Homeमाय व्हॉईसचिदंबरमच्या विधानाने खालिस्तानवाद्यांना...

चिदंबरमच्या विधानाने खालिस्तानवाद्यांना मिळाले बळ!

माजी गृहमंत्री, काँग्रेसचे स्टार खासदार, पी. चिदंबरम  यांनी पुन्हा एका नव्या वादाला नुकतेच तोंड फोडले आहे. ९/११ हल्ल्यावेळी पाकिस्तानवर लष्करी करवाई करण्याची माझी सूचना होती. पण मनमोहन सिंग सरकारवर परराष्ट्रांचा दबाव आला आणि भारत सरकारने लष्कर घुसवले नाही, असे ते बोलले होते. आता त्यांनी, “ऑपरेशन ब्लू स्टार ही एक मोठी चूक होती”, असे विधान करून एकापरीने राहुल गांधींच्या आजी, भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे! हिमाचल प्रदेशातील कसौली इथे खुशवंत सिंग लायब्ररीतील कार्यक्रमात बोलताना त्यानी ऑपरेशन ब्लू स्टारसाठी कॅांग्रेस सरकारलाच दोषी ठरवले आहे. “ती कारवाई म्हणजे, फार मोठी चूक होती” असे चिंदबरम म्हणाल्यामुळे पक्ष पुन्हा त्यांच्यावर चिडला आहे.

धुमसता पंजाब आणखी पेटला आणि उसळला, तो ऑपरेशन ब्लू स्टारनंतर. जून १९८४मध्ये अमृतसरच्या सुवर्णमंदिरासह पंजाबमधील अनेक गुरुद्वारांत लष्करी सैनिक घुसले. त्यांनी तिथे शोधाशोध केली. अतिरेक्यांना, खालिस्तान्यांना अटक केली. शस्त्रास्त्रे जप्त केली. पण त्यात सुवर्णमंदिराचीही मोठी पडझड झाली. तोफगोळे व शस्त्रांचे आवाज दहा दिवस मंदिरात दणाणत होते. “हा आपल्या धर्मावरचा हल्ला आहे”, अशी भावना पंजाबात त्यामुळेच पेटली. सुवर्णमंदिर हे शिख संप्रदायाचे सर्वात पवित्र असे स्थान आहे. तिते दमदमी टकसाळ या इमारतीत आक्रमक शिख जथ्थेदार जर्नेलसिंग भिन्द्रनवाले, त्याच्या अतिरेकी सैन्यांसह, लपला होता. त्या लोकांनी तिथे तळघरे करून त्यात मशीनगन, तोफगोळे, बाँब असे घातक सहित्य जमवले होते. 1883-84 या कालावधीत सुवर्णमंदिराचा तसेच पंजाबातील अनेक गुरुद्वारांचा ताबा या अतिरेक्यांकडे होत्या. त्यांनी पोलिसांना प्रतिबंध करणारे, आपले चौक्या-पहारे तिथे बसवले होते. भिन्द्रनवाले हा प्रभावी वक्ताही होता. मोठ्या प्रामाणात तरूण शिख त्याचे समर्थक बनले होते. त्याची कीर्तने, प्रवचने ऐकायला लोक मोठ्या संख्येने जमत असत. पंजाबचे स्वतंत्र राज्य व्हावे, राष्ट्र व्हावे, स्वायत्तता मिळावी, यासाठी तो प्रसार, प्रचार करत होता आणि हिंसेचा मार्गही अवलंबत होता. तो आधीच्या दोन वर्षापासून सुवर्ण मंदिरातच राहात होता. कारण अकाल तख्तच्या प्रमुख जथ्थेदारांनी भिन्द्रनवालेंना तिथे निमंत्रित केले होते. त्या ऑपरेशनने भिंन्द्रनवाले मारला गेला. पण शिख पेटून उठले.

सरकारविरोधातील बंडखोरांच्या कारवाया गावा वात आणि शहराशहरात सुरु होत्या. पुढे कित्येक वर्षे पंजाब धुमसत राहिला. या ऑपरेशननंतर पाचच महिन्यांत, ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी, पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्त्या झाली. भारताच्या पंतप्रधानांचे शिख सुरक्षारक्षक, बियंत सिंग व सतवंत सिंग, यांनी मशीनगनमधून गोळीबार करून, इंदिरा गांधींच्या देहाची चाळण केली. त्यानंतर दिल्लीत भयंकर असे शिख हत्त्याकांड घडले. राजीव गांधी पंतप्रधान झाले. ते म्हणाले की “जेव्हा वटवृक्ष कोसळतो तेव्हा असे काही झाले तर ते किरकोळच मानले पाहिजे…” शिखांच्या मनामनातून तो राग आजही दिसून येतो. आजही भारताबाहेर खालिस्तानी चळवळ तग धरून आहे. आता पंजाब अतिरेकी सावटातून मुक्त झाला आहे. त्या ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख, फार मोठी चूक होती, अशा शब्दात चिदंबरम करतात. अर्थात ते काही त्यांचे एकट्याचे मत नाही. अनेक मान्यवरांनी तसेच मत पूर्वीही व्यक्त केले आहे. चिदंबरम म्हणतात तसे एकट्या इंदिरा गांधी यांनाच दोषी मानता येणार नाही. भारतीय लष्कर, गुप्तचर संस्था, प्रशासकीय अधिकारी व पंजाब पोलीस या सर्वांचा आग्रह, वाढणारी बंडखोरी मोडून काढायची तर थेट लष्करी कारवाई करावी लागेल असा होता. इंदिराजींनी त्यानुसार धाडसाने निर्णय घेतला, यात शंकाच नाही. पण तो निर्णय चुकला हे नंतरच्या घटनांनी दाखवून दिले.

चिदंमबरम

शिखांच्या सूडचक्रात एकट्या इंदिराजीच नाहीत, तर जनरल अरूण कुमार वैद्य, जे तेव्हा लष्कराचे प्रमुख होते, तेही मारले गेले. वैद्य साहेबांना निवृत्तीनंतर पुण्यात गोळ्या घालून शिख दहशतवाद्यांनी मारले. महाराष्ट्रासाठी तो मोठा धक्का होता. दिल्लीत शिखांच्या विरोधात काँग्रेसप्रणित मोठा हिंसाचार झाला. तेव्हा मुंबईतही तणाव निर्माण झाला होता. पण बाळासाहेब ठाकरे ठाम उभे राहिले होते. त्यांनी शिखांना आश्वस्त केले होते. देशात अनेक ठिकाणी शिखविरोधी दंगली झाल्या. पण मुंबईत, महाराष्ट्रात काही झाले नव्हते. चिदंबरम म्हणतात तशी चूक काँग्रेसकडून झाली. त्याचा त्रास काँग्रेसमधील शिख नेत्यांना अनेक दशके झाला. मनमोहनसिंग आदरणीय नेते होते. पण त्यांनाही, “अकाल तख्तापुढे बोलावून घेऊन, माफी मागायला लावू”, अशी धमकी अकाल तख्तच्या प्रमुख गुरुंनी दिली होती. संसदेत पंतप्रधान म्हणून डॉ. सिंग यांनी २००५मध्ये सुवर्णमंदिरात सैन्य घुसवल्याबद्दल तसेच दिल्लीत झालेल्या शिखांच्या शिरकाणासाठी माफी मागितली. मात्र त्याचवेळी, डॉ. सिंग असेही म्हणाले की, ती कारवाई तेंव्हा आवश्यकच होती, स्थिती हाताबाहेर जात होती.

अकालींचे राजकारण ऑपरेशन ब्लू स्टारनंतर जोमाने वाढले. स्वातंत्र्यानंतर पंजाबात काँग्रेसचा प्रभाव राहिला तो सत्तर-ऐशीच्या दशकापर्यंत. मध्ये अनेकदा अकाली सत्तेत येत होते. पण अनेक दशके सत्तेत राहूनही अकालींना स्वबळावर कधी सत्ता घेता आली नाही. त्यांना पूर्वीपासूनच एखाद्या मित्रपक्षाची मदत घ्यावी लागली. अलिकडेपर्यंत भाजपा अकालींचा मित्रपक्ष होता. ऑपरेशन ब्लू स्टारनंतर वीस-पंचवीस वर्षांनी २०१७मध्ये काँग्रेसला तिथे मुख्यमंत्रीपद व सत्ता घेता आली. सध्या तिथे आम आदमी पक्षाची सत्ता आहे. १९८०च्या दशकातील पंजाबातील घटनांची मुळे या राज्याच्या स्थापनेपासूनच्या आर्थिक, सामाजिक तणावांच्या स्थितीत शोधावी लागतील. पंजाब हा मुळात स्वातंत्र्याच्या वेदना सहन करणारा प्रांत आहे. पूर्व व पश्चिम पंजाबचे विभाजन होऊनच भारतातून पाकिस्तान वेगळा झाला. पाकिस्तानी पंजाब प्रांतातून शिखांना व हिंदूंना अक्षरशः मारून पळवून लावले गेले. हजारोंच्या कत्तली झाल्या. महिलांवर अत्याचार झाले. त्यावेळेचे सारे अत्याचार भोगलेला हा समाज आहे. नंतर भाषावार प्रांतरचेनत आपल्यावर अन्याय झाला, असे पंजाबी लोकांना वाटते. सर्व पंजाबीभाषक प्रदेशही आपल्याला मिळाला नाही. पंजाबींवर व विशेषतः शिखांवर, राजकीय तसेच धार्मिक अन्याय होतो, असे तिथल्या लोकांना वाटत होते.

असंतोषामुळे स्वातंत्र्यानंतर वीस वर्षांनी मोठ्या पंजाब प्रातांचे तीन हिस्से करावे लागले. शिखांची भाषा बोलणाऱ्यांचा पंजाब, हिंदी बहुसंख्यकांचा हरयाणा व तिसरा हिमाचल प्रदेश. यांची निर्मिती 1966मध्ये झाली. कारण आपली भाषा व विशेषतः आपला पंथ, शिख संप्रदाय, यांना योग्य मान व स्थान मिळत नाही, ही अकालींची तक्रार होती. चंदीगढ ही आजही हरयाणा व पंजाबची एकत्रित राजधानी आहे. ते पंजाबला मान्य नाही. नदीखोऱ्यांतील पाण्याचा योग्य वाटा आम्हाला मिळत नाही, ही पंजाबची तक्रार 1970पासून आजपर्यंत कायम राहिलेली आहे. अकाली दल हा मुळात धर्माधारित राजकीय पक्ष होता व आहे. शिरोमणी अकाली दलाचे नियंत्रण सर्व शिख गुरुद्वारांवर असते. तिथली व्यवस्था बघणाऱ्या शिख धर्मगुरुंची राजकीय संघटना असे स्वरूप असूनही अकाली दलाला सुरुवातीपासूनच पंजाबात पूर्ण सत्ता घेता आलेली नव्हती. काँग्रेसचा प्रभाव होता आणि अकालींना अन्य विरोधी पक्षांसह अधुनमधून सत्ता लाभत होती.

चिदंमबरम

केंद्र सरकार अन्याय करते, शिख धर्मियांची कोंडी होते, या भावनेतून १९७३मध्ये अकालींनी आनंदपूर साहिब येथील अधिवेशनात स्वायत्तेचा ठराव केला. भारताच्या राष्ट्रीय चौकटीत राहूनही पंजाब स्वतःचे निर्णय स्वतःच करेल ही मुख्य मागणी त्यात होती. पंजाबचे सारे निर्णय पंजाबातच होतील फक्त संरक्षण, परराष्ट्र धोरण आदि बाबी केंद्रातील मध्यवर्ती सरकार सांभाळेल, अशी “फेडरल स्टेट”ची संकल्पना त्या ठरावात होती. मात्र १९७३चा आनंदपूर साहिब ठराव इंदिरा गांधींच्या केंद्र सरकारने, फुटीरतावादी आहे, म्हणून फेटाळून लावला. तेव्हा अकालींची व शिख समुदायाची अस्वस्थता आणखी वाढली. याला हरित क्रांतीचाही एक पदर होता. हरित क्रांतीमधून पंजाबातील मोठे शेतकरी आणखी श्रीमंत झाले. पण अन्य शेतकरी गरिबीत ढकलले गेले. त्याचबरोबर पाकिस्तानच्या सीमेला लागून असणाऱ्या या राज्यात मोठे उद्योग आणू नयेत, असे केंद्राचे धोरण होते. कारण युद्धस्थितीत पहिला हल्ला अशा उद्योगांवर होईल ही साधार भीती केंद्राला होती. उद्योग वाढत नसल्याने बेकारीची स्थिती यातून वाढीस लागली. या साऱ्या सामाजिक, आर्थिक तणावातून खालिस्तान चळवळीला बळ मिळाले. पाकिस्तानी आयएसआयनेही त्या संधीचा लाभ घेत खालिस्तानी अतिरेकी तयार करण्याचा उद्योग सुरु केला. पंजाबी तरुणांना सीमेपलिकडून दारुगोळा, शस्त्रे आणि लष्करी शिक्षणही दिले जात होते. ही चळवळ भिन्द्रनवाले पुढे आल्यानंतर आणखी फोफावली.

१९८४च्या ऑपरेशन ब्लू स्टार आणि इंदिराजींच्या हत्त्येनंतर भडकलेल्या पंजाबमध्ये दोन अतिशय कडक आणि गुंडांचे कर्दनकाळ म्हणून गाजलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवले गेले. ज्युलिओ रिबेरो हे महाराष्ट्राचे, मुंबई पोलीस आयुक्त व नंतर डीजी असताना त्यांना केंद्र सरकारी सेवेत घेतले गेले. ते राष्ट्रीय सुरक्षा दलाचे प्रमुख बनले. नंतर ते पंजाबचे पोलीसप्रमुख म्हणून सुमारे वर्षभर तेथे होते. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली तेंव्हा रिबेरो राज्यपालांचे सुरक्षा सल्लागार म्हणून काही काळ होते. “बुलेट फॉर बुलेट”, हे धोरण त्यांनी पंजाबात राबवले. अतिरेक्यांना कंठस्नान घालण्याच्या मोहिमा सुरु झाल्या. १९८८पासून पुढची सलग सात वर्षे के. पी. एस. गिल पंजाब पोलिसांचे प्रमुख बनले. १९९५ला गिल यांना नरसिंहराव सरकारने अचानक निवृत्त करून टाकले. गिल आयपीएसच्या आसाम कॅडरचे अधिकारी होते. ते आसामचे पोलीसप्रमुखही राहिले. केंद्राने त्यांना खास पंजाबातील स्थिती हाताळायला बोलावले. त्यांनीही रिबेरोंप्रमाणेच अतिरेकी शिख दहशतवाद्यांना थेट यमसदनी धाडण्याची मोहीम सुरु केली. त्यांच्याविरोधात कथित मानवतावादी स्वयंसेवी संघटनांनी अनेक तक्रारी मानवाधिकार आयोग, इंटरनॅशनल अम्नेस्टी वगैरेंकडे केल्या. त्यांच्याविरोधात वादही पुष्कळ झाले. पण गिल यांनी पंजाबची खालिस्तानी दहशतवादी चळवळीची पाळेमुळे उखडून दाखवली. अतिरेक्यांना पकडणे, मारणे अशा मोहिमा चालवल्या. त्यांच्या नेतृत्त्वात, “ऑपरेशन ब्लॅक स्टॉर्म”, अशी मोहीम पोलिसांनी हाती घेतली. पोलीस १९८९-९०मध्ये पुन्हा सुवर्णमंदिरात घुसले. पण यावेळी ऑपरेशन ब्लू स्टारसारखा मोठ्या प्रमाणात गोळीबार न होता अनेक अतिरेकी व शस्त्रसाठा पकडला गेला. हे गिल यांचे यश होते.

जर्नेलसिंग भिन्द्रनवाले हा आजही शिख समाजाचा हीरो आहे. सुवर्णमंदिरात जिथे त्याची हत्त्या झाली तिथे , “तो धर्मयोद्धा होता”, असा गौरवाचा फलक आजही लावला जातो. त्याच्या नावाने आजही काही अतिरेकी प्रवृत्ती डोके वर काढतात. कॅनडातून भारतात आलेला अमृतपाल सिंग हा भिन्द्रनवालेसारखी भाषणे करून जहाल बोलून लोकप्रिय झाला. त्याच्या चेल्यांनी पोलीसस्टेशनवर हल्ला करण्याचे धारिष्ठ्य दाखवले, ही घटना अलिकडचीच आहे. पंजाबी तरुणांच्या डोक्यात आजही खालिस्तानी किडे वळवळत असतात हे परदेशात राहून रॅप गाणी  तयार करणाऱ्या अनेक पंजाबी शिख तरूण गायकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच ऑपरेशन ब्लू स्टारऐवजी दुसरा काही मार्ग वापरला गेला असता तर “आमच्या धर्मावर हल्ला झाला” ही भावना कदाचित इतकी बळावली नसती. आजही अमेरिका व कॅनडात बसलेले श्रीमंत शिख उद्योजक, खालिस्तानचे स्वप्न रंगवत असतात. ते स्वप्न साकारणे हाच पाकचा प्रमुख उद्देश असल्याने, आयएसआय त्यांना मदतही करत असते. कॅनडात शिखांची प्रचंड मोठी संख्या आहे. कॅनडाचे मागील अध्यक्ष जस्टीन ट्रूडोचे सरकार पूर्णतः खालिस्तानी अतिरेक्यांच्या इशाऱ्यावर नाचत होते. मात्र, सध्याचे कॅनेडियन सरकार भारत सरकारच्या खालिस्तानविरोधी प्रयत्नांना पाठबळ देत आहे. अशा स्थितीत चिदंबरमसारख्या नेत्यांच्या वक्तव्याने खालिस्तानवाद्यांच्या इराद्याला खतपाणी नक्कीच मिळेल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

संविधानबदलानंतर दुसरा नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतील. बऱ्याच मोठ्या प्रमाणात निवडणुका होत असल्याने त्या टप्प्याटप्प्याने घेण्याशिवाय निवडणूक आयोगाला पर्याय नाही. राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेत असतो. त्यांनी राज्य सरकारकडे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे....

‘शिवसेना’ नावापेक्षा इतर खटले नाहीत का महत्त्वाचे?

बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचे मूळ नाव तसेच बाळासाहेबांनी चितारलेले धनुष्यबाण हे निवडणूकचिन्ह सध्या अधिकृतरीत्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मातोश्रीच्या पक्षाचे सध्याचे नाव शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (सेना उबाठा) असे आहे. त्यांना मशाल हे निवडणूकचिन्ह मिळाले आहे. याच चिन्हावर व...

ट्रंपचा वेडाचार भारताच्या पथ्थ्यावर!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर आणखी एक जबर आघात केला आहे. त्यामुळे भारतातील हजारो इंजिनिअर्स, एमबीए आणि मूलभूत शास्त्रांत संशोधन करणारे तरूण, तंत्रज्ञ, यांचे अमेरिकेतील वास्तव्य धोक्यात आले आहे. ट्रंपसाहेबांनी अचानक अशी घोषणा केली की, एच-वन-बी या व्हिसा...
Skip to content