Sunday, February 23, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटकांबळे कुटुंबियांनी उचलले...

कांबळे कुटुंबियांनी उचलले मर्दानी खेळ जिवंत ठेवण्याचे शिवधनुष्य

पारंपरिक शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळ जिवंत ठेवण्याचे मोलाचे कार्य गेली अनेक वर्षे रत्नागिरी येथील कांबळे कुटुंबीय करत आहेत. दिवंगत महादेव व्यायामशाळा वेतोशी, रत्नागिरीच्या माध्यमातून हे कार्य गेली अनेक वर्षे सुरु आहे. सध्या या कार्याचा वारसा वस्ताद सुधीर कांबळे यांनी सुरु ठेवला आहे. सुरुवातीला त्यांचे आजोबा वस्ताद यशवंत कांबळे, वडील वस्ताद गणपत कांबळे, चुलतभाऊ सुहास कांबळे, महादेव कांबळे यांनी या युद्धकला, मर्दानी खेळाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर वस्ताद मालू कांबळे, वस्ताद यशवंत कांबळे, वस्ताद गणपत कांबळे, वस्ताद अर्जुन कांबळे, वस्ताद आर. आर. कांबळे, वस्ताद सुहास कांबळे, वस्ताद गोविंद कांबळे, वस्ताद रघुनाथ कांबळे, वस्ताद बाळू कांबळे या सर्व वस्तादांनीदेखील मर्दानी खेळाचे जतन करण्यासाठी आपले भरीव योगदान दिले. वस्ताद दिवंगत महादेव व्यायामशाळा वेलोशी, रत्नागिरी या शाखेच्या प्रमुखपदी सुधीर कांबळे कार्यरत आहेत.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सुधीर कांबळे यांनी आपले आजोबा आणि वडिल यांच्याकडून या युद्धकला आणि मर्दानी खेळाचे धडे गिरवले. ही कला त्यांच्या खानदानातच गेली अनेक वर्षे जोपासली जात आहे. त्यामुळे साहजिकच छोटा सुधीर या कलेच्या प्रेमात पडला. मग आजोबा, वडिलांच्या तालमीत छोटा सुधीर चांगला तयार झाला. त्यानंतर आपल्याकडची कला इतरांना द्यावी हा ध्यास सुधीरने घेतला. त्यातूनच शिवशंभो मर्दानी आखाडा उदयास आला. आज चार दशके सुधीर कांबळे हे खेळ जिवंत ठेवण्यासाठी आपल्या खिशाला चाट देऊन जिवाचे रान करत आहेत.

युवक क्रीडा मंडळ, मिरजोळे, रत्नागिरी, मीरा-भाईंदर, मुंबई सेंट्रल येथे शिवशंभो मर्दानी आखाडा संचलित दिवंगत महादेव व्यायामशाळा वेलोशी, रत्नागिरी, मीरा-भाईंदर महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून अनेक युवा तरुण-तरुणींना स्वसंरक्षणाकरीता या कलेचे सुधीर कांबळे प्रशिक्षण देत आहेत. आतापर्यंत ५ हजारांपेक्षा जास्त तरुण-तरुणींना त्यांनी या कलेचे प्रशिक्षण दिले आहे. या कलेमध्ये एकूण ५२ विविध प्रकारांचा समावेश आहे. त्यामध्ये बनाटी, बाणा, ढाल, तलवार, थाला, दांडपट्टा, सिंगल पट्टा, डबल पट्टा, सिंगल ढाल-तलवार, डबल ढाल तलवार, पाचवार काठी, सातवार काठी, तीनवार काठी, झोड काठी, बंदिस्त, सांबरशिंग, आगीचे प्रात्यक्षिक, खंजीर, विटा, काट पवित्रा या काही महत्त्वांच्या प्रकारांचा समावेश आहे.

या एका प्रकारातदेखील अनेक सबप्रकार असून त्याची संख्यादेखील खूप मोठी आहे. उदा. पट्टा प्रकारात दांडपट्टा, डबलपट्टा ढाल घेऊन, तलवार घेऊन, काठी घेऊन पट्टा फिरवणे असे विविध प्रकार समाविष्ट आहेत. नारळ फोडणे, कांदा कापणे, काकडी कापणे असे प्रकारदेखील पट्ट्यामध्ये येतात. या खेळाच्या जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धादेखील होतात. त्यामध्ये शिवशंभो मर्दानी आखाड्याच्या खेळाडूंचा चांगलाच बोलबाला आहे. अलिबाग येथे झालेल्या लाठी इंडिया स्पर्धेत शिवशंभोच्या खेळाडूंनी पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतर दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय व मार्शल आर्ट ऑलिंम्पिक स्पर्धेतदेखील त्यांचाच आखाडा सरस ठरला. गोवा येथे झालेल्या साऊथ एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत शिवशंभो मर्दानी आखाड्याला उपविजेतेपद मिळाले. सिलंबटम लाठीकाठी स्पर्धेत शिवशंभो मर्दानी आखाड्याच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय ते राष्ट्रीय स्पर्धपर्यंत मोठी झेप घेतली. राष्ट्रीय स्पर्धेत दक्षिणेकडच्या राज्यांना मागे टाकून शिवशंभो आखाड्याने बाजी मारली.

आज सिलंबटम लाठीकाठी ही कला दक्षिणेकडच्या राज्यात बरीच प्रसिद्ध आहे. तेथे शाळांमध्येदेखील लाठीकाठीचे प्रशिक्षण दिले जाते. शूलप्रताप आरगडे, अथर्व कांबळे, सारा कांबळे, विश्वनाथ नाईक, आर्या परब, सिद्धी परब, अथर्व जाधव, हिरण्या शेगडे, शार्दुल सावंत, शरयु सावंत, शुभ्रा सावंत, वेदांत विचारे, कौत्सुभ साळोसकर, ओम बिराजदार, विस्मया शिंदे, दीक्षा मदन, प्रथमेश बागलकर, गौराश सावर्डेकर, दैविक सावर्डेकर या शिवशंभो मर्दानी आखाड्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करुन आपल्या आखाड्याचे नाव मोठे केले. अवघ्या ५ वर्षांच्या ओम धावडेने ही कला चांगलीच आत्मसात करून सर्वांची शाब्बासकी मिळवली आहे. त्याचे काही व्हिडिओदेखील आहेत.

आतापर्यंत आखाड्यातर्फे ५०पेक्षा जास्त ठिकाणी या कलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली आहेत. त्यामध्ये लहानापासून मोठ्यांपर्यंतचा सहभाग असतो. या थरारक प्रात्यक्षिकांना सर्वत्रच शाबासकीची मोठी पावती मिळाली आहे. या प्रात्यक्षिकांचे देखणे, सफाईदार सादरीकरण बघून बघणारे अचंबित होतात. मीरा-भाईंदर आणि मुंबई सेंट्रल येथे आखाड्यातर्फे या कलेचे नियमित प्रशिक्षण दिले जाते. तेथे युवा-युवतींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन्हीकडे शंभरपेक्षा जास्त मुले-मुली या कलेचे धडे घेत आहेत. दररोज तीन तास कसून सराव दोन्ही ठिकाणी सुरू असतो. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने एक हॉल प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून दिला आहे. मुंबई सेंट्रल येथे बॉम्बे वायएमसीएने हॉल उपलब्ध करून दिला आहे.

सध्या बऱ्याच शाळांमधून प्रशिक्षणासाठी कांबळे यांच्याकडे विचारणा होत आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे मोठे सहकार्य आखाड्याला मिळाले आहे. पालकांचेदेखील उत्तम सहकार्य कांबळे आणि त्यांच्या टीमला मिळत आहे. भविष्यात मीरा-भाईंदर महानगरपालिकेने हा हॉल आखाड्याला कायमस्वरुपी उपलब्ध करुन दिला तर अजून मोठ्या प्रमाणावर युवा-युवतींना प्रशिक्षण देता येईल, असे सुधीर कांबळे यांना वाटते. सुधीर कांबळे यांना विश्वनाथ नाईक, शुलप्रलाप अरघडे, अथर्व कांबळे, संजय तांबे, विनोद धावडे, प्रियांका कदम, दीपक सावंत, वैशाली विचारे, मेधा सालसकर, प्रणाली चव्हाण, विनोद मदन, राजेश जाधव या सहकाऱ्यांची मोठी मदत होत आहे.

ही युद्धकला आणि मर्दानी खेळ शिकणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही कणखर असायला हवे. तसेच विलक्षण एकाग्रतेचीदेखील मोठी गरज आहे. कारण प्रतिस्पर्ध्याचा वेध घेताना तुमच्याकडे अचूकता आणि एकाग्रता या दोन गोष्टी असणे खूप महत्त्वाच्या आहेत. आता या कलेसाठी लागणारी साधन‌सामुग्री खूप महागडी आहे. चांगल्या दांडपट्ट्याची किंमत साधारण २० ते २५ हजार रुपये आहे. कोल्हापूर, कऱ्हाड, सातारा येथे या कलेतील साधने उपलब्ध आहेत. ती बनवायची असल्यास तयार करणाऱ्याला नारळ, शाल, रक्कम देऊन त्याला बनवण्यास सांगण्याची परंपरा आहे. आता आपल्या येथेदेखील लाठीकाठी प्रशिक्षण सुरु करण्याचा जीआर निघाला आहे. ही गोष्ट या कलेचे संवर्धन होण्यासाठी महत्त्वाची असल्याचे सुधीर कांबळे यांचे मत आहे.

स्वतः उत्तम खेळाडू, प्रशिक्षक असलेले सुधीर कांबळे मर्दानी खेळाचे वस्ताद असून सिलंबटमचे राज्य संघटनेचे अध्यक्ष आहेत तसेच लाठी इंडिया मीरा-भाईंदरचे अध्यक्ष असून, मुंबई सेंट्रल मर्दानी खेळाचे वस्ताद आहेत. आगीची थरारक प्रात्यक्षिके करण्यात कांबळे यांचा हातखंडा आहे. भविष्यात ही कला जागतिक पातळीवर नेण्याचे कांबळे यांचे स्वप्न आहे. तसेच आजच्या कठीण काळात जास्तीतजास्त जणांना स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांना आणखी सक्षम करण्यासाठी कांबळे यांचे प्रयत्न कायम सुरुच राहणार आहेत.

अधिक माहितीसाठी- सुधीर कांबळे (८९२८९१६८५५)

1 COMMENT

  1. खूपच छान उपक्रम राबविले जात आहे आपली संस्कृती लोप पावत असताना अशेच आखाडे व्यायाम मंडळे तयार होणे गरजेचे आहे.
    वस्ताद सुधिर कांबळे खरोखरच आपले कार्य देशातील तरुण पिढी सुदृढ व सशक्त बनवणारे आहे.
    आपल्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा.
    अविनाश महाडीक (क्रीडा शिक्षक)

Comments are closed.

Continue reading

कोण होणार “चॅम्पियन”?

तब्बल ८ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा पाकिस्तान-युएईमध्ये सुरू झालेल्या आयसीसीच्या ९व्या "चॅम्पियन्स" चषक क्रिकेट स्पर्धेत कोण होणार "चॅम्पियन" याबाबत कोट्यवधी क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. क्रिकेट जगतात मिनी विश्वचषक स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे शेवटचे आयोजन २०१७मध्ये इंग्लंड-वेल्स...

आम्हीच खरे चॅम्पियन्स!

मलेशियात झालेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या दुसऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या भारताने यंदादेखील जबरदस्त खेळ करुन जेतेपदाला गवसणी घातली आणि आम्हीच या स्पर्धेचे खरे "चॅम्पियन्स" असल्याचे दाखवून दिले. २०२३मध्ये झालेल्या पहिल्या स्पर्धेत शेफाली वर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारताने इंग्लंडला नमवून...

बुमराह की जय हो!

भारताचा अनुभवी, वेगवान गोलंदाज ३१ वर्षीय जसप्रित बुमराहची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२४मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू तसेच सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून निवड करुन त्याच्या अतुलनीय कामगिरीची योग्य दखल घेत त्याचा उचित गौरव केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये. ५ जानेवारी...
Skip to content