Sunday, September 8, 2024
Homeमाय व्हॉईस... तर टोलनाके...

… तर टोलनाके जाळून टाकू!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टोलच्या मुद्द्यावरून धांदात खोटं बोलत आहेत. टोल हा काही काश्मीरचा विषय नाही. टोल रद्द केले नाहीत तर आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिला. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र, ५३ पथकर नाक्यावरचा टोल ३१ मे २०१५च्या मध्यरात्रीपासूनच बंद झाला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

दोन दिवसानंतर मी टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. फोर व्हिलर, टू व्हिलरला टोल नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्याप्रमाणे आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभे राहतील आणि फोर व्हिलर, टू व्हिलरला कोणत्याही प्रकारचा टोल लावू दिला जाणार नाही. आणि याला जर कुणी विरोध केला तर हे टोलनाके जाळू. पुढे सरकारला काय करायचे ते त्यांनी करावं, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.

टोल

देवेंद्र फडणवीस काल टोलबाबत जे म्हणाले ते खरं आहे का? याला धांदात खोटं असंच म्हणायचं ना? मग हे पैसे जातात कुठे? कुणाकडे जातात? खऱ्या अर्थाने पाहिलं तर टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. याची शहानिशा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. टोलचा सर्व पैसा जातो कुठे? त्याचं होतं काय? त्याच त्याच कंपन्यांना टोल मिळतात कसे? त्यानंतर शहरातील रस्त्यांवर खड्डे पडत असेल तर टोलचा पैसा जातो कुठे? सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे जातात कुठे?, असे सवालही राज ठाकरे यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील टोलमाफीसंदर्भात एक विधान केले होते. त्याचा तपशील आज त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आला. ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पथकर स्थानकांपैकी ११ पथकर स्थानकांवरील व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ५३पैकी १ पथकर स्थानकावरील अशा एकूण १२ पथकर नाक्यांवरील पथकर (टोल) वसुली बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित २७ पथकर स्थानके तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या २६ पथकर स्थानकावरील अशा एकूण ५३ पथकर स्थानकांवरील कार, जीप व एसटी महामंडळाच्या बसेस अशा वाहनांना ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पथकरातून सूट देण्यात आली आहे. यासंदर्भात नुकसानभरपाई देण्याचा निर्णयसुद्धा २०१७मध्ये घेण्यात आला होता आणि त्याचा जीआरसुद्धा ३१ ऑगस्ट २०१७ रोजी जारी करण्यात आला असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content