Homeकल्चर +त्यागराज खाडिलकर यांना...

त्यागराज खाडिलकर यांना अरुण पौडवाल पुरस्कार प्रदान

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” नुकताच प्रसिद्ध गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान करण्यात आला.

कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे हा कार्यक्रम साजरा होत आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते आणि कविता पौडवाल-तुळपुळे व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत, त्यांच्या मुंबईतल्या खार येथील निवास्थानी खाडिलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५१ हजार रोख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या गौरव सन्मानाची संकल्पना विशद करताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, अरुणजी स्वतः एक अतिशय उच्चकोटीचे म्युझिशिअन-संगीतकार होते. त्यामुळे कलाकारांचा योग्य तो सन्मान व्हायला पाहिजे. बहुतेकवेळा त्यांचे फॅन्स काही सत्कार सोहळे करीत असतात. पण आर्टिस्टने एका आर्टिस्टचा सन्मान करणे याला जास्त महत्त्व आहे. आजचा हा २७वा सोहळा आहे. याच्या आधी ज्या-ज्या कलाकारांनी अरुणजींसोबत काम केले आहे, ज्यांना त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचा स्वभाव माहित आहे अशा कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी त्यागराज यांची निवड करण्यामागे विशेष कारण आहे. काही महिन्यांपूर्वी मी त्यांच्या एका कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिव्यांग मुलांना घेऊन एक अल्बम केला होता. अशा मुलांसोबत केलेला हा जगातील एकमेव असा सुंदर अल्बम आहे, असं मला वाटतंय. इतकं सुंदर संगीत आणि संयोजन करून त्यांनी पूर्ण न्याय दिला आहे. दुसऱ्या आर्टिस्टला पुढे आणावं ही गोष्ट, ही कल्पना फार महत्त्वाची आहे. त्यांच्यातील ही गोष्ट मनाला भिडली आणि म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना त्यागराज खाडिलकर म्हणाले की, माझ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे. गेल्या २६ वर्षांतील पुरस्कार्थींची यादी पाहिल्यावर खरंतर मी थरारून गेलो. अरुणजींच्या नावाचा हा पुरस्कार मिळविणाऱ्यांच्या या यादीमध्ये माझीही नोंद झाली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अरुणजींच्या संगीताचे आणि संगीतसंयोजनाचे अनेक संस्कार माझ्यावर झाले आहेत. माझ्या गाण्यांतून ते आपल्याला पदोपदी जाणवतातसुद्धा. या प्रतिभावान संगीतकाराची गाणी आजही तितक्याच लोकप्रियतेने गायली जातात. त्यांच्या नावाचा पुरस्कार लाभावा आणि तोही साक्षात पद्मश्री अनुराधाताई यांच्या हस्ते.. ही माझ्यासाठी विशेष भाग्याची आणि प्रेरणादाई गोष्ट आहे.

हा सोहळा अनुराधा पौडवाल यांच्या निवास्थानीस्थित दक्षिणेश्वरी काली माता मंदिरात संपन्न झाला. याच वेळी ‘स्वरकुल ट्रस्ट’तर्फे सादर झालेल्या “तिमीरातुनी तेजाकडे” या भारतातील पहिल्या दिव्यांग कलाकारांनी गायलेल्या अल्बममधील अतुल कसबे आणि विजयालक्ष्मी यादव या दोन दिव्यांग गायकांनादेखील अनुराधाजींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या अंध गायकांनी गायलेल्या महाराष्ट्रातील नवोदित गीतकरांच्या त्यागराजजींनी स्वरबद्ध केलेल्या रचनांना उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद दिला.

याप्रसंगी त्यागराजजींनी दिव्यांग गायकांच्या हिंदी अल्बमची,तसेच अनुराधा पौडवाल यांच्यासोबत ‘भजनगंगा’ या हिंदी कार्यक्रमाची योजना जाहीर केली. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन अरुण पौडवाल यांचे निस्सीःम चाहते आणि जाणकार संगीतदर्दी प्रसिद्ध गायक चंद्रशेखर महामुनी यांनी केले.

Continue reading

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९...

बोटाच्या हलक्याशा हालचालीने झाले उपचार व चालायला लागला रुग्ण!

बीड जिल्ह्यातील राजीव वरवडे यांच्यासाठी एका भीषण अपघातानंतर जीवन जणू थांबलं होतं. मानेच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू झाला होता. मात्र, मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे करण्यात आलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या स्पाइन सर्जरीमुळे त्यांना नवजीवन मिळालं असून,...

ठाण्याच्या श्री मावळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १४ एप्रिलपासून

ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे १०१व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७३वी राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा मंगळवार, १४-०४-२०२६ ते शनिवार, १८-०४-२०२६ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत एकूण रू. ३,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत....
Skip to content