Homeमुंबई स्पेशलतरण तलावात आढळलेल्या...

तरण तलावात आढळलेल्या मगरीच्या पिल्लामागे स्थानिक?

मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील महापालिका तरण तलावात सापडलेले मगरीचे पिल्लू कोणी सोडले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तलावाच्या जवळ असलेल्या खाजगी वन्यजीव संग्रहालयाविरूद्ध असलेल्या या परिसरातील लोकांचा हा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

काल पहाटे साडेपाचच्या सुमारास दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील ऑलिंपिक आकाराच्या जलतरण तलावात मगरीचे पिल्लू आढळून आले आहे. हे पिल्लू तज्ज्ञांच्या मदतीने पकडण्यात आले‌ असून ते वन खात्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे मगरीचे पिल्लू तरण तलावात कुठून आले, याची चौकशी सुरू करण्यात आली असून आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी भविष्यात घेण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी सांगितले की, रोज पहाटे तरण तलाव सदस्यांसाठी सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे तरण तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. यानुसार काल पहाटे साडेपाचच्या सुमारास तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या तरण तलावात (Olympic size Racing Swimming Pool) मगरीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने तत्काळ कार्यवाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले. हे पिल्लू नंतर वन खात्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही घटना घडल्यानंतर हे मगरीचे पिल्लू तलावात कसे आले हा प्रश्न मुंबईकरांना भेडसावत होता. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रथम या खाजगी वन्यजीव संग्रहालयाकडे सर्वांचे लक्ष वेधले. येथून हे पिल्लू आले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर येथील अनेक रहिवाशांनी तशी शक्यता व्यक्त केली. हे संग्रहालय खाजगी असले तरी ते अधिकृत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सरसकट कारवाई करता येणे अशक्य आहे. हे पिल्लू आपले असल्याचा व्यक्त करण्यात आलेला संशय संग्रहालयाच्या चालकांनी फेटाळून लावला आहे. परंतु, हे संग्रहालयातले पिल्लू असले तरी ते नेमके या तरण तलावात गेले कसे हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या परिसरातल्या लोकांचा या संग्रहालयाला विरोध आहे. नजीकच्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. इतरही निवडणुका डोळ्यासमोर आहेत. अशावेळी या परिसरातली मते सुनिश्चित करण्यासाठी आता अनेक राजकीय नेते पुढे येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Continue reading

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

राज्यातील साखर आयुक्तपदातील सावळागोंधळ सुरूच आहे. साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांचीही सहा महिन्यातच बदली करण्यात आली आहे. काल उशिरा जारी आदेशानुसार, त्यांची मुंबईत कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी राज्याचा ऊसगाळप हंगाम सुरू असतानाच फेब्रुवारीमध्ये...

शनिवारपासून मुंबईतली मोनोरेल तात्पुरती बंद!

मुंबई मोनोरेल भविष्यासाठी अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह बनवण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) येत्या 20 सप्टेंबर 2025पासून मोनोरेलची सेवा काही काळासाठी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात, नवीन "रोलिंग स्टॉक" (रॅक), प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग...

1 ऑक्टोबरपासून रेल्वे बुकिंगसाठी पहिल्या 15 मिनिटांत आधार अनिवार्य

आरक्षण प्रणालीचा लाभ सर्वप्रथम सामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचावा आणि गैरवापर करणाऱ्या घटकांकडून होणारा वापर टाळ्याकरीता येत्या 1 ऑक्टोबर 2025पासून, रेल्वेच्या सामान्य आरक्षणाच्या सुरुवातीच्या पहिल्या 15 मिनिटांत, आरक्षित सामान्य तिकीट फक्त आधार-प्रमाणित वापरकर्त्यांद्वारेच केले जाऊ शकेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम...
Skip to content