Thursday, November 21, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजबाबा सिद्दीकींच्या हत्त्येमागे...

बाबा सिद्दीकींच्या हत्त्येमागे बिष्णोई गँग की एसआरए? 

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर असताना अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या वांद्रे विधानसभा मतदारसंघात गर्दीच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा भररस्त्यात गोळ्या घालून खून करण्यात येतो ही खरोखरच लाजिरवाणी घटना आहे. त्याहीपेक्षा संतापजनक गोष्ट म्हणजे तपास होण्याआधीच खून झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी या हत्त्येचा संबंध बिष्णोई गँगशी जोडणे! लॉरेन्स बिष्णोई गँगच्या माणसांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. ते त्यांची बाजू तगडा वकील देऊन मांडतीलच, पण ज्या घाईगर्दीने बिष्णोई गँगचे नाव पोलिसी सूत्रांचा हवाला देऊन जाहीर केले गेले त्याला हलगर्जीपणाचा कळसच समजले पाहिजे.

बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे माजी आमदार होते. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून ते सलग तीनवेळा निवडून आलेले होते. गेल्या निवडणुकीत भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा वांद्रे पूर्व मतदारसंघातील आमदार आहे. झिशान यांच्या निर्मलनगर कार्यालयातून बाहेर पडल्यावर भररस्त्यात व गर्दीत हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी हिंदी चित्रपटक्षेत्रात लोकप्रिय होते. प्रख्यात अभिनेता सलमान खान हा त्यांचा जिगरी दोस्त होता हे जगजाहीर होते. सलमान खानच्या कुटुंबाच्या ते अत्यन्त जवळचे होते. म्हणूनच काही महिन्यांपूर्वी बिष्णोई गँगने सलमानच्या घराच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच सलमानच्या जवळच्या व्यक्तीची हत्त्या झाल्याने पोलिसांनी झटपट विचार करून सिद्दिकी हत्त्येचा संबंध बिष्णोई गँगशी जोडला असावा असा दाट संशय आहे.

“Truth is central to justice, and the discovery of truth requires a searching inquiry. In criminal justice, this is the investigation, which is not only the path to truth but also the way to accountability (or exoneration).” हे जर तपासाचे सूत्र मानले तर तर गेल्या एप्रिल महिन्यापासून सुरु असलेले बिष्णोई गँगचे ‘दळण’ पोलिसांना कितपत भूषणावह आहे, ते पोलिसांनीच स्पष्ट करावे व जनतेला विश्वासात घेऊन आश्वस्त करावे इतकीच विनंती. सलमानच्या घराबाहेर केलेल्या गोळीबारानंतर सलमानचीही चौकशी करण्यात आली. मात्र त्या चौकशीतून काय निष्पन्न झाले ते पोलिसांनी अजून सांगितलेले नाही. कारण ज्या संशयित व्यक्तीने गोळीबार केला ती व्यक्ती सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसमध्ये काम करणारी होती व त्याला पनवेलमधूनच अटक करण्यात आली. याआधीच काही महिने अगोदर सलमानची माध्यस्थामार्फत लांरेन्स बिष्णोईशी बातचीत झाल्याचेही वृत्त होते. सलमानला पोलिसांनी या बातचीतीविषयी काही विचारले की नाही, याबाबत  पोलीस काही बोलतच नाहीत!

सिद्दीकींच्या हत्त्येमागे एसआरएचा अँगल असू शकतो. मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली आदी मुंबई महानगर परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जवळजवळ प्रत्येक ठिकाणीच वादाचे झालेले आहेत. हे केवळ वाद नाहीत आता वाद संपून वितंडवाद सुरु होऊन हाणामाऱ्याही होऊ लागल्या आहेत. सर्व राजकीय नेत्यांनी जर याला आळा घातला नाही तर पैशाच्या लोभपायी खुलेआम हत्त्या होतील व काल झालेली दुर्दैवी हत्त्या ही त्यातीलच असावी असा आम्हाला दाट संशय आहे. आपण सर्वांनी पत्राचाळ प्रकरण पाहिले. त्याचवेळी आम्ही लिहिले होते की ही एकच पत्राचाळ नाही तर या महानगराच्या प्रत्येक गल्लीत सुमारे चार-पाच पत्राचाळी आहेतच.

सांताक्रूज वाकोला हा परिसर वांद्रे मतदारसंघाला अगदी लागूनच आहे. येथे 90 फूट रसत्यानजीक एक वस्ती आहे. मोठा भूखंड आहे. यात पक्क्या चाळी आहेत, टपाऱ्या आहेत, झोपड्या तर विखुरलेल्या आहेत, अनेक छोटेमोठे कारखाने आहेत. हा प्रचंड मोठा भूखंड सुमारे 350 कोटी रुपये किंमतीचा असून या मोठया भूखंडावर राजकीय नेते आणि बिल्डरांचा डोळा नसणे हे केवळ अशक्यप्राय असल्यानेच येथे प्रचंड वाद निर्माण झाला आहे. या भूखंडाचे कागदपत्रे कोणा अर्षद या व्यक्तीकडे असून ही कागदपत्रे खोटी असल्याचा मूळ मालकाचा दावा असून त्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. साहजिकच न्यायालयात गेल्यास निर्णय येण्यास कित्येक वर्षे लागतील तेव्हा आपल्यापैकी कुणीच हयात नसेल हे लक्षात आल्यानंतर ‘मांडवली’च्या चर्चा सुरु झाल्या.

मूळ मालक कोणी जब्बार म्हणून आहे. आता अर्शद नावाच्या कुणा दुसऱ्याच व्यक्तीने हा भूखंड माझाच असल्याचा दावा ठोकला आहे. दरम्यान न्यायालयाने या वादासंदर्भात पोलिसांना चौकशी करण्यास सांगितले असल्याचे कळते. आता वाकोला येथील 90 फूट रस्त्यालगतचा सुमारे दीड एकरचा भूखंड म्हणजे हलवाच जणू, सोन्याची अंडी देणारी कोंबडीच जणू!! आता ही कोंबडी ताब्यात घेण्यासाठी हाणामारी होणारच आणि पोलिसांना अमर्याद अधिकार प्राप्त झाल्याने ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे पोलीस हे सध्या चलनात असणारे ‘नाणे’ असल्यानेच बिचाऱ्या बाबांना जीव गमवावा लागला. शिवाय एकेकाळी गँगशी संबंध असल्याने सर्व संबंधितानी त्याचा गैरफायदाच घेतला.

असो. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी हत्त्येचा तपास निडर व कार्यक्षम पोलीस अधिकारी दया नायक यांच्याकडे सोपवला असून लवकरच या प्रकरणाचा आपण छडा लावू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कालच पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हा अनव्हेषण शाखेकडें सुपूर्द करत असल्याचे जाहीर केले होते. पाहूया.. अखेरीस या हत्त्येमागचे खरे कारण कधी बाहेर येते ते..

छायाचित्रः वसंत प्रभू व छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

प्रचारसभा की बाराखडीतल्या प्रत्येक अक्षरावर आधारीत अपशब्दांची मालिका?

येत्या बुधवारी आपल्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होऊ घातले आहे.अवघ्या चार-पाच दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांवर काय लिहिणार हा खरं तर यक्षप्रश्न आहे. सुमारे दहा-बारा प्रमुख राजकीय पक्ष गेले तीन-चार महिने राज्य घुसळून काढत आहेत. प्रत्येकाचे जाहीरनामे वेगळे, वचननामे वेगळे....

बाबा सिद्दीकी हत्त्या प्रकरणात पोलिसांचे घूमजाव?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येस एक महिना पूर्ण होत असताना पोलिसांनी अचानक घुमजाव केल्याचे दिसतंय! कालच पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, "सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबारप्रकरणी पकडलेल्या संशयिताच्या...

बाबा सिद्दीकींच्या हत्त्येप्रकरणी पोलीस अजूनही शक्यतेवरच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येला आज १५ दिवस पूर्ण होत असतानाच पोलीस मात्र अद्यापी विविध शक्यतांचीच पडताळणी करत असल्याचे दिसत आहे. वांद्रे खेरवाडी येथे बाबांची हत्त्या झाल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवसापासून पोलीस सर्वत्र 'सुपारी'चा अँगल सांगत आहेत...
Skip to content