Friday, November 22, 2024
Homeमाय व्हॉईसफिल्मसिटीतल्या संघटनांत गुरफटली...

फिल्मसिटीतल्या संघटनांत गुरफटली राजू सापतेंची आत्महत्त्या?

“दररोज स्वतःला धीर देत जगणे; कठीण होत आहे

किती आवरावे आपणच आपणाला; कठीण होत आहे

भोकांड पसरणाऱ्या मनास थोपटीत झोपवून घेतो

भुसा भरलेले भोत दिसूनही; थांबणे कठीण आहे

तडजोडीत जगावे. जगतो: दररोज कठीण होत आहे”

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या 60/70च्या दशकातील एका कवितेच्या ओळी आजही इतक्या वर्षानंतर ताज्या वाटाव्यात असे कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्त्येचे प्रकरण आहे.

दोन किंवा अधिक कामगार संघटनांतील मतभेद, हाणामारी अगदी हत्त्याही मी पाहिलेल्या आहेत. या पाठीमागे संघटनांमधील वर्चस्वाचा भाग सोडला तरी मूळ कारण पैसे वाढवून मिळणे हेच असायचे. या प्रकरणी तर सर्व उलटेच घडले. कामगारांना सर्व पैसे वेळेवर मिळत होते. त्यांचे संसारही सुरळीत चालू होते. सर्व काही सामंजस्याने चांगल्या वातावरणात सुरू होते. परंतु या चांगल्या प्रकाराला क्रूरकर्म्याची नजर लागली.

कारण तर इरसालच होते. आम्हाला डावलून खरे तर आमची खंडणी वसूल करण्याची सोपी संधी तुम्ही का घालवलीत? तुमच्यासारखे इतर सर्वजण वागू लागले तर बापू आम्हाला आमचे खंडणीचे दुकानच बंद करावे लागेल. यह ना इंसाफी है.. ही किंवा अशाप्रकारच्या वाक्यांनी बेजार करून जगणे मुश्किल करण्यापेक्षा आपण मेलेलेच बरे.. असा विचार जर राजू यांनी केला असेल तर त्यात चूक काय? कामगारांना त्यांचे पैसे आमच्यामार्फतच दिले गेले पाहिजेत.. या अहंमुळेच राजू यांचा बळी फिल्म सिटीतील कामगार माफियांनीच घेतला आहे असा आरोप केला तर त्यात वावगे काय?

काम करणारे कामगार त्याचे पैसे देणारा कलादिग्दर्शक मग हे पैसे परस्पर लाटणारे दलाल कोणाचे हस्तक? कामगार संघटनांचे काम मी जवळून पाहिलेले आहे. कुठलीही कामगार संघटना कामगारांच्या पगाराचे वाटप करत नाही. त्यांचे लक्ष वार्षिक वर्गणी व बोनस वा सानुग्रह अनुदानाचे वाटप झाल्यानंतर मिळणाऱ्या मानधनाकडे असते. या मानधनाची रक्कमही कामगारांच्या सभेत ठरते किंवा कामगारांची कार्यकारी समिती ठरवते. चौकशी करता असे समजले की, कामगारांची संख्या मोठी असल्याने सर्व प्रॉडक्शन संस्थांनी चांगल्या हेतूने पगार वाटपाचे काम संघटनेकडे दिले.

हेतूविषयी शंका नाही. परंतु पैशांची भली मोठी रक्कम पाहिल्यावर भल्याभल्यांची नियती फिरली आहे. येथे तर कामगार संघटना होती. काहींच्या हातात वाजवीपेक्षा जास्त पैसे जात असल्याचे पाहून काही स्वयंघोषित नेत्यांची नियत फिरली. त्यांनी पगारात मामुली कट मारण्यास सुरुवात केली. त्याला विकासनिधी असे गोंडस नाव दिले. पुढेपुढे हा विकासनिधी खंडणीत कसा रुपांतरीत झाला हे तेथील कामगारांनाही कळले नाही. दुसरी एक संतापजनक अट म्हणजे कामगारांना संघटनेचे सदस्य होण्यासाठी तब्बल 25 हजार रुपयांपासून पुढे कितीही रक्कम देऊन सदस्य होता येते. शिवाय खंडणी देण्यास विरोध करणाऱ्यांना फिल्मसिटीत कामच करू दिले जात नाही. त्याचे कार्ड रद्द केले जाते. त्यातूनही कोणाला दया आली आणि अशा व्यक्तीला काम दिले तर संघटना काम बंद करून सर्वाना जेरीस आणतात.

या कामगार संघटनेचा इतिहास तसा गमतीशीर व अखेर संताप आणणारा आहे. 2013पर्यंत या फिल्म स्टुडिओ सेटिंग अँड अलाईड मझदूर संघटनेचे काम प्रख्यात अभिनेते मिथुन चक्रवर्ती पाहात होते. मतभेद व आरोप प्रत्यारोप झाल्याने मिथुनदा यांनी संघटनेला रामराम ठोकला. त्यानंतर गंगेश्वर लाल श्रीवास्तव याच्या हातात संघटनेची सूत्रे अलगद आली. या गंगेश्वरने मौर्य व अशोक दुबे नामक आपल्या पंटर्सना हाताशी धरून कामगार तसेच निर्मिती संस्थांना दमदाटी व गुंडगिरी करण्यास सुरुवात केली. कामगारांच्या पगाराचे चेक्स संस्थांकडून घेऊन कामगारांना तीन-तीन महिने तर कधी चार-चार महिने पगार वाटपच केलेले नव्हते, असे समजले.

दरम्यान, या गंगेश्वर व मौर्यला पैसे फिरवण्याची लत लागली. कामगारांच्या पगारापोटी येणारे कोट्यवधी रुपयांचे चेक्स पाहून त्यांचे डोळेच फिरले. फाटक्या कामगारांना इतके पैसे कशाला? अशी विचारणा करण्यापर्यंत त्यांचा निर्लज्जपणा पोहोचला होता. याच वेळी काहींनी संघटना बदलण्याचा विचार केला. काहीजण राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना भेटले. कामगारांची दुःखे त्यांच्या कानावर घातली. राष्ट्रवादीचे नेतेही इतके ग्रेट की मुंबईतील कोणताही नेता त्यांना न देता पुण्याच्या कुठल्यातरी एका राजांना त्यांनी घोड्यावर बसवले आणि त्याला मुंबईकडे कूच करण्यास सांगितले. बिच्चारे राजे! राजे असले तरी ते मुंबईला आणि त्या संघटनेत असलेल्या लोच्याला बावचळलेच. त्यांच्या काही डोक्यातच जाईना झाले.

राजे यांनी मग आपल्या एका शिवा शेट्टी नामक मांडलिकाला संघटनेत बसवला. हा शिवा शेट्टी माझ्या माहितीप्रमाणे वसई-विरारकडला असावा. त्यात बरेचसे ‘विरार’चे पाणी होते, असे कळते. संघटनेत येताच त्याचे बाहू फुरफुरले. त्यांनी आपले डोलेशोले दाखवायला सुरूवात केली. झाले. गंगेश्वर आणि त्याच्या गँगला वाटले आपण अडचणीत येणार. त्यांनी एक अफलातून ट्रॅप लावला. शिवाने एक मीटिंग लावली होती. एका हॉटेलमध्ये.. यात मौर्यनी आपला एक माणूस घुसवला. शिवा आणि सहकाऱ्यांच्या लक्षात काही हे आले नाही. शिवा असा ग्रेट की या मीटिंगमध्ये गंगेश्वर आणि त्याच्या टीमला धक्क्याला लावूच असे काहीबाही बोलला. गंगेश्वरला हेच हवे होते. त्या संपूर्ण भाषणाची क्लिप त्याने दिंडोशी पोलिसांना दाखवली. झाले.. शिवाचा अवतार काही महिन्यांतच संपला.

मला दिंडोशी पोलिसांचे कौतुक वाटते. एका गुंडाने दुसऱ्या गुंडाची क्लिप दाखवली आणि पोलीस समाधान पावत कारवाईपर्यंत पोहोचले. अशीच एखादी क्लिप सामान्य माणसाने दिली असती तर आधी त्यांनी धुडकावून लावले असते. क्लिप पाहण्याचेच आमचे काम आहे का? किती कामे पडली आहेत आमची.. असे सांगून तुम्हाला, आम्हाला वाटेला लावले असते. हा फोटो कशावरून जोडलेला नसेल? असे अनेक प्रश्न विचारले असते. मात्र आधीच सेटिंग असल्याने प्रश्न वगैरे विचारण्याच्या भानगडीत न पडता बेटकुल्या शिवा अजूनही आत खितपत पडल्याचे समजते.

दिंडोशी पोलिसांनी अगदी 2013पासूनच फिल्मसिटीचे हे प्रकरण मुळीच गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. छायाचित्रात एक दुखावलेला पंजा दिसत आहे. गद्दारी केली, या संशयावरून गंगेश्वरच्या समर्थकांनी एका कामगारांच्या हातावर ड्रिल फिरवले. हाही गुन्हा दिंडोशीला गंभीर वाटला नाही. इतकेच नव्हे तर 2015/16च्या सुमारास राजू शिंदे या शिवसैनिकाची हत्त्या केली गेली होती. ही हत्त्याही युनियनच्या वादातून झाली होती. याप्रकरणी आरोपी पकडले गेले. परंतु चौकशी नीट झालेली नाही.

खरेतर फिल्मसिटीत कामगारांमध्ये असंतोष आहे याची साधी भनकही पोलिसांना लागू नये हे गुप्त वार्ता यंत्रणेचे अपयशच आहे. राजू सापते यांच्या आत्महत्त्येनंतर अनेक प्रमुख कलाकारांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या. नंतर आता कुठे दिंडोशी पोलीसठाणे हलू लागले आहे. प्रख्यात कलाकार आदेश बांदेकर यांच्या पुढाकाराने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी तर भाजपा आमदार राम कदम यांच्यावर आरोप केला आहे. कदम यांनी आरोप फेटाळले असले तरी बरोबरच्या छायाचित्रात त्यांची हजेरी लावली जात असल्याचे दिसत आहे.

राम कदम यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा खर्च गंगेश्वर करतो असे फिल्मसिटी परिसरात उघड बोलले जात आहे. या गंगेश्वर व मौर्यबरोबर अशोक दुबे नामक व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे. हा अशोक दुबे उत्तर प्रदेशातील चकमकीत मारला गेलेल्या विकास दुबे याचा नात्यातील असल्याचे बोलले जात आहे. या त्रिकुटापैकी किमान दोघे तरी वसई-विरारमधील आपल्या बिळात लपून बसल्याचे माहितगार सांगतात. मौर्य हा उत्तरेत पळून गेल्याचे समजते. सध्या सर्वजण नामांकित वकिलांच्या संपर्कात असून अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या प्रयत्नांत आहेत “the thing find about the film industry is that 99% of the people are absolute scum. They are horrible people, they are very nasty killer. But other 1% are really the greatest, wonderful in the world” हे खोटे ठरवायचे असेल तर पोलिसांनी राजू यांच्या आत्महत्त्येस जबाबदार असणाऱ्यांना लवकर गजाआड करण्याची गरज आहे. पोलिसांशी आम्ही सहकार्य करत आहोत. परंतु त्यांच्या तपासात हयगय दिसली तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा निशांत सकपाळ यांनी दिला आहे. पाहुया!

Continue reading

प्रचारसभा की बाराखडीतल्या प्रत्येक अक्षरावर आधारीत अपशब्दांची मालिका?

येत्या बुधवारी आपल्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होऊ घातले आहे.अवघ्या चार-पाच दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांवर काय लिहिणार हा खरं तर यक्षप्रश्न आहे. सुमारे दहा-बारा प्रमुख राजकीय पक्ष गेले तीन-चार महिने राज्य घुसळून काढत आहेत. प्रत्येकाचे जाहीरनामे वेगळे, वचननामे वेगळे....

बाबा सिद्दीकी हत्त्या प्रकरणात पोलिसांचे घूमजाव?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येस एक महिना पूर्ण होत असताना पोलिसांनी अचानक घुमजाव केल्याचे दिसतंय! कालच पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, "सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबारप्रकरणी पकडलेल्या संशयिताच्या...

बाबा सिद्दीकींच्या हत्त्येप्रकरणी पोलीस अजूनही शक्यतेवरच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येला आज १५ दिवस पूर्ण होत असतानाच पोलीस मात्र अद्यापी विविध शक्यतांचीच पडताळणी करत असल्याचे दिसत आहे. वांद्रे खेरवाडी येथे बाबांची हत्त्या झाल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवसापासून पोलीस सर्वत्र 'सुपारी'चा अँगल सांगत आहेत...
Skip to content