Saturday, April 19, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसमुंडे राजीनाम्यासाठी नाही...

मुंडे राजीनाम्यासाठी नाही तर धान्यपुरवठ्यासाठी दिल्लीत!

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्याप्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरील चर्चेला आज जवळजवळ पूर्णविराम मिळाला. राजधानी दिल्लीत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत असतानाच धनंजय मुंडे दिल्लीत धडकल्याने त्यांच्या राजीनाम्यावर दिल्लीत निर्णय होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची बैठक होणार असून त्यात यावर निर्णय होईल, अशी अटकळ काहींनी बांधली. परंतु आपण ना मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटायला दिल्लीत आलो ना अमित शाह यांच्या भेटीसाठी. महाराष्ट्रातल्या शिधावाटप यंत्रणेपुढे असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आपण दिल्लीत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतल्याचे मुंडे यांनी माध्यमांपुढे स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची शक्यता धूसर झाल्याचे दिसून आले.

सरपंच देशमुख यांच्या हत्त्याप्रकरणातल्या आरोपीला फाशी झाली पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. या प्रकरणात आपला संबंध आहे की नाही याबाबत आपण मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्र्यांना विचारू शकाल. मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा मागितला तर आपण देऊ, असेही धनंजय मुंडेंनी सांगितले. इतकेच नव्हे तर ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रालयाच्या कामकाजाला सुरूवात केली ते पाहता मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न जवळजवळ निकालात निघाला असल्याचे आता बोलले जात आहे.

महाराष्ट्र राज्याला लाभार्थ्यांचे सुधारित वाटप NFSA अधिनियम – २०१३ अंतर्गत तत्कालीन लोकसंख्येच्या आधारावर ७ कोटी १६ हजार इतके लक्ष्य दिलेले होते. मात्र मागील दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार हे लक्ष्य वाढवून ८ कोटी, २० लाख, ६१ हजार इतके करण्यात यावे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला २०२१ साली प्रस्ताव दिलेला आहे, त्यास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आज मुंडे यांनी प्रल्हाद जोशींकडे केली. ऑनलाईन वितरण प्रणालीत भासणाऱ्या लहानमोठ्या समस्या दूर कराव्यात, Epos मशीन संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करणे, आदी समस्यांबाबत धनंजय मुंडे यांनी जोशी यांना माहिती दिली.

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाअंतर्गत प्रलंबित परतावे, सीएमआर खरेदीबाबत थकबाकी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना विचारात घेऊनच वितरण आदेश बदलणे, रेल्वे रेकदरम्यान अन्नधान्य उचलण्यास FCI दुपारी तीननंतर परवानगी देत नाही, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यवाही करणे, इत्यादीविषयी या बैठकीत चर्चा झाली, असेही मुंडेही म्हणाले.

Continue reading

तब्बल 40 वर्षांनी भारताचे दुसरे अंतराळवीर झेपावणार अवकाशात

अंतराळ क्षेत्रात वाटचालीत एक नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत सज्ज झाला असून, पुढच्या महिन्यात भारतीय अंतराळवीराचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम आयोजित होणार आहे. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांषू शुक्ला, ऍक्झियॉम स्पेसच्या एएक्स-4 मोहिमेचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ...

पोराचा बाजार उठला रं…

जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं शीर्षकगीत रिलीझ करण्यात आलं. त्यापाठोपाठ आता याच चित्रपटाचं नवं रोमॅन्टिक गाणं 'पोराचा बाजार उठला रं..' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सूरज चव्हाण, जुई...

‘एप्रिल मे 99’ने होणार मराठी चित्रपट महोत्सवाला सुरूवात

मुंबईच्या प्रभादेवीतल्या महाराष्ट्र कला अकादमीमधील पु. ल. देशपांडे सभागृहात येत्या २१ ते २४ एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४१ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन २१ एप्रिलला सायंकाळी ६...
Skip to content