युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्याच्या हेतूने दरवर्षी आयोजित केला जाणारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव या वर्षी ७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होण्याकरीता इच्छुकांनी आपली नोंदणी येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत https://forms.gle/Kmof5utKSuEqL3P69 या गुगल फॉर्मद्वारे करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रा. मार्क धरमाई यांनी केले आहे.
राष्ट्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” या कार्यक्रमाअंतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२५-२६मधील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे राष्ट्रीय आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ यादरम्यान होणार असून त्यासाठी जिल्हास्तरीय निवड करण्याकरीता या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वक्तृत्व, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कवितालेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत १५ ते २९ वर्षे वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. या स्पर्धांबाबतची सविस्तर माहिती www.dsomumbaicity.blogspot.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

