Monday, February 3, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटकाय काय नाही...

काय काय नाही पाहिले क्रॉफर्ड मार्केटच्या पोलीस प्रेसरूमने!

चार-पाच दिवसांपूर्वी मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात (महात्मा फुले मंडई असे नामकरण झालेले असले व त्यालाही अनेक वर्षे उलटून गेलेली असली तरी प्रचलित नाव क्रॉफर्ड मार्केट असेच आहे) गेलो होतो. तसे हुतात्मा चौक परिसरात अजून प्रसंगानुरूप जाणे होत असतेच. पण मार्केट परिसरातील गर्दी पाहून तेथे जाऊच नये असे वाटते. परंतु यावेळी जाणे भाग पडले. तसं पाहिलं तर टाइम्सच्या पदपथावरून सरळ खाली गेले की अंजुमन इस्लामचे मोठे पटांगण व नंतर राज्याचे भूषण असलेले जे जे कला महाविद्यालय व सरतेशेवटी तुम्हा-आम्हा सर्व मुंबईकरांची काळजी वाहणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तालयाचे विस्तीर्ण पटांगण! या विस्तीर्ण परिसरातील एका छोट्या कोपऱ्याने माझे लक्ष वेधून घेतले… ती होती आमची पोलीस प्रेसरूम!

झटकन ३५/४० वर्षांचा कालखंड डोळ्यासमोरून खळकन वाहत गेला. वारी करावी तशी दररोज वा दिवसाआड ज्या खोलीला आवर्जून भेट देत होतो त्या प्रेसरूमच्या आठवणींनी बराचवेळ त्या स्मरणरंजनातच होतो. सरावाप्रमाणे त्या दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करताच तरुण हवालदाराने हटकले. म्हणाला गेट नंबर तीनमधून पास घ्या आणि तेथूनच आत जा! गेट नंबर तीनमधून आतआलो. अधिस्वीकृतीधारक पत्रकार असल्याचे दाखवले. जुजबी तपासणी करून मला सोडले. परिसरात आलो. पोलीस आयुक्तांची नावे रांगेत डोळ्यासमोर आली. वसंत सराफ, सु. राममूर्ती, एम. एन. सिंग, रामदेव त्यागी, मल्होत्रा, हसन गफूर, दत्ता सोमण, डी. शिवानंदन, रणजित शर्मा, राकेश मारिया आदी अनेकांच्या आठवणी तरल झाल्या. अनेकांनी माहिती दिली तर काहींनी गोड बोलून कटवले. स्वतः नामानिराळे राहून दुसऱ्याच्या तोंडून सारे वदवले.

जुन्याकाळी पोलीस आयुक्तच सर्व जबाबदारी पेलत असत. तेव्हाही सहकारी होते. परंतु हल्ली मात्र सह पोलीसआयुक्तांची रांग लागलेली पाहायला मिळते. गुन्हे वेगळे, कायदा-सुव्यवस्था वेगळी, प्रशासन वेगळे, आता तर आयुक्तांच्या जोडीला विशेष आयुक्तही आणून बसवलेत! या विचारातच मी प्रेसरूमपाशी कधी आलो तेच समजले नाही. प्रेसरूम तीच होती फक्त तिच्या दरवाजाची दिशा बदलली होती. बहुतेक वास्तूशास्त्राचा विजय असावा! परंतु प्रेसरूमचा हुलिया मात्र पार बदलून गेला आहे. पूर्वी घामाघूम होऊन गोल टेबलाभोवती कधी बसतो असं होत असे. मात्र यावेळी तसं काहीच जाणवलं नाही. एकदम थंडा थंडा कुल कुल… (देश बदल रहा है, मग पोलीस मागे राहून कस चालेल.) अधिक माहिती मिळवली असता असे कळले की, प्रेसरूमचा हुलिया बदलून सुमारे १५/२० वर्षे तरी झाली असतील. ते काहीही असो. पोलीसठाण्यात तणतणत तक्रार करायला आलेल्या तक्रारदाराला शांत करून कसे सोडायचे यांचे प्राथमिक ज्ञान पोलीस प्रशिक्षणात देतात. बरे याचाच हा वस्तुपाठ असावा असे समजून मी उगा झालो.

प्रेसरूमवर तैनात असलेल्या फौजदार सुपे आणि हवालदार खंडागळे यांनी आदराने विचारपूस केली. तेथे हजर असलेल्या हिंदुस्थान टाइम्स व साम टीव्हीच्या प्रतिनिधींनीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. समोरच प्रेसरूमचे अध्यक्षपद भूषवणाऱ्यांची नावे होती. त्यात राम पवार, प्रभाकर पवार व निशांत सरवणकर या लोकसत्ता व सांज लोकसत्तेतील सहकाऱ्यांची नावे पाहून कॉलर ताठ झाली. तुम्ही म्हणाल अहो प्रभाकर पवार हे तर सामनाचे होते. बरोबर आहे तुमचे.. पण त्यांनी पत्रकारितेचे धडे सांजमध्येच गिरवले आहेत, असे मी वडीलकीच्या नात्याने म्हटले तर ते थोडेच नाकारणार आहेत!

तेथील खुर्चीत बसल्यावर प्रथम आठवण झाली ती राम पवार आणि किरण नाबर यांची! किरणला तर प्रेरूमचा मठाधिपती म्हणायचो आम्ही. गडी सकाळी ११च्या सुमारास हजर असायचाच! राम तर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास प्रेसरूमचा दरवाजा उघडला जातानाच यायचा!! विजयकुमार बांदल, विठ्ठल डेम्पो, खानविलकर, टाइम्सचा बालकृष्णन, रामानुजम, किरण हेगडे, निशांत सरवणकर, उस्मान गनी, यु एन आयचा इझाज, राजेश पुरंदरे, डे या सर्वांची आठवण झाली नसती तरच नवल! या सर्व साथीदारांनी मदत केली. माहिती मिळवून देणारी माणसे जोडून दिली. या सर्वांच्या खांद्यावर उभा राहून मी काही पाहू शकलो. तेच लिहिले व वाचकहो त्याला तुम्ही भरभरून दादही दिलीत. ती तुम्ही अजूनही देत आहात म्हणून तर धडपड अजून चालू आहे.

शिवसैनिकांना बदडून काढा

ज्युलिओ रिबेरो पोलीस आयुक्त असताना शिवसैनिकांनी महाआरती करण्यास सुरुवात केली होती. छोटी दंगलही झाली होती. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाय योजा असे आदेश सरकारने दिले होते. त्यात भर म्हणून महाआरती करणाऱ्या शिवसैनिकांना बदडून काढा असा गुप्त आदेश पोलीस नोटिशीत आला होता. नेमका हाच आदेश राम पवार याच्या वाचनात आला व संध्याकाळी त्याने मला फोनवरून माहिती दिली. तशी बातमीही दिली व त्याच रात्री त्या नोटिशीची झेरॉक्सही आणून दिली. राम तेव्हा सकाळी सकाळीच प्रेसरूमला जात असे. इंग्रजी पेपर्सना तसे हे नवीन नव्हते. रामने नेहमीप्रमाणे नोटिशीचा बंच पाहायला मागितला. तसा तो देण्यातही आला आणि त्या नोटिशीने नंतरचे चार दिवस आयुक्त साहेबांचा घामटं काढलं. (दुसऱ्या दिवशी प्रत्येक पोलीसठाण्याच्या हद्दीत काय घडू शकते व त्याचा मुकाबला कसा करावा असे पोलीस आदेश या नोटिशीत असतात. हवालदार व अंमलदारांच्या बदल्या वा नेमणूकीचे ठिकाणही यात दिलेले असते. प्रत्येक पोलीसठाण्यात ही नोटीस रात्री दहा वाजल्यानंतर पोहोचते. या नोटिशीचा एकत्र बंच प्रेसरूममध्ये ठेवला जायचा) रिबेरो यांनी मात्र नंतर हा नोटिशाचा बंच प्रेसरूममध्ये ठेवण्यास मनाई केली.

प्रेसरूममधून परदेशी कॉल

मुंबईमध्ये टोळीयुद्ध ऐनभरात असताना एक गंभीर घटना घडली व तिचा थेट संबंध प्रेसरूममधील टेलिफोनशी होता. कुणा वार्ताहराने थेट दुबईशी संपर्क साधल्याचे प्रकरण होते. आधी कुणाला हे माहीतच नव्हते. पण जेव्हा टेलिफोनचे बिल आले तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. परदेशी केलेला हा कॉल दुबईला होता हे समल्यावर तत्कालीन आयुक्त मेढेकर यांनी प्रेसरूममधील फोनच काढून टाकला होता. त्यादरम्यान फोनविना पत्रकारांचे हाल व्हायला लागले. काही पत्रकारांनी मुंबई सकाळचे तत्कालीन संपादक माधवराव गडकरी यांच्या कानावर ही तक्रार घातली. झाले माधवरावांनी आपल्या खरमरीत शैलीत पोलीस प्रशासनाची चंपी केली. अर्थातच सरकारने आदेश देताच हा फोन तत्काळ सुरु करण्यात आला.

अशी ही प्रेसरूम १९६८मध्ये पोलीस आयुक्त मोडक यांनी सुरु केल्याची माहिती मिळते. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखाही याच इमारतीत असल्याने गुन्हे वार्ता वा लेख वाचण्यात जनतेला नेहमीच रस असल्याने तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी चपखल पद्धतीने ही प्रेसरूम याच इमारतीत ठेवल्याचे समजले. भालचंद्र मराठे, भा म निमकर, प्रमोद नवलकर याच प्रेसरूमचे मेरूमणी ठरतील. माझ्यासारख्या कित्येक पत्रकारांनी जसे या प्रेसरूमला पाहिले तसे या प्रेसरूमनेही बरेच काही पाहिले आहे. परंतु आता त्याची चर्चा नको..

“People sleep peacefully in their beds at night only because rough men to do violence on their breath ” असं पोलिसांबाबत नेहमीच बोललं जात असलं तरी तो नेमका कसे वागतो, कसा गुन्ह्याला प्रतिबंध करता येऊ शकतो हे अशा प्रेसरूममधून समजायला लागते. सध्या पोलिसांच्या कामाबाबत कुणीच समाधानी नाही हे माहित असूनही लोकसंख्येच्या अफाट संख्येपुढे गुन्ह्यांना प्रतिबंध योग्यप्रकारे होत आहे हे पोलिसांचे यशच नव्हे काय? शंभर टक्के समाधानी आपण आपल्या घरातही नसतो. शिवाय दररोज बदलणाऱ्या तंत्राने गुन्हेगारीही बदलते आहे. शिवाय समाजच चाहूबाजूने वाढत असल्याने सर्वचजण चक्रावून गेले आहेत. “Anyone can hold helm when sea is calm” हेही तितकंच खरं आहे. शेवटी पोलीस प्रेसरूमबाबत लिहितोय आणि ‘राम राम देवा..’ अर्थात अरविंद इनामदार यांची आठवण होणार नाही असं संभवतच नाही. कारण याच इमारतील सहपोलीस आयुकतांच्या चेंबरमध्ये बसून पोलीस, राजकारण येथपासून तो साहित्यापर्यंतच्या गप्पा झालेल्या आहेत. तीव्रतेने आठवण होते ती सीआयडीतील सुदेश पाडवी, अजित देशमुख, सुभाष इनामदार, राजेंद्रकुमार त्रिवेदी तसेच केशवराव सहस्रबुद्धे, विष्णू कुंभार अशा अगणित पोलीस अधिकाऱ्यांची. आता त्या फक्त आठवणीच आहेत..

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

हा पाहा मालाड रेल्वेस्थानकाचा मेकओव्हर!

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाची दुरुस्ती वा मेकओव्हर गेली तब्बल सात-आठ वर्षे सुरु आहे. (काहींनी तर हे काम सुरु होऊन दहा वर्षे तरी झाली असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे.) मालाड, कांदिवली व बोरिवली ही वाढणारी रेल्वेस्थानके आहेत हे...

बीडच्या आयपीएसला गायब केले, तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?

गेल्या २०/२५ वर्षांत बीड - परळी परिसरात याहूनही काळी कांडं घडली.. अहो आयपीएसला गायब केले गेले.. तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?.. "करा रे खुशाल करा हवा तो राडा धमाल करण्याचा जमाना आहे बिनधास्त करा, बलात्कार -भ्रष्टाचार - अत्याचार - भरसभेत -...

अजितदादांना नामोहरम करण्याचा भाजपचा प्रयत्न?

गेले सुमारे सव्वा महिना राज्यभर गाजत असलेले बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्त्याप्रकारण संपवण्याचे प्रयत्न सुरु असताना व त्यात अपेक्षित यश दृष्टीपथात असतानाच भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा आरोपाचा 'नगारा' सतत का वाजत आहे, असा प्रश्न राजकीय...
Skip to content