गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळ विविध मल्लखांब स्पर्धांत आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा चमकदार ठसा मुंबई उपनगरची राष्ट्रीय मल्लखांबपटू निधी राणेने उमटवला आहे. तिच्या कामगिरीची दखल घेऊन नुकताच तिला २०२३-२०२४चा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, हा शासनाचा “गुणवंत खेळाडू” पुरस्कार देऊन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
२०१२ साली उन्हाळी क्रीडा शिबिरात मल्लखांबाशी निधीची पहिली ओळख झाली. तिच्या आईने बऱ्याच ठिकाणी चौकशी करुन निधीला आशिष देवल-संचिता पाटील या प्रशिक्षकांकडे मल्लखांब खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले. वयाच्या ९व्या वर्षी बोरीवली स्पोर्ट्स अॅन्ड कल्चरल सेंटरमध्ये निधीने मल्लखांबाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला या खेळातील तिचे सातत्य आणि चिकाटी बघून ३ महिन्यांतच अशिष देवल यांनी निधीला सिनियर क्लासमध्ये येण्यास सांगितले. आशिष, संचिता यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळात अभिषेक देवल यांचेदेखील मोलाचे मार्गदर्शन निधीला मिळाले. तिच्या आई-वडिलांची इच्छा होती की, अभ्यासाबरोबरच एखाद्या खेळात अथवा वाद्य वाजविण्यात आपल्या मुलीने प्राविण्य मिळवावे. ती वाद्य वाजवायला शिकली नाही. परंतु मल्लखांब खेळात मात्र अथक मेहनत आणि परिश्रम करुन निधीने खूप मोठी झेप घेतली.

सुरुवातीला ती रोजचा ६-८ तास या खेळाचा कसून सराव करायची. निधीला या खेळातील तांत्रिक बाबींची चांगली जाण आहे. नवनवे प्रकार शिकण्याची तिची धडपड कायम असते. पुस्तिकेचे नियमित वाचन, अभ्यासू वृत्ती आणि मल्लखांब संच उत्तम सादर करण्याचा शंभर टक्के प्रयत्न त्यामुळेच निधीचे संच आकर्षक आणि प्रभावी होतात. एक वेगळाच सफाईदारपणा तिच्या सादरीकरणात बघायला मिळतो. आईवडिलांच्या पाठिंब्यामुळेच ती मल्लखांब खेळात यशस्वी वाटचाल करू शकली. सुरुवातीच्या काळात तिच्या बऱ्याच स्पर्धांना आईवडिलांनी तिला प्रोत्साहन देण्यासाठी हजेरी लावली. निधीची पहिली स्पर्धा मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा होती. त्याच स्पर्धेतील तिच्या चमकदार कामगिरीमुळे मग पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेसाठी तिची निवड झाली. येथून निधीचा मल्लखांब खेळातील मुख्य प्रवास सुरु झाला. प्रशिक्षकांनी केलेल्या सरावाच्या योग्य नियोजनामुळे तसेच उत्तम आहार, विविध भारतीय व्यायाम प्रकार, योगासने या साऱ्याच्या जोरावर निधीने या खेळात अल्पकाळात चांगलीच प्रगती केली.
तीन वर्षांचा नियमित सराव आणि सतत्यपूर्ण कामगिरीमुळे तिची उज्जैन, मध्य प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. या स्पर्धेत चांगली कामगिरी करुन तिने सुवर्णपदक पटकावले. यानंतर तिच्या कामगिरीचा आलेख सतत उंचावत राहिला. आतापर्यंत निधी शालेय, आंतर कॉलेज, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडास्पर्धा, खेलो इंडिया, राष्ट्रीय युथ स्पर्धा, आखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा, फेडरेशन स्पर्धा या विविध स्पर्धांत सहभागी झाली आहे. या स्पर्धांतून तिने १००पेक्षा जास्त पदकांची भरघोस कमाई केली. कोविडच्या आधी मुलींना फक्त दोरीचा मल्लखांब हाच प्रकार होता. पण कोविडनंतर मुलींसाठी पुरलेला मल्लखांब प्रकारदेखील सुरू झाला. त्यामुळे काहीसा उशिरा एक नवा प्रकार शिकण्याची संधी निधीला मिळाली. तो शिकण्यासाठी पुन्हा अधिक मेहनत तिला घ्यावी लागली.

गोराई येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलची निधी ही विद्यार्थीनी. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मादेखील याच शाळेचा विद्यार्थी. त्यानंतर विलेपार्ले येथील डहाणूकर कॉलेजमध्ये तिने वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर तिने बीएमएसदेखील केले. सध्या ती एमकॉम पार्ट १ करत आहे. खेळाबरोबरच अभ्यासातदेखील ती तेवढीच हुशार आहे. १०वीला ९० टक्के आणि १२वीला तिला ९२ टक्के मार्क होते. महाराष्ट्रात स्पर्धांच्या निमित्ताने ती बहुतेक सर्व जिल्ह्यांत गेली आहे. तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, उत्तराखंड, गोवा, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान येथेदेखील झालेल्या विविध मल्लखांब स्पर्धांसाठी तिची निवड झाली होती. स्वामी विवेकानंद शाळेने तिला २ वर्षे तर डहाणूकर कॉलेजने तिला १ वर्ष सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविले होते.
पोईसर जिमखाना, कांदिवली आणि लोकमान्य प्रतिष्ठान मंडळ, बोरीवली यांच्यातर्फेदेखील तिला सन्मानित करण्यात आले. दिवंगत दत्ताराम दुदम, मल्लखांब सम्राट हा निधीचा आदर्श मल्लखाब खेळाडू तर अर्जुन पुरस्कारप्राप्त हिमानी परब तिची आवडती मल्लखांब खेळाडू आहे. विराट कोहली, सायना नेहवाल हेदेखील तिचे आवडते खेळाडू आहेत. फुटबॉल, मॅरेथॉन, धावणे, नृत्य, तबलावादन यामध्येदेखील तिला रुची आहे. सध्या ती बोरीवली येथील सुविद्या प्रसारक संघाच्या शाळेत मल्लखांब सहाय्यक प्रशिक्षिका म्हणून काम करत आहे. खास करून छोट्या मुलींमध्ये या खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी ती प्रयत्नशील आहे. आतापर्यंत या खेळात जे काही मिळाले आहे त्याबाबत ती समाधानी आहे. मल्लखांबामुळेच आज निधीची एक वेगळी ओळख निर्माण झाली. तिच्या या यशात तिचे पालक आणि प्रशिक्षक यांचा मोठा वाटा आहे. भावी काळात महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार तिला मिळवायचा आहे. यासाठी तिला शुभेच्छा!

