तो अर्धा मिनीट आणि त्या दोघा परस्परविरोधी उमेदवारांची भेट. काय ठरले त्यात? अशा साऱ्या प्रश्नांनी काल तेथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या मनात कोंडी केली. शिवसेनेचे रविंद्र वायकर आणि लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून पराभूत झालेले अमोल कीर्तिकर यांची ही भेट शिवसैनिकांच्या मनात निश्चितच अनेक प्रश्न उपस्थित करून गेली.
गणेशोत्सवानिमित्त रविवारी शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर त्यांच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या विविध गणेशोत्सव मंडळांच्या उत्सवांना भेट देत होते. अशाच भेटीच्या कार्यक्रमात रविवारी रात्री वायकर गोरेगाव नागरी निवारा प्लॉट क्र. १-२, तपोवन सोसायटीच्या गणपतीच्या भेटीला गेले. तेथेच लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून अवघ्या ४८ मतांनी पराभूत झालेले शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आणि शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर दर्शनासाठी आले होते.
अमोल यांना पाहताच वायकर त्यांना एका बाजूला घेऊन गेले. तेथे वायकर त्यांना म्हणाले उगाच तुम्ही माझ्याविरूद्ध निवडणूक लढवली. खरंतर मी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याआधी तुमच्याचबरोबर होतो आणि तुम्हाला येथून उमेदवारी द्यावी अशी माझीच मागणी होती. जोगेश्वरीच्या मंदिरातही मी तुमच्या उमेदवारीची घोषणा केली होती. जाऊदे. झाले ते झाले. यापुढे कधीही काही विषय असेल तर निःसंकोच भेटा. आता विधानसभा निवडणुका येताहेत. उभे राहिल्यास निवडून याल. जेमतेम अर्धा मिनिट वायकर बोलत होते आणि अमोल कीर्तिकर ऐकत होते. नंतर दोघेही आपापल्या दिशेने निघून गेले, असे तेथे उपस्थित असलेल्या एका शिवसैनिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
यासंदर्भात खासदार वायकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. कीर्तिकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमची काही सेकंदांसाठी भेट झाली. त्यात दोघांनी एकमेकांची खुशाली विचारली. इतर काही बोलणे झाले नसल्याचे सांगितले.