आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो मुद्दामच दक्षिणेला पेटवतात. यामागे काय कारण आहे, ते आपण जाणून घेऊ.
पारंपरिकपणे दिवाळीला मातीच्या आणि कणकेच्या पणत्या घरा-दारांत पेटवल्या जातात. अलीकडच्या बदलत्या काळात घराच्या दारात किंवा घरासमोर उंच जागी, एखाद्या झाडावर किंवा घराच्या छप्परावर आकाशकंदील लावला जातो. हा आकाशकंदील म्हणजेच आधुनिक युगातील आकर्षक दिवाच! धनत्रयोदशीच्या दिवशी लावलेला हा दिवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत तेवत ठेवण्याची प्रथा आहे.
यमदेवाच्या आदरार्थ पेटवला जातो दिवा
धनत्रयोदशीच्या दिवशी पेटवलेला हा आकाशकंदील दक्षिण दिशेला लावण्याची प्रथा आहे. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो मुद्दामच दक्षिणेला पेटवतात. यमदेवाच्या आदरार्थ तो पेटवला जातो, असे मानले जाते. यासंबंधाने एक पुराणकथा सापडते.
“हे” कराल तर कधीही अकाली मृत्यू येणार नाही!
पुराणकाळी हैम नावाचा एक राजा होता. त्याच्या मुलाचा लग्नानंतर चौथ्याच दिवशी सर्पदंशाने मृत्यू झाला. स्वतः यमाच्या दूतालाही या मुलाचे प्राण घेऊन जाताना खूपच दुःख झाले. त्याने आपल्या मनातील सल यमराजासमोर बोलून दाखवली. तेव्हा यमाने सांगितले की, जो कोणी धनत्रयोदशीपासून पाच दिवसापर्यंत आपल्या घराच्या दारात दिवे पेटवेल, त्याला कधीच अकाली मृत्यू येणार नाही. तेव्हापासून लोकं धनत्रयोदशीला आपल्या दारात दिवा पेटवायला लागले.
स्वर्गवासी पूर्वज अदृश्यरूपाने येतात घरात वास्तव्याला
या पुराणकथेत तथ्य असो वा नसो, परंतु ती पिढ्या दर पिढ्या मुलांना ऐकवली जाते. दिवाळीला दारात आकाशकंदील लावला, तर त्या उजेडात आपले स्वर्गवासी पूर्वज अदृश्यरूपाने उत्सव काळात वास्तव्याला येतात, अशीसुद्धा कथा काही भागात मुलांना ऐकविली जाते.
धनत्रयोदशीला नवीन वस्तू घरात आणण्याची प्रथा
धनत्रयोदशीच्या दिवशी काहीतरी नवीन वस्तू खरेदी करून घरात आणण्याची प्रथा आहे. असे केल्याने धनलक्ष्मी प्रसन्न होते, अशी समजूत आहे. आदिमकाळी या दिवशी शेतीप्रधान संस्कृतीत हंगामातील कापणीचे नवे धान्य घरी आणले जायचे. त्या पुरातन परंपरेतून पुढे धनत्रयोदशीला नवी वस्तू घरात आणण्याच्या प्रथेचा उगम झाला असावा, असे मानले जाते.