Sunday, September 8, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटभारत व मंगोलियातले...

भारत व मंगोलियातले संरक्षणविषयक संबंध होणार आणखी सुदृढ

भारत आणि मंगोलियातले संरक्षणविषयक संबंध अधिक सुदृढ करण्याच्या उद्येश्याने या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांच्या संयुक्त कार्यकारी गटाची दोन दिवसांची 12वी बैठक काल मंगोलियाची राजधानी उलानबातर इथे समाप्त झाली. भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयाचे स्टेट सेक्रेटरी ब्रिगेडियर जनरल गानखुयाग दावगदोर्ज या दोघांनी या बैठकीचे सहअध्यक्षस्थान भुषवले. भारताचे मंगोलियातील राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे हेदेखील या बैठकीला उपस्थित होते.

संयुक्त कार्यकारी गटाच्या या बैठकीत दोन्ही देशांनी परस्परांमध्ये सध्या सुरू असलेल्या संरक्षण क्षेत्रविषयक सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांच्या प्रमुख प्रतिनिधींनी विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि या क्षेत्रातील सहकार्य विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपाययोजनाही निश्चित करून त्या दिशेने कार्यवाही सुरु करण्यासाठीच्या मार्गांवर चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी सध्याच्या भूराजकीय परिस्थितीबद्दलच्या परस्परांची मते जाणून घेतली.

भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद यांनी भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्राची क्षमता यावेळी अधोरेखित केली. मंगोलियाच्या सशस्त्र दलांसोबतची भागिदारी  फलदायी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मंगोलियानेही भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्राच्या क्षमतेप्रती विश्वास व्यक्त केला. दोन्ही देशांच्या या प्रमुख प्रतिनिधींनी परस्परांमध्ये दृढ होत असलेल्या संबंधांची ग्वाहीदेखील यावेळी दिली.

भारताच्या  संरक्षण मंत्रालयाचे  सहसचिव अमिताभ प्रसाद आणि भारताचे मंगोलियातील राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे यांनी मंगोलियाचे उपसंरक्षणमंत्री बी. बयारमगनई यांचीही भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या शिष्टमंडळाने उलानबातर इथल्या प्रशिक्षण संस्थेला भेट दिली आणि तिथे राबवल्या जात असलेल्या उपक्रमांचाही आढावा घेतला.

मंगोलियासोबत भारताचे जुने ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नागरी संबंध आहेत. दोन्ही देश एकमेकांना परस्परांचे ‘आध्यात्मिक शेजारी’ मानतात. सध्याच्या आधुनिक काळात लोकशाही, स्वातंत्र्य आणि बाजारआधारित अर्थव्यवस्था यांसारख्या मूल्यांनी दोन्ही देशांना परस्परांच्या अधिक जवळ आणले आहे.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content