कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ, भारतीय सैन्याने माजी सैनिकांची अर्ध मॅरेथॉन ‘ऑनर रन’ काल दिल्लीत आयोजित केली होती. ‘ऑनर रन’ या संकल्पनेंतर्गत भारतीय सैन्य, निवृत्त सैनिक, सर्वसामान्य जनता आणि विशेषत: तरुण यांच्यातील बंध अधिक दृढ करणे हा उद्देश होता.

कार्यक्रमादरम्यान शूरवीरांना आदरांजली वाहताना विविध भागातून ‘ऑनर रन’मध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी आपल्या राष्ट्राची कुवत, क्षमता आणि उर्जा अधोरेखित केली. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी अनेक लष्करी सैनिक, निवृत्त सैनिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘ऑनर रन’ ही मॅरेथॉन चार श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आली होती.

21.1 किमीच्या पहिल्या श्रेणीला ‘कारगिल रन’ असे नाव देण्यात आले. इतर तीन श्रेणींमध्ये 10 किमी धावण्याची ‘टायगर हिल रन’, 5 किमी धावण्याची ‘तोलोलिंग रन’ आणि 3 किमी धावण्याच्या ‘बटालिक रन’ चा समावेश होता. 14,000 हून अधिक सेवारत कर्मचारी, निवृत्त सैनिक, एनसीसी कॅडेट्स, लष्करी जवानांचे कुटुंबिय आणि विविध वयोगटातील नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी विविध श्रेणीतील विजेत्यांना पदके, प्रमाणपत्रे आणि आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित केले. कारगिल युद्धातील भारतीय सैन्याच्या विजयाची माहिती देणार्या भारतीय लष्करातील निवृत्त सैनिकांच्या विभागातर्फे एका प्रदर्शनाचे आयोजन ही यावेळी करण्यात आले होते. या दरम्यान स्पर्धकांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन या विजयाच्या उत्सवात त्यांच्या सहभागाचे कौतुक केले.
