आपले अपयश लपवताना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने केलेल्या खेळीत काँग्रेस पूर्णतः फसल्याचे चित्र दिसत असून येत्या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांसमोर पुरते नमते घ्यावे लागण्याची शक्यता आहे.
राज्य विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात महायुतीचे नऊ तर महाविकास आघााडीचे तीन उमेदवार होते. महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत मैदानात होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे निवडणूक लढत होते. शिवसेनेकडून माजी खासदार भावना गवळी तसेच कृपाल तुमाने यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील निवडणुकीच्या आखाड्यात होते. त्यामुळे दोन्ही बाजूंपैकी कोणीतरी एक उमेदवार पडणार हे निश्चित होते.
शेकापचे जयंत पाटील गेल्या अनेक वर्षांपासून विधान परिषदेचे सदस्य होते. २००२ ते २०१२ आणि नंतर २०१८पासून आतापर्यंत ते विधानसभेतल्या सदस्यांकरवी विधान परिषदेवर निवडून जायचे. त्यांचा पक्ष शेकाप (शेतकरी कामगार पक्ष). या पक्षाचे विधानसभेतले संख्याबळ नेहमी २-४ आमदारांचे असायचे. पण तरीही ते २३/२४ मतांचा कोटा घेऊन विजयी व्हायचे. मते घेण्याची, आपल्याकडे मते वळवण्याची किमया त्यांना ज्ञात होती. यावेळीही तशीच किमया ते करतील, अशी अपेक्षा होती. त्यातच शरद पवारांच्या पक्षाने त्यांना पुरस्कृत केले होते. लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर शरद पवार समर्थकांचा हुरूपही वाढलेलाच. त्यामुळे यावेळीही जयंत पाटील हमखास निवडून येतील असे महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत होते.

काँग्रेसकडे तर निवडून येण्यासाठी असलेल्या कोट्यापेक्षा कितीतरी मते सरप्लस होती. त्यामुळे त्यांना त्यांचा एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांना सहज निवडून आणणे शक्य होते. महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार होते ते ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर. नार्वेकर गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव. नंतर ते त्यांच्या पक्षाचे सचिवही झाले. शिवसेनेच्या अनेक आमदारांचा त्यांचा थेट आणि चांगला संपर्क आहे. शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही त्यांचा चांगला स्नेह आहे. अनेकदा नार्वेकर ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत जाणार असल्याच्या वावड्याही उडाल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेतली मते त्यांना मिळतील, असा विश्वास व्यक्त होत होता.
महायुतीमध्ये भाजपाचे १०३, शिवसेनेचे ४० आणि राष्ट्रवादीचे ४० आमदार आहेत. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १, बहुजन विकास आघाडीचे २, प्रहार जनशक्ती, जनसुराज्य, अपक्ष अशा काही सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे महायुतीकडे २०३ सदस्यांचे बळ होते. महाविकास आघाडीत काँग्रेसचे ३७, शिवसेना ठाकरे गटाचे १६, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १२, समाजवादी पक्षाचे २, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), शेतकरी कामगार पक्ष, अपक्ष अशा एकत्रित ६९ आमदारांचा सहभाग होता. निवडणुकीत २८८ सदस्यांऐवजी २७४ सदस्यच सध्या विधानसभेत आहेत. त्यामुळे विधान परिषदेतल्या या निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची २३ मते मिळण्याचा कोटा ठरला होता.
हा कोटा आणि उमेदवारांची संख्या लक्षात घेता भाजपा, शिवसेना तसेच राष्ट्रवादी, प्रत्येकाला अतिरिक्त मतांची गरज होती. पण, प्रत्यक्षात भाजपाच्या योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके आणि अमित गोरखे यांना २३ऐवजी २६ म्हणजे तीन मते अतिरिक्त पडली. सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या पसंतीपर्यंतची वाट पाहवी लागली. दुसऱ्या पसंतीनंतर त्यांना २३ मते मिळाली. शिवसेना तसेच राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांवरच विजयी झाले. शिवसेनेच्या भावना गवळी यांना २४ तर कृपाल तुमाने यांना २५ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना २३ तर शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळाली.

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव पहिल्या फेरीत विजयी झाल्या. त्यांना २५ मते मिळाली तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर दुसऱ्या पसंतीपर्यंत झगडावे लागले. त्यांना दुसऱ्या पसंतीत २३ मतांचा कोटा गाठता आला. शेकापचे जयंत पाटील यांना १२ मते मिळाली तीही दुसऱ्या पसंतीच्या मोजणीनंतर.. आणि ते पराभूत झाल्याचे जाहीर करण्यात आले.
मतांची ही आकडेवारी पाहिली तर सत्ताधारी महायुतीतले ९पैकी ८ उमेदवार तर पहिल्याच पसंतीच्या मतांनी विजयी झाले. एका उमेदवाराला दुसऱ्या पसंतीपर्यंची वाट पाहवी लागली. याऊलट महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांपैकी दोघांना दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून राहवे लागले. त्यातही एक म्हणजे नार्वेकर विजयी झाले तर पाटील पराभूत झाले. काँग्रेसकडे स्वतःचे ३७ आमदार असतानाही त्यांच्या उमेदवाराला २५ मते मिळाली. उरलेली १२ मते थेट ठाकरेंच्या उमेदवाराला गेली असती तर नार्वेकर पहिल्या पसंतीच्या मतांवरच निवडून आले असते.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत फक्त काँग्रेसचीच मते फुटली नाहीत तर ठाकरेंच्या पक्षाकडून शिवसेनेच्या उमेदवारांना मतांची बेगमी झाली तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजितदादांच्या उमेदवारांना मते मिळाली. गेम असा झाला. पण, काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर तसेच हिरामण खोसकर भाजपात अलीकडेच दाखल झालेले खासदार अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात. त्याचप्रमाणे आमदार झिशान सिद्दीकी यांचे वडिल बाबा सिद्दीकी सध्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे या आमदारांकडून महायुतीला मतदान केले जाईल, अशी चर्चा माध्यमांतून होत होती. तोच धागा पकडून ठाकरेंच्या शिवसेनेने तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपले हात वर केले. काँग्रेसची मते फुटल्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार पडला अशी आवई त्यांनी उठवली.

काँग्रेसची मते फुटलीच होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही या फाटाफुटीमुळे काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पडले होते. हा अनुभव गाठिशी असल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षादेश धुडकावणाऱ्या आमदारांवर कारवाईचा बडगा उभारणार असल्याचे जाहीर केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेच्या पाच आमदारांविरूद्ध कारवाई करण्याची शिफारस दिल्लीतल्या नेत्यांकडे पाठवल्याचे जाहीर केले. काँग्रेसच्या नेत्यांनीच ही भूमिका घेतल्यामुळे ठाकरे तसेच पवार गटाचे फावले. त्यांचे पक्ष नामानिराळे राहिले.
आज आपले उमेदवार निवडून आणून भाजपात दोन वर्षानंतर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय करिष्मा पाहयला मिळाला. भाजपाचे तरूण चेहरे विधान परिषदेत दिसणार आहेत. ओबीसी चेहरा पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन झाले. अमित गोरखेंच्या रूपाने मातंग समाजाच्या तरूण चेहऱ्याला प्रतिनिधीत्व मिळाले. योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला संधी देण्यात आली. सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीतला कार्यकर्ता पुन्हा आमदार झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या दोन माजी खासदारांचे राजकीय पुनर्वसन केले. अजितदादांनीही त्यांच्या निष्ठावान समर्थकांना न्याय दिला. त्याचवेळी ठाकरे-पवार गटाने जयंत पाटलांच्या पराभवाची घंटा काँग्रसच्या गळ्यात बांधल्याने आज जो उठतो तो ती वाजवत राहिला आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपांवर नक्कीच होईल. ठाकरे-पवार देतील तितक्या जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागेल हे मात्र नक्की!


Barobar aahe