कालच्या शनिवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मंत्रालयजवळील यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये गेलो होतो. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम काहीसा लवकर संपल्याने हाताशी बराच वेळ होता. म्हटलं.. एकेकाळी दररोज या परिसरात येत होतो, जरा उसंत मिळाली आहे, या परिसरातील ‘प्राणवायू’ प्राशून घरी जाऊया.. कारण, दोन्ही उपनगरात व ठाणे शहरात नरिमन पॉईंटसारखा ‘अस्सल’ प्राणवायू कुठे मिळणार? म्हणून जरा पाय मोकळे करण्यासाठी मंत्रालय परिसरात फेरफटका मारला. शिवाय शनिवार असल्याने मंत्रालय परिसरात नेहमीसारखी गर्दीही नव्हती! शिवाय “Only those who risk going too far can possibly find out how far they can go” हे वचन लक्षात असल्याने पाय थकत नाहीत तोवर चालायचे ठरवले! आणि काय आश्चर्य मंत्रालयासमोरील काही मीटर्स का होईना संपूर्ण रस्ता एकही खड्ड्याविना दिसला. तसेच अगदी विज्ञान संस्थेपासून तो अगदी एअर इंडिया इमारतीपर्यंत रस्त्यावर एकही ‘टेंगुळ’ दिसले नाही!!

मंत्रालय हा परिसर मुंबई महापालिकेच्या अख्त्यारीत येत असल्याने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे खासकरून मंत्रालय परिसरातील रस्ता बिनखड्ड्याचा ठेवल्याबद्दल अभिनंदनास जरूर पात्र आहेत. त्याचबरोबर समोरच असलेल्या भोसले मार्गावरील पदपथही नको इतका स्वच्छ व खड्डेमुक्त ठेवल्याबद्दल संबंधित विभाग अधिकाऱ्याचेही अभिनंदन केले पाहिजे असे वाटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी या महामहिम व्यक्तींकडे राज्यातील जनतेच्या वतीने दोन्ही हात जोडून विनंती करतो की, शहराच्या उर्वरित भागासाठी तसेच राज्यभरासाठीही रस्त्याचे कंत्राट अशाच पद्धतीच्या कंत्राटदाराकडे देण्यात यावे! मक्तेदारी कायदा लक्षात घेऊनच याच कंत्राटदाराकडे हे काम द्या असे म्हणता येत नाही म्हणून.. मात्र पालिका आयुक्त गगराणी यांनी यापासून बोध घेणे गरजेचे आहे.(तसे गगराणीसाहेब नेहमीच काही नवीन शिकत असतात अशी त्यांची ख्याती आहे, म्हणूनच हे धैर्य आले.) कारण मंत्रालय परिसर संपताच रस्त्यांची दुर्दशा डोळ्यांना दिसतेच!

मेट्रोचे काम सुरु असो वा नसो, मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील रस्ते व पदपथांची अवस्था केविलवाणी झाल्याचे दिसत आहे. मुंबई शहर व उपनगरांप्रमाणेच ठाण्याच्या रस्त्यांची व पदपथाची धूळधाण झाल्याचे सर्वत्र दिसत आहे. मुंबईत जसा मंत्रालय परिसरातील रस्ता चकाचक दिसतो तसाच ठाणे शहरातील एक भाग्यवान रस्ता खरंतर सेवा रस्ता ‘नितीन कंपनी ते लुईसवाडी सेवा रस्ता’ हा बिनखड्ड्याचा तसेच सेवा रस्ता असूनही टपरीविना, टायर दुरुस्ती पोरांविना दिसतो. ठाणे शहरातील तमाम सेवा रस्ते आपण कधी लुईसवाडीसारखे होऊ, ही आस लावून बसलेले आहेत. रस्त्यांवर एखाद्दुसरा खड्डा असेल तर “Stop worrying about potholes in the road and enjoy the journey” असं म्हणता तरी येईल. पण मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यांवर हजारो खड्डे आहेत व त्यांचा अनुभव लाखो चाकरमानी दररोज घेत आहेत. बाकीचे सोडा. घोडबंदर रोडवरील उड्डाणपुलावर विवियानानंतरच्या पुलावरून माजिवड्याला खाली उतरेपर्यंत सुमारे 100 जर्क बसतात. खड्डेही आणि खड्डे बुजवताना राहिलेल्या उंचवट्यामुळे… मानपाडा, पाटलीपाडा, कासारवडवली, गायमुख आदी परिसराबद्दल न बोललेलेच बरे! म्हणूनच आता जनतेनेच मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. राज्यातील जनतेलाही आता मंत्रालय परिसरासारखे खड्डेमुक्त रस्ते हवे आहेत. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगल्याचा रस्ता तसेच सह्याद्री अतिथीगृह परिसरातील रस्त्यांप्रमाणे राज्यातील इतर रस्ते का दुरुस्त होत नाहीत हे जाणण्याचा अधिकार राज्यातील जनतेला नाही काय?

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर
Nicely presented! They can ask the contractor who did the job around Mantralaya to conduct a training programme for other contractors!