इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या शुभमन गिलच्या पाहुण्या युवा भारतीय क्रिकेट संघाने ५ सामन्यांच्या तेंडुलकर, अँडरसन चषक कसोटी मालिकेत सुरुवातीला १ – ०, नंतर २ – १ असे पिछाडीवर पडूनदेखील अखेर २ – २ अशी बरोबरी साधून कमाल केली. मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ इंग्लंडला एव्हढी जोरदार लढत देईल असे वाटले नव्हते. कारण, भारत पहिल्यांदा रोहित, विराट, अश्विन या तीन अनुभवी खेळाडूंविना या मालिकेस सामोरा जात होता. त्यामुळे कागदावरतरी इंग्लंडचेच पारडे जड होते. तेथील लहरी वातावरण, वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टया, यामुळे भारतीय संघाची खरी कसोटी होती. त्यातच भारतीय प्रमुख अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह तीनच कसोटी खेळणार होता. परंतु असे असतानादेखील त्यावर मात करीत भारताने मालिकेत साधलेल्या बरोबरीला तोड नाही.
इंग्लंडने पहिली कसोटी ३७१ धावांचा यशस्वी पाठलाग करून जिंकली. १४९ धावांची शानदार खेळी करणारा सलामीवीर डकेत त्यांच्या विजयाचा शिल्पकार होता. त्याने क्रावलीसोबत १८८ धावांची भागीदारी करुन इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. भारताच्या तळाच्या फलंदाजांनी दोन्ही डावात निराशा केली. तसेच तब्बल पाच झेल भारतीय क्षेत्ररक्षकांनी सोडले. दोन्ही डावात चांगल्या सुरूवातीनंतर भारतीय फलंदाजी कोसळली. पंतने दोन्ही डावात शतके ठोकून आपण आता पूर्ण “फिट” असल्याचे दाखवून दिले. पहिल्या डावात भारताचे शेवटचे ६ फलंदाज ४१ धावांत तर दुसऱ्या डावात शेवटचे ५ फलंदाज ३१ धावांत माघारी परतले. याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. दुसऱ्या कसोटीत मात्र भारताने इंग्लंडचा ३१८ धावांनी दणदणीत पराभव करून पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली. भारतीय फलंदाजी बहरली. मग त्यावर भारतीय गोलंदाजांनी सुरेख मारा करुन दुसऱ्या डावात इंग्लंडची दाणादाण उडवली. १० बळी घेऊन आकाशदीपने इंग्लंड फलंदाजीला वेसण घातली. इंग्लंडमध्ये कसोटीत १० बळी घेणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. ६०८ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर होते. पण त्यांचा दुसरा डाव २७१ धावांत गडगडला.

ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर तिसऱ्या कसोटीत थरारक लढतीत भारताला अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करायला लागला. २०२ धावांचे विजयी लक्ष्य भारताचे थोडक्यात हुकले. जडेजाची नाबाद धावांची महत्त्वपूर्ण खेळी भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. कर्णधार स्टोक्स, आर्चरने दुसऱ्या डावात प्रत्येकी ३ – ३ बळी घेऊन भारताला विजयापासून दूर ठेवले. क्रावली, रुटने पहिल्या डावात दमदार शतके ठोकली. तर भारताचा सलामीचा फलंदाज राहुलने काढलेली शतकी खेळी व्यर्थ ठरली. पहिल्या तीन सामन्यांच्या तुलनेत चौथ्या कसोटीत धावांचा पाऊस पडला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णित राहिली. भारताच्या पहिल्या डावामधील ३५८ धावांना उत्तर देताना इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावांचा डोंगर रचला. इंग्लंडने पहिल्या डावात ३११ धावांची मोठी आघाडी घेतली. मग भारतासमोर सामना वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. कप्तान गिल बाद झाल्यानंतर भारत पराभवाच्या छायेत होता. पण अष्टपैलू जडेजा, सुंदरने तुफानी शतके करुन नाबाद २०३ धावांची भागीदारी ५व्या विकेटसाठी करुन इंग्लंडच्या मालिका विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले.
हा सामना अर्निर्णित राहिल्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला शेवटचा कसोटी सामना जिंकण्याचे आव्हान होते. शेवटच्या ओव्हल कसोटीत भारताने अवघ्या ६ धावांनी नाट्यपूर्ण विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. हा सामना जिंकून भारताने गोऱ्या साहेबांची चांगलीच जिरवली. कारण, पहिली कसोटी जिंकल्यानंतर इंग्लंड संघातील काही फलंदाजांनी आंम्ही यापेक्षा जास्त धावांचा पाठलाग करून सामने जिंकू शकतो असे तारे तोडले होते. पण पहिल्या कसोटी विजयानंतर त्यांना नंतरच्या दोन कसोटीत धावांचा यशस्वी पाठलाग करता आलाच नाही. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड फलंदाजांची बोलती बंद केली. सिराजच्या तुफानी माऱ्यामुळे भारताने ओव्हल कसोटीत स्वप्नवत विजयाची नाेंद केली. १९७१ साली याच मैदानात अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये आपल्या पहिल्याच विजयाची ऐतिहासिक नोंद केली होती. आता तब्बल पाच दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर भारतीय संघाने येथे पुन्हा एकदा विजय मिळवून त्या जुन्या विजयाच्या आठवणीना उजाळा दिला. तसेच विदेश दौऱ्यात पहिल्यांदा शेवटची कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय कसोटी सामन्यांच्या आजवरच्या इतिहासात सर्वात कमी धावांनीदेखील भारताने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.

पहिले चार दिवस सामन्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या इंग्लंडच्या विजयाचा घास शेवटच्या दिवशी सिराजने काढून घेतला. चौथ्या दिवशी तुफानी शतकी खेळी करून बुक्रसने इंग्लंडला विजयाच्या समीप नेले होते. तो १९ धावांवर असताना कृष्णाच्या गोलंदाजीवर सिराजने त्याचा झेल सोडला होता. तेव्हा सिराजवर जोरदार टीका झाली होती. पण याच सिराजने त्या चुकीची भरपाई करुन आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिले. चौथ्या दिवसाचा खलनायक असलेला जिगरबाज सिराज शेवटच्या दिवशी भारतीय विजयाचा खरा नायक बनला. आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना त्याने सामन्यात एकूण ९ बळी टिपले. त्याला कृष्णाने ८ बळी घेऊन चांगली साथ दिली. बुमराहच्या गैरहजेरीत दोन्ही कसोटीत त्याने भारतीय वेगवान गोलंदाजाची धुरा समर्थपणे संभाळताना आपली जिगर, चिकाटी दाखवून दिली. सिराजने या मालिकेत २३ बळी घेऊन इंग्लंडमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या बुमराहच्या विक्रमाची बरोबरी केली. भारतीय संघाचा या दौऱ्यातील हा विजय सांघिक विजयाचा उत्तम नमुना होता. संघातील प्रत्येक खेळाडूने या दोन कसोटी विजयात हातभार लावला. कप्तान गिलने कर्णधारपदाचा दबाव आपल्या फलंदाजीवर होऊ दिला नाही. त्याने मालिकेत सर्वात जास्त धावा केल्या. वास्तविक गिल खरंतर सलामीचा फलंदाज. पण संघहितासाठी त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय शंभर टक्के यशस्वी झाला. शेवटच्या कसोटीचा अपवाद वगळता त्याने पहिल्या चार कसोटीत जोरदार फलंदाजी केली. कर्णधार म्हणून त्याचा हा पहिलाच कठीण दौरा होता. पण आपल्या पहिल्याच खडतर दौऱ्यात गिलने आपल्या नेतृत्त्वाची चांगली चुणूक दाखवली. गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात त्याने केलेले बदल भारतीय विजयास कारणीभूत ठरले असे म्हटले तर वावगे ठरू नये. काही चुका त्याच्याकडून झाल्या. पण भावी काळात अनुभवाने तो अधिक परिपक्व होईल यात शंका नाही.
जैस्वाल, राहुल जोडीने आघाडी फळीत चांगली चमक दाखवली. जैस्वालने पहिल्या दोन कसोटीत झकास शतके ठोकून मालिकेत सुरेख सुरुवात केली. राहुलच्या फलंदाजीत आता आधिक परिपक्वता येत चालली आहे. त्यामुळे सध्या तो भारतीय संघाचा राहुल द्रवीड आहे असे म्हणावे लागेल. जडेजाने या मालिकेत सातत्याने फंलादाजीत छान कामगिरी केली. त्याला वाॅशिंग्टन सुंदरची तेव्हढीच तोलामोलाची साथ मिळाली. चौथी कसोटी वाचवण्याचे मोठे श्रेय या दोघांना द्यावे लागेल. पण जडेजा गोलंदाजीत मात्र आपला फारसा प्रभाव पाडू शकला नाही. तो फलंदाज म्हणून या मालिकेत चमकला. सुंदरच्या रुपाने या मालिकेत भारताला एक चांगला अष्टपैलू खेळाडू मिळाला. यष्टीरक्षक पंतने आपल्या तुफानी फटकेबाजीची झलक पेश करुन भारतीयच नव्हे तर इंग्लंड क्रिकेटप्रेमींची मने जिंकून घेतली. चौथ्या कसोटीत पायाला जबर दुखापत झाली असतानादेखील त्याची फिकीर न बाळगता तो दुसऱ्या दिवशी मैदानात फलंदाजीला आल्यानंतर सर्वजण अवाक झाले. पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत शतके ठोकून पंतने इंग्लंड गोलंदाजांना धोक्याचा इशारा दिला होता.
पंतसारखा लढाऊबाणा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस व्वोक्सने दाखवला. शेवटच्या कसोटीत त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे तो पहिल्या डावात फलंदाजीला आला नाही. दुसऱ्या डावात तो गोलंदाजीपण करु शकला नाही. इंग्लंडला विजय मिळवता यावा म्हणून शेवटच्या दिवशी तो डाव्या हाताला मोठे प्लॅस्टर असतानाही मैदानात आला. त्याने ऑटकिन्सला सोळा मिनिटे बॅट एकाच हातात घेऊन साथ दिली. पण शेवटी ऑटकिन्सचा त्रिफळा सिराजने उडवून सामना संपवला. या मालिकेत संघ व्यवस्थापनाने कुठला धोका पत्करायचा नाही हे धोरण आखले होते. त्यामुळे कुलदीपसारख्या सर्वोत्तम रिस्ट स्पिन फिरकी गोलंदाजाला एकाही सामन्यात खेळवले नाही. या मालिकेतील बरोबरीमुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना मोठा दिलासा मिळाला. अन्यथा त्यांची या पदावरुन गच्छंती अटळ होती. या रंगदार कसोटी मालिकेमुळे टेस्ट क्रिकेट हेच असली क्रिकेट आहे याचा पुन्हा प्रत्यय आला. भारतीय संघाची दुसरी फळी किती सक्षम आहे हे या मालिकेने दाखवून दिले. आता कामगिरीतील हेच सातत्य आगामी मालिकांत भारतीय संघ दाखवतो का ते बघायचे. २०१८ साली इंग्लंडने भारताविरुद्धची शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर गेली ७ वर्षे इंग्लंड संघ भारताविरुद्ध मालिका विजयाच्या प्रतिक्षेत आहे. सध्यातरी त्यांना अजून बराच काळ ही प्रतीक्षा करावी लागणार आहे.