राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण पूर्णतः अनुकूल असल्याचे “आयएमडी”ने रविवारी जारी केलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. दरम्यान, विदर्भातील काही भागात 14 ते 16 ऑक्टोबर या काळात रिटर्न मान्सूनचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र फारशी धुवांधार बॅटिंग न करताच पाऊस परतणार आहे.
पुढील 24 तासांत, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील उर्वरित भाग; संपूर्ण झारखंड आणि छत्तीसगड या राज्यातून नैऋत्य मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. तर, पुढील 2-3 दिवसांत पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओदिशा आणि तेलंगणाच्या काही भागांमधून आणि ईशान्य भारतातून मान्सून माघारीसाठी अनुकूल स्थिती आहे. मान्सूनने आतापर्यंत रक्सौल, वाराणसी, जबलपूर, अकोला, अहिल्यानगर आणि अलिबाग या पट्ट्यावरील भागातून पूर्णतः माघार घेतली आहे.

सध्या सक्रिय हवामान प्रणाली
* ईशान्य आसाम आणि लगतच्या भागात कमी उष्णकटिबंधीय पातळीवर एक वरच्या हवेचे चक्राकार वातावरण आहे.
* नैऋत्य बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या दक्षिण तामिळनाडू किनाऱ्यावर खालच्या आणि मध्यम उष्णकटिबंधीय पातळीवर एक वरच्या हवेचे चक्राकार वातावरण कायम आहे.
* वायव्य उत्तर प्रदेश आणि लगतच्या भागात खालच्या आणि मध्यम उष्णकटिबंधीय पातळीवर वरच्या हवेचे चक्राकार वातावरण कायम आहे.
दक्षिण भारतात आठवडाभर मुसळधार
पुढील 7 दिवसांत केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. देशाच्या वरच्या भागातून मान्सून परतत असताना दक्षिणेत मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दक्षिणेंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, यानम, रायलसीमा, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 12 ते14 ऑक्टोबरदरम्यान ओदिशात, तर 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये विजांसह वादळ होण्याची शक्यता आहे.