Sunday, September 8, 2024
Homeमुंबई स्पेशलमुंबईकरांची काळजी मिटली!...

मुंबईकरांची काळजी मिटली! जुलैअखेरपर्यंत पाणीपुरवठा!!

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गेल्या वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी राज्यशासनाच्या सहकार्याने तसेच आवश्यक त्या नियोजनामुळे मुंबईकरांना ३१ जुलैपर्यंत व्यवस्थित पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही मुंबई महापालिकेने दिली आहे.

राज्य शासनाने यापूर्वीच भातसा व अप्पर वैतरणा जलाशयातून मुंबईकरीता अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे ३१ जुलैपर्यंत पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करु नये. मात्र, सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील आजघडीला उपलब्ध पाणीसाठा व नियोजन यासंदर्भात आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक झाली. अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर मुंबईकरांनी पाण्याची चिंता करू नये, अशी ग्वाही पालिका आयुक्तांनी दिली.

पाणी

मुंबईसाठी अतिरिक्त पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये मिळून आजमितीस २ लाख ३८ हजार ५५२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर गरजेच्या तुलनेत हा साठा १६.४८ टक्के आहे. त्याचप्रमाणे, भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. हा सर्व साठा मिळून प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक ३१ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन प्रशासनाने केले आहे.

मान्सून आगमनाचा अंदाज व पाणीसाठ्याचा सातत्याने आढावा

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे, यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होण्यासाठी सध्या अनुकूल स्थिती आहे. त्याचप्रमाणे देशात यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला आहे. मेअखेरीस हवामान खात्याकडून मान्सूनविषयक अद्ययावत अंदाज वर्तवले जाणार आहेत. एकूणच, हवामान खात्याकडून वेळोवेळी वर्तवले जाणारे पावसाचे अंदाज त्याचप्रमाणे पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन आगामी काळातील धोरण निश्चिती केली जाईल.

पाण्याचा काटकसरीने वापर होणे आवश्यक

पाणीसाठ्याची उपलब्धता पाहता, सध्या मुंबईत कोणतीही पाणीकपात लागू केलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करण्याचे कारण नाही. असे असले तरी, प्रशासनाने केलेल्या नियोजनाला मुंबईकरांचेदेखील सहकार्य लाभले पाहिजे. वैयक्तिक स्तरावर सर्व नागरिकांनी आपल्या सवयींमध्ये त्याचप्रमाणे मुंबईतील सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनीदेखील आपल्या कार्यपद्धतीमध्ये असे बदल स्वीकारावेत की ज्यातून पाण्याची बचत होईल, पाण्याचा अपव्यय रोखता येईल. पाण्याचा सर्वांनी काटकसरीने वापर करावा, पाणी बचतीच्या उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी

असा टाळा पाण्याचा अपव्यय

आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेऊन प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करावी. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे. घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेऊन कामे उरकावीत. वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेऊन ओल्या कापडाने वाहने पुसणे सहज शक्य असते. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुऊन काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होऊ शकतो.

नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत करणाऱ्या किंवा तुषार स्वरुपात पाणी प्रवाहित करणाऱ्या तोटी (नोझल) बाजारात सहज उपलब्ध असतात. नळांना अशा प्रकारची तोटी लावून पाण्याची तब्बल दोन तृतीयांश बचत करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी त्याचा वापर करावा. उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन अकारण पाण्याने भरुन ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही.

सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी, यातून पाण्याची बचतदेखील होते व पाणी दूषित होत नाही. छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार (ओव्हरफ्लो) नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्या सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनीदेखील पाण्याचा अपव्यय टाळून बचत करता येईल, अशा कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content