आता काय तर म्हणे शाहरुख खान…

शाहरुख खानला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’ (२००४)मधील मोहन भार्गव ही व्यक्तीरेखा उत्तम साकारली म्हणून म्हणा अथवा शिमित अमिन दिग्दर्शित ‘चक दे इंडिया’ (२००७)मधील हॉकी संघ प्रशिक्षक कबीर खान, या भूमिकेसाठी अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असते तर तो त्याचा खरा गौरव ठरला असता. त्या भूमिका ‌नक्कीच ताकदीच्या होत्या. पण अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ (२०२३)मधील विक्रम राठोडच्या अभिनयासाठी त्याला अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, हे पचणे फारच अवघड आहे. त्यात त्याच्या अभिनयापेक्षा व्हीएफ‌एक्स दिसतोय, असं चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांपासून सोशल मीडियात मतस्वातंत्र्य घेत असलेल्यापर्यंत अनेकांचे एकमत झाले. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडली. काय तर म्हणे, शाहरुख खान अर्थात एसआरके हा टॉम क्रूझ, टेलर स्विफ्ट यांना मागे टाकून जगभरातील चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटी ठरला आहे.

बहुतेक तो स्वतः पैसे मोजण्यात वेळ घालवत नसावा जितके हे चर्चेत घालवतात. या सगळ्या उलटसुलट चर्चेला उधाण येत असतानाच तो आता ११ अॉक्टोबर रोजी अहमदाबाद येथे अतिशय ग्लॅमरसपणे साजरा होत असलेल्या फिल्म फेअर सोहळ्याचे सूत्रसंचालन करतोय. त्याच्या सूत्रसंचालनात आत्मविश्वास व अतिआत्मविश्वास यांच्यातील रेषा अगदीच पुसट असते. म्हणूनच तर एकदा‌ अशाच चकाचक‌ महाखर्चिक जंगी सोहळ्यात विद्या बालनला त्याने तिच्या, आतापर्यंत किती पुरस्कार तू पटकावलेस असे विचारले असता, त्याने आपला केवढातरी मोठा आकडा सांगताच तिने क्षणात विचारले, उसमे से खरीदे कितने है… और एक्सचेंज ऑफर कितने है? पुरस्कार सोहळ्यात नृत्य करीत त्या बदल्यात पुरस्कार वगैरे… शाहरुख अतिशय मुरलेला आणि मुरब्बी. तो अशा अनपेक्षित प्रश्नाने अजिबात डगमगला नाही. विद्या बालन त्याला म्हणाली, अवॉर्ड की भूख तो मुझे है…‌ शाहरुखवर याचा काही परिणाम झाल्याचे त्याचा चेहरा तरी दाखवत नव्हता. कदाचित हा त्याचा अभिनय असेल. पण तो ‘जवान’ चित्रपटापेक्षा जास्त चांगला आहे.

चित्रपटाची संख्या वाढवण्यापेक्षा एखाद्याच चित्रपटावर सगळे लक्ष केंद्रित करताना त्याचे घसघशीत मानधन घेणे, आपल्या याच एकमेव चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सतत बदलत ठेवत आपले चाहते (ते कायम त्याचे फॉलोअर्स असतात हे विशेष) व‌ चित्रपटरसिकांची उत्कंठा वाढवत ठेवणे, आपल्या याच चित्रपटाच्या आगमनाची दीड-दोन तास चालणारी प्रचंड मोठी पत्रकार परिषद, मोठ्या उत्पादनाचा ब्रॅण्ड अम्बेसेडर, जाहिरातपट, देश विदेशातील इव्हेंटस, रिबीन कापण्याचा साईड बिझनेस, आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा मालक अशा अनेक उद्योगात विलक्षण बिझी असलेल्या एसआरकेची आर्थिक सुबत्ता प्रचंड असल्यास आश्चर्य ते काय म्हणायचे? पस्तीस वर्षांपूर्वी दिल्लीवरुन‌ मुंबईतील मनोरंजन उद्योगात आलेल्या या युवकाने फौजी, सर्कस, वागले की दुनिया अशा मालिकांमधून काम करतानाच लक्ष वेधून घेतले आणि हेमा मालिनी दिग्दर्शित ‘दिल आशना है’, राज कंवर दिग्दर्शित ‘दीवाना’ असे चित्रपट स्वीकारत पुढचं पाऊल टाकले ते सतत पुढेच.

मला जुहू चौपाटीलगतच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील ‘दीवाना’चा मुहूर्त आठवतोय. शाहरुख खानच्या देहबोलीतून त्याने मिळालेल्या संधीचे सोने करायचं ठरवलंय हे जाणवले. दिव्या भारतीची आई महाराष्ट्रीय असल्याने तिला मराठी चांगले येत‌‌ होते आणि आम्हा सिनेपत्रकाराशी संवाद करण्यात तिला कायमच रस असे. या दोन्ही चित्रपटात हीच जोडी. सर्वप्रथम ‘दीवाना’ (सप्टेंबर १९९२) पडद्यावर आला तोच शाहरुख खानच्या रुपाने एक नवीन वादळ आले आहे याचा प्रत्यय आला. दादरच्या ब्रॉडवे मिनी थिएटरमधील आम्हा सिनेपत्रकारासाठीच्या खेळास शाहरुख खान आवर्जून हजर होता आणि त्याने आम्हा समीक्षकांचा प्रतिसाद जाणून घेतला. त्याची ही जिज्ञासू वृत्ती विशेष उल्लेखनीय आहे.

शाहरुख

१९९५च्या दिवाळीत २० आक्टोबर रोजी यशराज फिल्म्स निर्मित व आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेगे’ प्रदर्शित झाला आणि‌ त्याचा राज मल्होत्रा असा काही लोकप्रिय झाला की‌ तो एक नवीन पिढीतील कार्पोरेट‌ युगाचा सुपर स्टार‌ ठरला. दक्षिण मुंबईतील न्यू एक्सलसियर चित्रपटगृहात दिवसा तीन‌ हाऊसफुल्ल गर्दीतील खेळ असा पन्नास आठवड्यांचा खणखणीत मुक्काम केल्यावर हा डीडीएलजे दक्षिणमध्य मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात शिफ्ट केला आणि आजही तेथे तो दाखवला जात आहे. आता तर त्याचे तीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काही डिजिटल चॅनल सेलिब्रेशन साजरा करणार आहेत…

एकूण काय, शाहरुख खान सतत न्यूजमध्ये आहे, फोकसमध्ये आहे. काहीच नाही तर त्याचा मुलगा आर्यन व‌ मुलगी सुहाना यांच्याबद्दल काही बातमी असतेच… मुलींच्या नावे असलेले अलिबागमधील प्रशस्त घरापासून तेथे जाण्यासाठी शाहरुख गेटवे ऑफ इंडियाला स्पीड बोटीने मांडवा बीचला येजा करतो, यापर्यंत शाहरुख खानच्या कशाचीही बातमी होतेय…

Continue reading

शाहरुखचा डीडीएलजेः सिंगल स्क्रीन ते ओटीटी.. आणि समीक्षक ते ट्रोल!

"तुम्ही दोन नोव्हेंबरला या. त्यादिवशी दरवर्षी दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगेला (डीडीएलजे) जवळपास हाऊसफुल्ल गर्दी असते. शाहरुख खानचा वाढदिवस असतो ना.. त्या दिवशी... दक्षिणमध्य मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहाचा डोअरकिपर मला अतिशय उत्साहाने सांगत होता. डीडीएलजे २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित...

‘मंदिर’ हा काही सिंगल स्क्रीन थिएटरचा अनमोल ठेवा!

सिंगल स्क्रीन थिएटरच्या युगात वाढलेल्या माझ्या पिढीला आज मुंबईतील जुन्या काळातील चित्रपटगृहे आठवणीचा भाग झाली आहेत. अगदी चित्रपटाच्या प्रमाणपत्रावर अठरा रिळ असे वाचले तरी थिएटरच्या अंधारात हमखास टाळी व शिट्टी पडणारच. नेहमीच्या तिकीटात जास्त मोठा चित्रपट पाहयला मिळणार अशी...

९२ वर्षांचे झाले कुलाब्याचे रिगल!

अलिकडे वारंवार रिगल चित्रपटगृहात जायची संधी मिळतेय. पटकथा संवाद लेखक सलीम जावेद यांच्यावरील माहितीपटाच्या निमित्ताने रिगलला रमेश सिप्पी दिग्दर्शित "शोले" (१९७५)च्या खास खेळाचा अनुभव एकदम भन्नाट. रिगलवर लवकरच पोहोचलो तेव्हा बाहेरची लांबलचक रांग पाहून जुने दिवस आठवले. मी माझ्या...
Skip to content