सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो. दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता असल्याचा ‘वेट अँड वॉच’चा यलो अलर्ट भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) जारी केला आहे.
विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशातील काही भाग सोडल्यास, आज कोकण, दक्षिण-पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश भागासाठी हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, तुरळक ठिकाणी जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील अवकाळी पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

पणजीपासून नैऋत्येस अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र
नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यांवरून जवळजवळ वायव्येकडे सरकले तर, आग्नेय अरबी समुद्रावरील उत्तर तमिळनाडू किनारपट्टी परिसरातील कमी दाबाचा पट्टा हळूहळू ईशान्येकडे सरकला आहे. आता तो गोव्याच्या पणजीपासून 980 किमी नैऋत्येस केंद्रित झाला आहे. पुढील 24 तासांत तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या पश्चिम-वायव्येकडे सरकून बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र कमकुवत होण्याची शक्यता आहे.
गुरूवार, 23 ऑक्टोबरसाठी “या” जिल्ह्यांना यलो अलर्ट–
कोकण: सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड.
पश्चिम महाराष्ट्र: सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
मराठवाडा: धाराशिव, लातूर, बीड, नांदेड.
विदर्भ: वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

शुक्रवार, 24 ऑक्टोबरसाठी “या” जिल्ह्यांना यलो अलर्ट–
कोकण: सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र: नगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
मराठवाडा: धाराशिव, लातूर, बीड, नांदेड.
विदर्भ: अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.
25 ऑक्टोबरसाठी “या” जिल्ह्यांना अलर्ट–
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर ,संभाजीनगर, बीड, धाराशिव.
पावसाचा “यलो अलर्ट” कितपत गंभीर?
हवामानाचा “यलो अलर्ट” म्हणजे “सावध रहा” असा इशारा, जो मध्यम पावसाची शक्यता दर्शवितो. हा अलर्ट सहसा धोकादायक नसतो. परंतु काही वेळा स्थानिक पूर आणि व्यत्यय निर्माण होऊ शकतात. या इशारासाठी 24 तासांत पावसाची तीव्रता 64.5 मिमी ते 115.5 दरम्यान असते. यामुळे सखल भागात काही ठिकाणी पूर येऊ शकतो. हा अलर्ट ऑरेंज किंवा ग्रीनमध्येही बदलण्याची शक्यता असते. म्हणून लोकांनी हवामानाच्या परिस्थितीबद्दल अपडेट राहवे, सावधगिरी बाळगावी आणि विशेषतः पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात खबरदारी घ्यावी.