74 वर्षे उलटून गेली तरी विंदाच्या कवितेला अजूनही भरभरून प्रतिसाद! मर्ढेकर, बोरकर, पाडगावकर, ग्रेस आणि इंदिरा यांनाही उस्फुर्त दाद!! स्थळ होते मुंबईतल्या साठ्ये महाविद्यालयाचे सभागृह. काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता मौज या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने.. आणि प्रसंग होता त्यांच्याच ‘सत्यकथा’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या 35 वर्षांतील कवितांच्या खंड प्रकाशनाचा. खरे तर या दोन खंडाचे प्रकाशन याआधीच झाले होते. मौज – सत्यकथेचे सर्वेसर्वा साहित्यवर्मी संपादक श्री पु भागवत यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हे काव्यवाचन ‘शब्द शब्द वेचिता’ या बॅनरखाली आयोजित केले गेले होते. सत्यकथेच्या या कालखंडातील निवडक कविताचे अभिवाचन अजित भुरे, आनंद इंगळे, सत्यजित कोसंबी, मुग्धा गोडबोले, स्पृहा जोशी व शाब्दा तापस यांनी केले. प्रा. विजय तापस यांनी या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मौज, या प्रकाशन संस्थेचा दबदबा मराठी साहित्य प्रांतात पुरेसा असला तरी गेल्या अनेक वर्षांत सहित्यिक समारंभात, त्यातही काव्यवाचन समारंभ आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ असावी. काव्यरसिकांनीही उदंड प्रतिसाद देऊन त्याला उचलून धरल्याचेच दिसत होते. ‘माझ्या मना बन दगड’ या कवितेची घोषणा होताच रसिकांनी तिला उचलूनच घेतले. अजित भुरे, आनंद इंगळे आणि शाब्दा या तिघांनी या मनाचे शिवधनुष्य लीलया पेलले. “हा रस्ता अटल आहे! अन्नाशिवाय, कपड्याशिवाय…” या सुरुवातीच्या ओळीपासूनच रसिक मनाचा कब्जा घेऊन… “लाल धूळ उडते आज; याच्या मागून येईल स्वार; या दगडावर लावील धार! इतके यश तुला रग्गड”.. याने टाळ्यांच्या कडकडाटाचा जणू तुराच चढवला!

असाच उत्तम प्रतिसाद बा सी मर्ढेकर यांच्या ‘गणपत वाण्याला’ मिळाला. आनंदने सहजतेने साकारलेल्या वाण्याने रसिकांना अंतर्मुख केले नसते तरच नवल! “काडे गणपत वाण्याने ज्या हडांची ही ऐशी केली, दुकानातल्या जमिनीस ती सदैव रुतली”… रसिकांनी या वाण्यालाही टाळ्यांच्या गजरात निरोप दिला. या काव्यवाचनात एरव्ही विनोदी साहित्यकार म्हणून समोर येणारे वसंत सबनीस एका वेगळ्याच अवतारात रसिकासमोर येतात. तेच ‘रे अश्रूनो’ म्हणतच!! आनंद सांगतो, “रे अश्रूनो, थांबा तेथे; जरी डोळ्यांना समोर दिसली न्यायदेवता टाचा घाशीत अन्यायाच्या टाचे खाली”.. यानंतर निराशामय वातावरण चितारून अखेरीस मात्र आशेचा किरण दिसून कवी म्हणतो,
“रे अश्रूनो थांबा तेथे अजून
व्हायची उलथापालथ…
हळूच उतरा गालावरती
आनंदाची लेणी लेवून!”
हा सकारात्मक सूरही आळवतो
“Poets are the senses, philosophers, the intelligence of humanity” या वचनाची या काव्यवाचनप्रसंगी काहीवेळा प्रकर्षाने आठवण होत होती. ‘सारेच दीप कसे मंदावले आता…’ ही अनिल यांची कविता ऐकताना हे वचन सतत गुंजारव करत होतं. “सारेच कसे दीप मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या… साऱ्याच आघाडयांवरी वरती खाली सामसूम इकडे तिकडे सामसूम… कागदाच्या कपट्यावर सारी स्वरूपे कुरूप झाली हुरूप कशाचा नाही चित्ता! सारेच दीप कसे मंदावले आता!” हा शेवट अंतर्मुख करणाराच आहे. अजित भुरे यांनी ही कविता बारकाव्यासहित सादर केली.
मुग्धा गोडबोले यांनी वाचलेली ‘व्रत’ (इंदिरा), आनंद इंगळेंनी सादर केलेली सांगाती (अनिल), सत्यजित कोसंबी यांनी सादर केलेली ‘आई’ (ग्रेस) आणि शाब्दा तापस यांनी सादर केलेल्या सर्व कविता दाद घेऊन गेल्या. अजित भुरे आणि स्पृहा जोशी यांनीही समारंभ तोलून धरला. शेवटी एक सुचवावेसे वाटते ते हे की मौजने असे काव्यवाचन समारंभ आयोजित करण्यात पुढाकार घ्यावा तसेच नवीन कविंनाही प्रोत्साहन द्यावे…

