Sunday, September 8, 2024
Homeहेल्थ इज वेल्थ४६% लोकांना माहितच...

४६% लोकांना माहितच नाही की त्यांना उच्च रक्तदाब आहे!

आज जागतिक उच्च रक्तदाब दिन. आजच्या जागतिक रक्तदाब दिनासाठी यंदाचे घोषवाक्य आहे ‘आपला रक्तदाब मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घायुष्य जगा’! जागतिक स्तरावर उच्च रक्तदाब असलेल्यांपैकी अंदाजे ४६% लोकांना हे माहितच नसते की त्यांना उच्च रक्तदाब आहे. उच्च रक्तदाब असलेल्या सर्व प्रौढांपैकी अर्ध्यापेक्षा कमी लोकांचे निदान होते आणि त्यावर उपचार केले जातात. उच्च रक्तदाब असलेल्या पाचपैकी केवळ एका प्रौढ व्यक्तीचा रक्तदाब नियंत्रणात असतो. त्यामुळे ८०% लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अनियमित हृदयठोके आणि मूत्रपिंडाचे नुकसान यासह गुंतागुंत होण्याचा धोका असतो.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मधुमेह आणि उच्च रक्तदाबविषयक आरोग्यचाचणी करून उपचार घेण्यासाठी मुंबईकरांनी पालिकेचे दवाखाने / हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे संपर्क साधावा, असे आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि मुंबई महापालिकेमार्फत मुंबईमध्ये २०२१मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ ते ६९ वर्षे या वयोगटातील सुमारे ३४ टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचे नोंदले गेले आहे. त्यापैकी ७२ टक्के नागरिक सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले. उपचार घेणाऱ्या नागरिकांपैकी फक्त ४०% नागरिकांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याचा आढळून आले. सरासरी दैनंदिन मिठाचे सेवन ८.६ ग्रॅम इतके असल्याचे आढळून आले जे जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीपेक्षा जास्त आहे.

उच्च रक्तदाब रूग्णांचे वेळीच निदान होऊन त्यांना प्रभावी उपचार मिळावेत यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणे, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीला चालना देणे, नवीन उपचारपद्धतीचा अवलंब करणे तसेच रुग्णांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

महापालिका दवाखाना व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे प्रत्येक महिन्यात ६० ते ७० हजार नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात येते. सुमारे १ लाख दहा हजार रुग्ण नियमितपणे उच्चरक्तदाब संदर्भातील उपचार घेत आहेत. तसेच ३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची अधिकाधिक सक्षमरीत्या चाचणी करण्याच्या दृष्टीने पालिकेने आपल्या २६ रुग्णालयांमध्ये ऑगस्ट २०२२पासून मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ऑगस्ट २०२२पासून आतापर्यंत ३ लाख ५० हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी ९.७% व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब संशयित आढळून आले. या सर्व व्यक्तींना संपर्क साधून, पाठपुरावा करून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

पाणी

जानेवारी २०२३पासून पालिकेच्या वतीने सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्तींमध्ये, आरोग्य स्वयंसेविका / आशा सेविका यांच्यामार्फत ३० वर्षांवरील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत अंदाजे १८लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १७ हजार व्यक्तीना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले आहे व उपचाराधीन आहेत. तसेच उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना आहारविषयक सल्ला देण्याची / समुपदेशन सेवा पालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २१ हजार उच्च रक्तदाब रुग्णांना आहार आणि दैनंदिन जीवनशैलीसंदर्भातील समुपदेशन करण्यात आले आहे.

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी आरोग्यविषयक गुंतागुंत टाळण्यासाठी रक्तदाबाची नियमित तपासणी करावी व उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content