Homeटॉप स्टोरीकोविडच्या पुढच्या लाटांमध्ये...

कोविडच्या पुढच्या लाटांमध्ये बालकांना धोका नाही!

कोविड-19 महामारीच्या संभाव्य आगामी लाटांमध्ये बालकांमध्ये तीव्र आणि गंभीर आजार निर्माण होणार असल्याची माहिती चुकीची आहे. आगामी लाटांमध्ये बालकांवर गंभीर परिणाम होणार असल्याचे सिद्ध करणारी कोणतीही आकडेवारी भारतात किंवा जगातही उपलब्ध नाही, असे स्पष्ट प्रतिपादन दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नुकतेच केले आहे.

भारतात दुसऱ्या लाटेच्या वेळी बाधित होऊन रुग्णालयात दाखल झालेल्या बालकांपैकी 60% ते 70% बालकांना एकतर सहविकार (कोमॉर्बिडिटी) होते किंवा त्यांची रोगप्रतिकारशक्ती क्षीण होती. सुदृढ व आरोग्यसंपन्न बालके सौम्यश्या लक्षणांनंतर रुग्णालयात दाखल करण्याची गरज न भासता बरी झाली, असेही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

कोविड-समुचित वर्तन हीच आगामी लाटा थोपविण्याची गुरुकिल्ली!

कोणत्याही महामारीच्या निरनिराळ्या लाटा का येतात, हेही एम्सच्या संचालकांनी स्पष्ट करून सांगितले. सामान्यतः, श्वसनसंस्थेस बाधित करणाऱ्या विषाणूंमुळे निर्माण होणाऱ्या साथरोगाच्या निरनिराळ्या लाटा येतात. 1918 स्पॅनिश फ्ल्यू, एच 1 एन 1 (स्वाईन) फ्ल्यू ही त्याची काही उदाहरणे होत. 1918 स्पॅनिश फ्ल्यूची दुसरी लाट सर्वात मोठी होती, नि त्यानंतर जरा कमी तीव्रतेची तिसरी लाट येऊन गेली, असे ते म्हणाले.

सार्स-सीओव्ही-2 हा श्वसनसंस्थेशी संबंधित रोग निर्माण करणारा विषाणू आहे, हे आपल्याला माहीतच आहे. सहज बाधित होऊ शकणारी लोकसंख्या असेल तेव्हा अनेक लाटा उद्भवतात. जेव्हा लोकसंख्येचा बहुतांश हिस्सा संसर्गाविरुद्ध प्रतिकारक्षम होतो, तेव्हा विषाणू प्रदेशविशिष्ट होतो व त्याचा प्रादुर्भाव ठराविक ऋतूमध्ये होऊ लागतो- जसे H1N1चा प्रादुर्भाव सामान्यपणे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात होताना दिसतो, असे त्यांनी सांगितले.

विषाणूमध्ये बदल घडून आल्याने लाटा उद्भवू शकतात (उदा-विषाणूचे नवे प्रकार आल्याने). नवीन पिढीचे विषाणू अधिक प्रमाणात संसर्ग पसरवू शकत असल्याने विषाणूजन्य रोगाचा फ़ैलाव वाढण्याची शक्यता बळावते. लाट उद्भवण्याचे एक कारण ‘मानवी वर्तन’ हेही असू शकते, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.

जेव्हा रुग्णसंख्या वाढते, तेव्हा लोकांमध्ये एक प्रकारची भीती असते आणि त्यामुळे मानवी वर्तन बदलते. कोविड-समुचित वर्तनाचे काटेकोर अनुपालन लोक करतात आणि प्रादुर्भावाची साखळी औषधेतर उपायांनी तोडण्यात यश येऊ लागते. परंतु जेव्हा अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू होते- म्हणजे व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात होते, तेव्हा लोकांना असे वाटू लागते की ‘आता फारसा संसर्ग होणार नाही’. असा विचार करण्यामुळे कोविड-समुचित वर्तनाचे योग्य पालन करण्यात लोकांकडून हयगय होण्याची शक्यता उत्पन्न होते. परिणामी, विषाणू पुन्हा डोके वर काढतो, समाजात संसर्ग पसरू लागतो व दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.

आगामी लाटा थांबविण्यासाठी, आपल्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात लसीकरण होईपर्यंत किंवा तिच्यात नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमता विकसित होईपर्यंत आपण कोविड-समुचित वर्तनाचे आग्रहपूर्वक पालन केलेच पाहिजे. जेव्हा पुरेशा प्रमाणात लोकांचे लसीकरण झालेले असेल, किंवा जेव्हा या संसर्गाला थोपविणारी नैसर्गिक रोगप्रतिकारक्षमता आपल्यात आलेली असेल, तेव्हा या लाटा थांबतील. त्यामुळे, कोविड-समुचित वागणुकीचे काटेकोर व शिस्तशीर पालन हाच एकमेव उपाय आहे, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content