Homeटॉप स्टोरीराज्यपाल देवव्रत यांच्या...

राज्यपाल देवव्रत यांच्या शपथविधीलाही अजितदादांची दांडी!

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आजही समारंभाला अनुपस्थित होते. काल आचार्य देवव्रत तेजस एक्स्प्रेसने मुंबईत सपत्निक उतरले. तेव्हा मुंबई सेंट्रेल रेल्वेस्थानकावर मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उभयतांचे स्वागत केले होते. उपमुख्यमंत्री पवार त्यावेळीही हजर राहिले नाहीत. किंबहुना ते पुण्यात विकासकामांचा आढावा घेत होते.

संस्कृत भाषेतून घेतली शपथ

राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेऊन उपस्थितांना धक्का दिला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदावर निवड झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी दर्शनादेवी तसेच इतर कुटुंबीय, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, मुख्य सचिव राजेश कुमार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनिषा म्हैसकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव राजेश कुमार यांनी आचार्य देवव्रत यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधीनंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. २०१९पासून आचार्य देवव्रत गुजरातचे राज्यपाल आहेत. त्यापूर्वी २०१५ ते २०१९ या कालावधीत ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. १८ जानेवारी १९५९ रोजी जन्मलेले देवव्रत यांनी पदवीनंतर इतिहास आणि हिंदीत पदव्युत्तर अभ्यास केला आहे. ते बी.एड. आहेत. त्यांनी योगशास्त्रात डिप्लोमा घेतला आहे. नैसर्गिक चिकित्साशास्त्र व योगिक सायन्समध्ये त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. अध्यापन व प्रशासन क्षेत्रात त्यांना ४५ वर्षांचा अनुभव आहे. 

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content