भाईंदर (पश्चिम) येथील सुभाष मैदानात असलेल्या श्री गणेश आखाड्यात उद्याचे युवा पहेलवान तयार करण्याचे मोठे कार्य गेली २४ वर्षे वस्ताद वसंतराव पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत. मीरा-भाईंदर परिसर आता खूपच गजबजलेला आहे. तेथे आता इतर भाषिकांची मोठी संख्या असतानादेखील कुस्ती हा खेळ जीवंत ठेवण्यासाठी पाटील आणि त्यांचे सहकारी जीवाचे रान करत आहेत. तसं बघायला गेलं तर काँक्रीटच्या जंगलात लाल मातीतल्या हिऱ्यांना या आखाड्यात पैलू पाडले जात आहेत.
वस्ताद वसंतराव पाटील यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे श्री गणेश आखाड्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. मूळचे सांगली, शिराळा, अंत्री बुद्रूक येथील असलेले वसंतराव पाटील यांचे चुलते गणपती पाटील नामवंत कुस्तीपटू होते. त्यांचेच बघून वसंतरावदेखील कुस्तीच्या प्रेमात पडले. सुरुवातीला इस्लामपूर येथील नामवत मंत्री तालिम येथे पाटील यांनी या खेळाचे धडे गिरवले. सखाराम वखारवाले, वस्ताद बबन सावंत हे सुरुवातीचे पाटील यांचे प्रशिक्षक होते. १०-१५ वर्षे पाटील यांनी जिल्हा, राज्य, विद्यापीठ स्पर्धा गाजवल्या. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी मुंबई शहर संघाचे प्रतिनिधित्त्वदेखील केले. वडिलांचा व्यवसाय मुंबईत असल्यामुळे मग पाटीलदेखील मुंबईत आले. मुंबईत आल्यावरदेखील कुस्ती त्यांना स्वस्त बसून देत नव्हती. दादर येथे क्रांतीसिंह नाना पाटील व्यायामशाळा सुरु करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. येथे त्यांचा कुस्तीचा सराव सुरुच होता.
मुंबईत आल्यानंतर मुंबई शहर तालिम संघाशी पाटील जोडले गेले. तेथे ३० वर्षे विविध पदांवर त्यांनी काम केले. १९९५-९६मध्ये पाटील भाईंदर येथे राहण्यास आले. तेथे अमरदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ललित विद्या निकेतन या शाळेची स्थापना केली. काही वर्षांतच आजूबाजूच्या परिसरात शाळेने आपली वेगळी ओळख निर्माण केली. मग येथेदेखील कुस्तीची तालिम असावी असे स्वप्न वसंतराव पाटील यांनी पाहिले. शाळेमुळे समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, राजकीय नेते यांच्याशी त्यांचा संबंध आला. सुरुवातीला मिलिंद लिमये, ध्रुवकिशोर पाटील यांच्या मदतीने छोटा आखाडादेखील तयार केला. मग आमदार गणेश नाईक यांच्याकडे जागेसाठी शब्द टाकला. गणेश नाईक यांनी सुरुवातीच्या काळात आखाड्यासाठी जागा दिल्यामुळे श्री गणेश आखाड्याची अखेर निर्मिती झाली.
सुरुवातीला युवा पहेलवान या आखाड्यात प्रशिक्षणासाठी आणायला तारेवरची कसरत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना करायला लागली. कारण आखाड्याजवळील परिसर सर्वसामान्यांचा होता. तेथे आग्री, कोळी, गुर्जर, मारवाडी, ख्रिश्चन अशी वस्ती होती. त्याचबरोबर माथाडी कामगार, रिक्षावाले, डबेवाले, गॅस वितरीत करणारे अशीच मंडळी आजूबाजूला राहत होती. मग त्यांच्याच मुलांना हाताशी धरुन हळुहळू कुस्तीचा श्रीगणेशा गणेश आखाड्यात सुरु झाला. सुरुवातीला माथाडी कामगारांचीच मुले असलेले अवधे ८-१० कुस्तीपटू येथे प्रशिक्षणासाठी येत होते. आज हीच संख्या १००पेक्षा जास्त आहे. तसेच १५-२० मुलीदेखील येथे नियमित कुस्तीचा सराव करतात. विलेपार्ले, बोरीवली, दहिसर येथून कुस्तीपटू नियमित या आखाड्यात सरावासाठी येतात. मीरा-भाईंदरमध्ये कुस्तीचे वातावरण नसताना आता श्री गणेश आखाड्याच्या माध्यमातून या खेळासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
आज ठाणे जिल्ह्यात श्री गणेश आखाडा अव्वल क्रमांकावर असून अनेक चांगले पहेलवान या आखाड्यातून पुढे आले आहेत. युवा जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारा साईनाथ पारधी याने याच आखाड्यात आपल्या सुरुवातीच्या काळात कुस्तीचे धडे गिरवले होते. कोमल देसाई, वैभव माने, अक्षय माने, गणेश शिंदे, विशाल माटेकर, ओम जाधव, सूरज माने, प्रिन्स यादव, मनिषा शेलार, डॉली गुप्ता, मनस्वी राऊत, कोमल पटेल, कविता राजभर यांनी अनेक स्पर्धांत चमकदार कामगिरी करुन श्री गणेश आखाड्याचे नाव प्रकाशझोतात आणले. वैभव माने, कोमल देसाई हे एनआयएस प्रशिक्षक येथे नियमित कुस्तीपटूंना या खेळाचे धडे देतात. सकाळी ५ ते ८ आणि सायंकाळी ५ ते ८ या दोन सत्रात येथे कुस्तीचा दम ३६५ दिवस सतत घूमत असतो. धिरेंदर शुक्ला, विनित शाह येथे योगाचेदेखील धडे देतात. श्री गणेश आखाड्यातर्फे मे महिन्यात निवासी शिबिराचेदेखील आयोजन केले जाते. २१ दिवसाच्या या प्रशिक्षण वर्गाला चांगला प्रतिसाद मिळतो. या खेळातील दिग्गज शिबिरार्थीना मार्गदर्शन करतात. इतर राज्यातूनदेखील काही कुस्तीपटूंचा सहभाग या शिबिरात असतो. छत्रपती पुरस्कारप्राप्त नामदेव बडरे, अंकुश वरखडे, विकास पाटील, अमोल साठे, विवेक नायकल यांचे मोलाचे मार्गदर्शन या निवासी शिबिरात कुस्तीपटूंना मिळते.
मीरा-भाईंदर महानगरपलिकेचे मोलाचे सहकार्य नेहमीच श्री गणेश आखाड्याला मिळाले आहे. त्याचबरोबर मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघाचेदेखील मोठे पाठबळ श्री गणेश आखाड्याला मिळाल्यामुळेच कुस्ती क्षेत्रात मोठी झेप या आखाड्याने घेतली आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी आखाड्याचे चांगले संबंध असल्यामुळे त्यांचीदेखील मदत आखाड्याला नेहमीच मिळत असते. माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी सुरुवातीला ६ लाखांची मॅट आखाड्याला भेट दिली होती. आखाड्यात अत्याधुनिक कुस्ती खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. अर्जुन, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त राहुल आवारे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शिवाजीराव म्हस्के, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त नजरुद्दीन नायकवडी, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त संदीप यादव, महान भारत केसरी सिकंदर शेख, माऊली जमदाडे, नरसिंग यादव, गोविंद पवार या दिग्गज कुस्तीपटूंनी आखाड्याला भेट देऊन वसंतराव पाटील यांना शाबासकी दिली. माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार नरेंद्र मेहता, आमदार प्रताप सरनाईक, काँग्रेसचे माजी आमदार मुझ्झफर हुसेन, माजी नगरसेवक रोहिदास पाटील, व्ही. सी. शाह, नोबेल फाऊंडेशनचे विजय पारीख, शंकर वीरकर, सचिन डोंगरे, सुधाकर गायकवाड यांनी नेहमीच मदतीचा हात श्री गणेश आखाड्चासाठी पुढे केला आहे.
या आखाड्याचे सर्वेसर्वा असणाऱ्या वस्ताद वसंतराव पाटील यांचा कुस्ती हाच श्वास आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांनी या आखाड्यासाठी आपले सर्वस्व दिले असल्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये कुस्ती खेळ जीवंत आहे. स्वतःच्या खिशाला चाट देऊन कुस्तीसाठी केलेल्या वसंतराव पाटील यांच्या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली असून आतापर्यंत त्यांना ३०पेक्षा जास्त पुरस्कारदेखील मिळाले आहेत. आगामी काळात नव्या जागेत आखाडा स्थलांतरित होणार आहे. नवा आखाडा दुमजली असेल. तेथे कुस्ती खेळाची सर्व अद्ययावत साधने उपलब्ध असतील. २०२५मध्ये श्री गणेश आखाडा आपला रौप्य महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणार आहे. श्री गणेश आखाड्याचा आदर्श महाराष्ट्रातील इतर आखाड्यांनी घेतला तर राज्यात चांगले पहेलवान तयार होऊ शकतील यात शंका नाही.