Thursday, December 26, 2024
Homeएनसर्कलडॉ. यशवंत मनोहर...

डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान!

यशवंतराव चव्हाण सेंटर धर्मनिरपेक्ष आणि पक्ष निरपेक्ष पद्धतीने कार्य करते आणि फुले-शाहू-आंबेडकर या दीपस्तंभांना प्रमाण मानते, ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. इथे जमलेल्या सर्व मान्यवरांच्या साक्षीने ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार’ मला प्रदान करण्यात आला, त्याचा मी विनम्रपणे स्वीकार करतो. हा पुरस्कार संविधानातील मूल्यांच्या मनाने लेखन करणाऱ्या नवजागृत आणि धडपड्या प्रतिभांना आणि प्रज्ञांना मी सद्भावपूर्वक अर्पण करतो, अशा भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना केल्या.

यशवंतराव चव्हाण ही एक सभ्य, सुंदर, प्रगल्भ आणि सर्वसमावेशक संस्कृती होती. या सुसंस्कृत, सर्जनशील आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वामुळेच यशवंतराव चव्हाणांचा मला नेहमीच आदर वाटतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ चा राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष तसेच खासदार शरद पवार यांच्या हस्ते स्वीकारला, त्यावेळी ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी कृषी, औद्योगिक, समाज रचना, व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक-सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांपैकी कोणत्याही एका क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस हे पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येते.

अध्यक्षीय भाषणात यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरदचंद्र पवार म्हणाले की, चव्हाण साहेब प्रागतिक विचारांचे होते. विकासाभिमुख योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत कसा पोचेल याची व्यवस्था करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे यशवंतराव चव्हाण. त्यांचा विचार समाजात अखंड रुजेल असा प्रयत्न यशवंतराव चव्हाण सेंटर करत असते. चव्हाण साहेब आणि डॉ. यशवंत मनोहर यांच्या कौटुंबीक परिस्थितीमध्ये काही फरक नव्हता, परंतु त्यांनी परिस्थितीवर मात केली.  यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आम्ही संविधानाच्या रस्त्याने जाऊ इच्छितो. डॉ. मनोहरांची भूमिका या विचारांशी अत्यंत सुसंगत आहे. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला याचा आनंद वाटला.

चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या स्थापनेमागील भूमिका विषद करून चव्हाण सेंटरच्या तीन दशकातील कार्याचा मागोवा घेतला. तसेच सध्या चव्हाण सेंटरच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या समाजाभिमुख योजनांची महिती उपस्थितांना दिली. त्यांनी डॉ. यशवंत मनोहर यांच्या काव्यसंपदेचा गौरव करताना “शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांसाठी आरती गातो”, ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो” या कवितांच्या ओळी सादर केल्या.

चव्हाण सेंटरचे सरचिटणीस हेमंत टकले यांनी डॉ. मनोहर यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले.

यावेळी २०२३ चा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ही जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी हा पुरस्कार विख्यात बालरोगतज्ञ आणि क्लिनिकल सायंटिस्ट डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना जाहीर केला. डॉ. सौम्या क्षयरोग आणि एचआयव्हीवरील संशोधनासाठी प्रसिद्ध असून त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेत मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे.

या कार्यक्रमाध्ये चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी भारताचे माजी सरन्यायाधीश व यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीचे माजी अध्यक्ष मा. न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबई विद्यापीठातून एल.एल.एम.च्या अंतिम परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यास मा. न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड परितोषिक”ने गौरविण्यात येते. यावर्षीचे पारितोषिक डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते अॅड. विजेत शेट्टी यांना प्रदान करण्यात आले.

सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Continue reading

आंतरशालेय जंप रोप स्पर्धेत आशनी, योगिता, झाकीर, स्वयंमला सुवर्ण

मुंबईच्या चेंबूर येथील दि ग्रीन एकर स्कूलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात आशनी काळे (लोरोटो कॉन्व्हेट), योगिता सामंत (के. जे. सोमय्या कॉलेज) आणि मुलांच्या याच गटात झाकीर अन्सारी, स्वयंम कांबळे (दोघेही...

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...
Skip to content