब जेव्हा लीलया करतात आणि त्यांचे पालक भेटून आनंद व्यक्त करतात तेव्हा एक वेगळेच समाधान देवल दाम्पत्याला मिळते. “मल्लखांब लव्ह”मध्ये येणारा प्रत्येक खेळाडू हा आम्हाला आमच्या मुलासारखाच आहे, हे देवल पती-पत्नीचे बोल खेळाडूंबाबत त्यांच्या असलेल्या आस्थेबाबत बरेच काही सांगून जातात. विशेष म्हणजे मुकबधीर, अंध, फिजिकली चॅलेंज्ड, हायपर ऍक्टिव्ह मुलेदेखील हा खेळ शिकायला येतात. त्यांच्या पाल्यांना या मुलांमधे सकारात्मक बदल झालेला बघायला मिळाला.

भारतातले या खेळातील पहिले यु ट्यूब चॅनल “मल्लखांब लव्ह” देवल दांपत्याने सुरु केले. त्याचे मल्लखांबविश्वात जोरदार स्वागत झाले. या चॅनलच्या माध्यमातून मल्लखांब खेळाची इंतंभ्यूत माहिती देण्यास सुरुवात केली. मल्लखांबाचा एक, एक प्रकार कसा करायचा याचे योग्य प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याचा मोठा फायदा महाराष्ट्रातील, देशभरातील खेळाडूंना झाला. विशेषकरून ग्रामीण भागातील प्रशिक्षक व खेळाडूंना याचा सर्वात जास्त उपयोग झाला. निधी राणे, निरंजन अमृते, खुशी पुजारी, त्रिशा खानविलकर, देवांशी माळी, ऋतुजा मांडवेकर, प्रणिता पुंडे, अमोलिका श्रोत्री, रिया पुजारी, सान्वी सावंत, आर्या जाधव, शौर्य नाईक, शिवाई पोवार, जियाना रजक, गौरी मांणगांवकर, परिहा कराडकर, वैष्णवी घाडीगावकर यांनी विविध स्पर्धांत चांगली चमक दाखवून “मल्लखांब लव्ह”चे नाव प्रकाशझोतात आणले आहे. निधी राणेला मुंबई उपनगरचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा पुरस्कार मिळाला आहे.

देवल दांपत्याचे सहकारी बोरीवली तालुका विभागात दीपाली दुदम, मुकेश वेलोडे, मंदार आसेगावकर, नीलम राणे, उमेश साळवी, अंजली बारे ही प्रशिक्षकांची चांगली टिम मल्लखांब प्रचार-प्रसाराचे कार्य करत आहेत. “मल्लखांब लव्ह”चा हा प्रवास सोपा नव्हता. करीयर म्हणून मल्लखांब शिकवणं आणि संस्था सुरु करणे, त्याचबरोबर या खेळाच्या प्रचार-प्रसाराचे शिवधनुष्य उचलणे सोपं नव्हते. सुरूवातीला भांडवल, क्रीडा साहित्य, प्रमोशन, जागा आणि विद्यार्थी ही सगळी आव्हाने देवल दांपत्यासमोर होती. पण त्या आव्हानांचा सामना आशिष, संचिताने यशस्वीपणे केला. घरच्यांची आणि क्रीडाप्रेमींची भक्कम साथ या दोघांना मिळाली. चांगल्या कामाला देवाची साथदेखील मिळतेच. त्यामुळे आज “मल्लखांब लव्ह”ची वाटचाल जोमात सुरु आहे. संचिता राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू आणि प्रशिक्षिका आहे, तर आशिष तब्बल १३ वर्षं राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेतला विजेता आहे. २०१०मध्ये त्याला राज्यशासनाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाला होता. तसेच आशिषला स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सध्या तो मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचा मानद कार्यवाह आहे. भविष्यात “मल्लखांब लव्ह”ची मुंबई उपनगरात सर्वत्र सेंटर सुरू करण्याचा देवल दांपत्याचा संकल्प आहे. त्याची नक्की पूर्तता होईल अशी आशा करुया.

